You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोंबिवली बलात्कार : 33 आरोपींची नावं समोर, आतापर्यंत 28 जण ताब्यात
डोंबिवलीत 15 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणात एकूण 33 आरोपी असून, त्यातील दोघेजण अल्पवयीन आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 28 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावं समोर आली आहेत. त्यापैकी 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. 2 आरोपी अल्पवयीन आहेत."
पीडित तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सोनाली ढोलेंनी दिली.
"पीडित तरुणी बहुतांश आरोपींना आधीपासून ओळखत होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित मुलीची आणि काही आरोपींची ओळख झाली होती," असं सोनाली ढोलेंनी सांगितलं.
तसंच, आरोपींचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असल्याचं आढळलेलं नाही, असंही डोले म्हणाल्या.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमलं आहे. यात सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्त्वात प्रकरणाचा तपास केला जात आहे.
पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात काय सांगितलं?
पीडितेच्या आरोपानुसार, "घरी येणं जाणं असलेला एक मित्र होता. जानेवारी महिन्यात तिला भेटण्यासाठी सकाळी 9.40 च्या सुमारास त्याचा (मुख्य आरोपी) फोन आला. पीडित मुलगी सकाळी 11 च्या सुमारास त्याला भेटायला गेली. तर मुख्य आरोपी ऑटो चालवणाऱ्या त्याच्या मित्रासोबत आला होता. ते एका मैत्रिणीच्या घरी जात होते. वाटेत दुसरा मुलगा त्यांच्यासोबत ऑटोमध्ये बसला."
"मात्र, मैत्रिणीच्या घरी जाण्याऐवजी पीडितेला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. मुख्य आरोपीने पीडितेला तिच्या खासगी फोटोंसह ब्लॅकमेल केले, जे तिने पूर्वी (डिसेंबर 2020) त्याच्यासोबत शेअर केले होते. नंतर मुख्य आरोपीने पीडितेवर बलात्कार केला तिसऱ्या आरोपीने व्हीडिओ चित्रित केला. नंतर तिन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला," असं फिर्यादीत लिहिलं आहे.
त्यानंतर पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेली. या दरम्यान मुख्य आरोपी तिला सतत फोन करायचा, पण ती त्याचे कॉल टाळत होती.
20 फेब्रुवारी, 2021 रोजी मुख्य आरोपीने तिला वेगळ्या क्रमांकावरून फोन केला आणि तिला भेटायला सांगितलं पण तिने नकार दिला.
दुसऱ्या दिवशी तो तिच्या घराजवळ गेला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली की, तो तिच्या कुटुंबाला व्हीडिओ दाखवेल आणि सार्वजनिक करेल. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.
मुख्य आरोपी तिला डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे 9 मुलं उपस्थित होती. त्यातील तिघांनी तिच्यावर जानेवारीमध्ये बलात्कार केला होता.
मुख्य आरोपीने तिला गुंगीचे औषध टाकून पाणी दिले. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. दरम्यान, तिला दरवेळी अशी धमकी देऊन तिला विविध ठिकाणी नेलं जात होतं.
त्यानंतर 15 मे, 2021 रोजी पीडित तरुणी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीडिओ शेअर करण्यात आला आणि धमकी देऊन पीडितेला दारू पाजण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या 11 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला.
नंतर 22 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा 5 जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
त्यानंतर पीडितेने तिच्या पालकांनी या घटनांबाबत माहिती दिली.
रेकॉर्ड केलेले फोटो किंवा व्हिडिओ यासंदर्भात आताच कोणतीही माहिती सांगता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
डोंबिवलीची घटना काय आहे?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर जानेवारी महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत गेले आठ-नऊ महिने बलात्कार करण्यात येत होता.
बलात्कार करणारी मुलं ओळखीची आणि मित्र असल्याची माहिती पीडित मुलीने दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सामूहिक बलात्काराच्या या घटनेबाबत बीबीसीशी बोलताना ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, "मुलीच्या तक्रारीनुसार तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड यासारख्या ठिकाणी चार-पाच वेळा बलात्कार करण्यात आला."
पोलिसांच्या सांगण्यानुसार, पिडीत मुलीने 29 मुलांविरोधात बलात्काराची तक्रार दिलीये.
ते पुढे सांगतात, "पिडीत मुलगी 15 वर्षांची असल्याने पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 23 आरोपींना अटक करण्यात आलीये. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत."
प्रियकराने व्हीडिओ क्लिप काढून केलं ब्लॅकमेल?
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिच्या प्रियकराने तिची एक व्हाडिओ क्लिप काढल्याचं म्हटलंय.
अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे पुढे म्हणाले, "या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गोष्टींची शहानिशा करण्यात येत आहे."
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्पेशल इनव्हेस्टिगेटींग टीम बनवली आहे. महिला अधिकाऱ्याकडे या घटनेचा तपास देण्यात आलाय.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.
घटना संतापजनक- देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं.महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत, असं ट्वीट विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
"डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे," असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महिला अत्याचाराच्या मुद्यावर राजकारण
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर भाजपने महिला अत्याचाराचा मुद्दा उचलून धरला होता.
भाजपच्या महिला आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून महिला अत्याचाराबाबत निवेदन दिलं होतं.
त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून महिला अत्याचाराबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची सूचना दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, महिलांवर वाढते अत्याचार आणि हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर देश पातळीवर चर्चा व्हायला हवी, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं.
उद्धव ठाकरे त्यावेळी नेमकं काय म्हणाले होते हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा - उद्धव ठाकरेंनी गुजरात विधानसभेचं 1 महिन्याचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी का केली?
"महाराष्ट्रात आणि मुंबईत गेल्या काही दिवसांत महिलांवर, लहान मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत आहेत. ज्या ज्या वेळी आम्ही या घटनांवर बोलतो, त्यावेळेस म्हटलं जातं की भाजप राजकारण करतं. आमचं काम आहे. तुम्हाला प्रश्न विचारणं. एकदा नाही, शंभरवेळा विचारू आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील," असं वक्तव्यं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.
"महिला आयोगाला अध्यक्ष नसणं, शक्तिकायदा अंमलात न येणं किंवा अशाप्रकारे संवेदनशील पत्राला (राज्यपालांच्या पत्राकडे चित्रा वाघ यांचा रोख होता) ज्या पद्धतीनं उत्तर दिलं गेलं, त्या पत्रात वेगवेगळ्या राज्यांची आकडेवारी दिली गेली. पण मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट माहीत आहे का," असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.
त्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीसुद्धा मागणी केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)