Anant Geete : शरद पवारांवर आरोप करणारे अनंत गीते कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. "राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच," असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनी मात्र या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. गीते यांच्या वक्तव्याविषयी मला काही माहीत नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
गीतेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
"अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेलं नाही. त्याच नैराश्यापोटी आलेलं विधान आहे. एक व्यक्ती बोलल्याने पवार साहेबांचं स्थान कमी होणार नाही", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. या निमित्ताने अनंत गीते यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
1. मुंबईत जन्म
अनंत गीते यांचा जन्म 2 जून 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाराम आणि आईचे नाव आनंदीबाई आहे.
2. मुंबई महानगरपालिकेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
अनंत गीते 1985 ते 1992 या काळामध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी 2 वर्षं काम केलं आहे. 1986-87 तसंच 1992-93 या काळात ते मुंबई बँकेचे उपाध्यक्ष होते. 1995 साली ते कोकण विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
3. रत्नागिरी मतदारसंघ
1996 साली अनंत गीते रत्नागिरी मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. या निवडणुकीनंतर गीते यांना लोकसभा निवडणुकांमध्ये सलग सहा वेळा विजय मिळत गेला. त्याचवेळेस त्यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाली. 19996-98 या काळात ते ग्रामीण आणि शहरी विकास संसदीय समितीचे सदस्यही होते.

फोटो स्रोत, Getty Images
1998-99 या काळात ते पुन्हा एकदा लोकसभेत निवडून गेले. या लोकसभेत ते परराष्ट्र आणि इतर उपसमित्यांचे सदस्य होते. तसंच मनुष्यबळविकास समितीचेही ते सदस्य होते.
4. तिसऱ्यांदा खासदार आणि पहिलं मंत्रिपद
1999 साली ते रत्नागिरीतून तिसऱ्यांदा निवडून गेले. विविध समित्यांचे सदस्य त्यांना होता आलं. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदही त्यांना मिळालं. जुलै ते ऑगस्ट 2002 या काळात ते केंद्रात अर्थ, बँकिंग अँड एक्सपेंडिचर खात्यांचे राज्यमंत्री झाले.
ऑगस्ट महिन्यात त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा पदभार आला आणि ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विजयी झाले.
5. रायगड मतदारसंघामुळे मंत्रिपद आणि पराभवही
2009 साली रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांनी ए. आर. अंतुले यांचा पराभव केला. 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा पराभव केला होता.
मात्र गीते यांना यावेळेस अगदी निसटत्या मतांनी विजय मिळाला होता. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांना अवजड उद्योगमंत्री म्हणून स्थान मिळाले. 2019 साली मात्र अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी पराभव केला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








