चरणजीत सिंह चन्नी : पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री निवडून काँग्रेसचा 'मास्टरस्ट्रोक'?

काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंदीगड येथील राजभवनात पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी चन्नी यांना शपथ दिली.

चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री बनले आहेत.

चन्नी यांच्यासोबत काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओ पी सोनी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील असं म्हटलं जातंय. मात्र ते कोण असतील, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीय.

चरणजीत सिंह चन्नी यांच्या शपथविधीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील घडामोडींना कमालीचा वेग आला होता. मुख्यमंत्रिपदासाठी चार ते पाच नावांची चर्चा सुरू होती. मात्र, अनेकांना अनपेक्षित असलेले चरणजीत सिंह हे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निवडण्यात आलं.

चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबमधील दलित समाजातून येतात. त्यांच्या रूपाने भारतातील सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेल्या पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री लाभला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चरणजीत सिंह चन्नी यांचं अभिनंदन करत सदिच्छा दिल्या. ते म्हणाले, "चरणजीत सिंह चन्नी यांना नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन. पंजाबच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने काम कराल, याची खात्री आहे. जनतेचा विश्वास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे"

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये दलित समाजातील नेत्याला महत्त्वाच्या पदावर आणण्यासाठी चर्चा सुरू होती.

बीबीसी पंजाबी सेवेचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांच्या मते, चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याकडे 'मास्टरस्ट्रोक' म्हणून पाहिलं जातंय.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं अभिनंदन

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात चरणजीत सिंह चन्नीहे रोजगार मंत्री होते. रूपनगर जिल्ह्यातील चनकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार आहेत. 2016 ते 2016 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते सुद्धा होते.

चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरोधी गटातले मानले जात. नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चन्नीही होते.

चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यनंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदन केलं. ते म्हणाले, "चरणजीत सिंह चन्नी यांना माझ्या शुभेच्छा. मला आशा आहे की, ते पंजाबला सुरक्षित ठेवतील आणि सीमेपलिकडील धोक्यापासून आपल्या लोकांचं संरक्षण करण्यात सक्षम राहतील."

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं की, "नवज्योतसिंह सिद्धू यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही. कारण ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्ताचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे मित्र आहेत. सिद्धूंना मुख्यमंत्री बनवलं गेल्यास देशहितासाठी त्यांचा विरोध करेन."

24 तासांपासून सुरू होत्या हालचाली

काँग्रेस पक्षाकडून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास 24 तास चर्चा सुरू होती. सुखजिंदर रंधावा, नवज्योतसिंह सिद्ध, अंबिका सोनी, सुनील जाखड अशी चार ते पाच नावं चर्चेत होती. चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव यात नव्हतं, हे विशेष.

शर्यतीत सर्वात पुढे होते सुखजिंदर रंधावा. चरणजीत सिंह यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सुखजिंदर रंधावा म्हणाले, "मी नव्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो. हाय कमांडचा निर्णय आहे. वरिष्ठांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मी अजिबात निराश नाहीय."

या दरम्यानच अंबिका सोनी या राहुल गांधी यांच्या घरी पोहोचल्यानं त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली होती. सांगितलं गेलं की अंबिका सोनी यांनाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, नंतर माध्यमांशी बोलताना अंबिका सोनी म्हणाल्या की, मुख्यमंत्रिपदासाठी मी नकार दिला आहे. मात्र, पंजाबमध्ये शिख मुख्यमंत्रीच व्हावा. कारण पंजाब संपूर्ण देशात एकमेव शिखबहुल राज्य आहे.

गांधी कुटुंबाचे समर्थक सुनील जाखड यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, 1984 च्या घटनेचा मुद्दा उपस्थित करत अकाली दल काँग्रेसविरोधात प्रचार करू शकतं, अशी भीती काँग्रेस नेतृत्वाला होती.

चरणजीत सिंह चन्नी कोण आहेत?

58 वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते.

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये दलित नेते प्रमुख भूमिकेत येऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती.

बीबीसी पंजाबी सेवेचे प्रतनिधी अरविंद छाब्रा यांच्यानुसार, चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री पद देणं म्हणजे काँग्रेसचा 'मास्टरस्ट्रोक आहे, असं मानलं जात आहे.

पंजाबमध्ये सहा महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

सिद्धू यांनी अमरिंदर यांच्याविरोधातील आमदारांचं नेतृत्व केलं होतं. अमरिंदर यांच्या कामकाजावर सिद्धू यांनी जाहीर टीका केली होती. सिद्धू यांच्याबरोबर अनेक आमदार असल्याने काँग्रेस पक्षाने अमरिंदर यांना पदावरून दूर केलं. मात्र नव्या रचनेत मुख्यमंत्रीपद सिद्धू यांच्याऐवजी चन्नी यांना देण्यात आलं आहे.

चन्नी यांच्या नियुक्तीसह पंजाबला पहिल्यांदाच दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री लाभणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.