उद्धव ठाकरेंचं भगत सिंह कोश्यारींना पत्र : गुजरात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी

फोटो स्रोत, @CMOMaharashtra
मुंबईतील साकीनाका बलात्कार घटनेसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसीय अधिवेशन घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलंय.
"महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावं," असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिलं आहे.
तसंच सरकार आपलं काम करत असून आता आपल्या सल्ल्यानुसार विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावलं तर नवा वाद निर्माण होऊ शकतो, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणं हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी थेट टीका उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात काय म्हटलं?
महाराष्ट्रातील महिलांच्या काळजीपोटी तुम्ही पाठवलेले पत्र मिळाले असून राज्यातल्या महिला असुरक्षित आहेत, असा आपला एकंदरीत सूर दिसतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्राची सुरुवात केली.
"आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात. आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे," असाही उल्लेख आपल्या पत्रात करण्यास उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
ते पुढे म्हणाले, "साकीनाक्यातील घटनेने मा. राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावं."
मुख्यमंत्री म्हणून साकिनाका घटनेसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यची भूमिका घेतली असून, सदर खटला जलदगतीने चालवून आरोपीला कठोर शासन केले जाईल असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी दिलं.
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची जबाबदारी असलेल्या दिल्लीच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले.
"गेल्या काही वर्षांत दिल्लीतील महिला अत्याचारांत कमालीची वाढ झाली. जगात दिल्लीची बदनामी झालीच आणि बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली. दिल्लीची कायदा सुव्यवस्था हा केंद्राचा विषय आहे.

फोटो स्रोत, Governor of Maharashtra
दिल्लीत मागच्याच महिन्यात घडलेली अत्याचाराची घटना तर मन सुन्न करणारी आहे. 9 वर्षांच्या एका दलित मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपी असलेला एक पुजारी आणि त्याच्या तीन साथीदारांचं क्रौर्य इथेच थांबले नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी पीडित मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कारही केले. देशाचं अख्खं मंत्रिमंडळ ज्या शहरात बसते, तेथील ही घटना आहे."
उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर भाजपशासीत राज्यांमधील बलात्काराच्या घटनांवरही त्यांनी बोट ठेवलं आहे.
ते म्हणाले, "भाजपची सत्ता असलेल्या बिहारमध्ये एका खासदाराने आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार केला. खासदाराच्या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला पोलिसांकडे गेली, पण तिला न्याय मिळाला नाही. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव होता.
अखेर तब्बल तीन महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित खासदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातील दुदैवी घटनेत पोलिसांनी केलेली तत्पर कारवाई आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील उपरोक्त घटना याची तुलना आपणच करावी."
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारत असताना उत्तर प्रदेशात 'रामराज्यात' महिला खरंच सुरक्षित आहेत का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचं NCRB चं म्हणणं असूनही तिथे कधीही विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी भाजपनं केल्याचं दिसत नाही, असंही ते म्हणाले.
आपल्या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशातील बलात्कार घटनांचा सविस्तर उल्लेख केलेला दिसतो. "उत्तर प्रदेशात महिला खो खो खेळाडूवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. बिजनौरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला.

फोटो स्रोत, @OfficeofUT
उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार आणि अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे. बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते."
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरिद्वार, डेहरादूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत असल्याचंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य असलेल्या गुजरातमधील महिला सुरेक्षेच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरे बोलले आहेत. "महाराष्ट्राचं जुळं भावंड असलेल्या गुजरातशी आमचं एक भावनिक नातं आहे. गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज 14 महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही काळात अहमदाबादमधून 2908 महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून 14 हजार 229 महिला बेपत्ता झाल्या. 2015 सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे."
मेहसाणा, राजकोट, वडोदरा, अहमदाबाद ग्रामीण, छोटा उदयपूर, सूरत ग्रामीण, जामनगर, पाटण भागातील महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराचे गुन्हे तसंच आकडे धक्कादायक आहेत, असंही उद्धव ठाकरे आपल्या पत्रात म्हणालेत. यासाठी गुजरात विधानसभेत एक महिन्याचं विशेष अधिवेशनच बोलावावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा संघर्ष महाराष्ट्रासाठी आता नवीन नाही. परंतु आता तर महिला सुरक्षेच्या मुद्यावरुन सुद्धा राजकारण रंगताना दिसत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








