शाहरूख खानवरून सोशल मीडियावर विरोधक आणि चाहते आमने-सामने का आलेत?

ट्विटरवर कालपासून दोन ट्रेंड अगदी जोरात आहेत. एकात म्हटलंय की 'शाहरूख खानवर बंदी घाला', तर दुसऱ्यात शाहरुखचे चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसतायत. पण असं नक्की काय घडलं की शाहरूख खानचे विरोधक आणि चाहते ट्विटरवर आमने-सामने आलेत?

'डिस्ने हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मने शाहरूख खानचा एक प्रोमो सोशल मीडियावर टाकला. 'हॉटस्टारवर सगळं काही आहे फक्त शाहरूख खान नाही' अशी त्याची टॅगलाईन होती.

या प्रोमो सलमान खानने शेअर केला आणि लिहिलं, 'स्वागत नही करोगे हमारा?'. यासाठी शाहरूखने सलमानचे आभारही मानले.

याच सुमारास #BoycottShahRukhKhan ट्रेंड व्हायला लागलं. या हॅशटॅगसह असलेल्या फोटोंमध्ये पठाण सिनेमाचं फुल्या मारलेला फोटो जोडण्यात आला.

शाहरूखचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत असलेला एक जुना फोटो व्हायरल करत लोकांनी म्हटलं की, शाहरूख खानवर बहिष्कार टाका.

हा फोटो अलीकडचा नसून जुना आहे. हा फोटो 2008 मध्ये इमरान खान मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले तेव्हा घेण्यात आला होता. ट्रॅव्हल विथ स्टाईल या कार्यक्रमानिमित्त रॉयल इंडिया वेस्टर्न टर्फ क्लब इथे हे दोघं एकत्र आले होते.

पूर्वीदेखील असे प्रकार खान मंडळींचे सिनेमे रिलीज होताना घडलेले आहेत. ईदला सिनेमा रिलीज करत असल्यामुळे सलमान खानला अनेकांनी आपल्या टीकेचं धनी बनवलं होतं. तर आमीर खानही आपल्या चित्रपटांमध्ये मुस्लीम कलाकारांना स्थान देतो अशी टीका झाली होती.

आता एका फोटोत शाहरूख इमरान खान यांच्यासोबत दिसत असल्याने अनेकांनी शाहरूख खानचा सिनेमा पाहू नका, असं ट्वीट करायला सुरुवात केली.

कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकताच तालिबानला पाठिंबा दर्शवला होता. अशा व्यक्तीसोबत शाहरूख खान फोटो दिसतोय. त्यामुळे त्याचा सिनेमा पाहू नका असं या नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

शाहरूख पाकिस्तानच्या बाजूने आहे असं या लोकांना सुचवायचं होतं. यातले बरेच ट्वीट बीबीसी मराठीने पाहिले तर लक्षात आलं की, हे ट्वीट फारच विखारी आहेत आणि यात 80 टक्के शिव्याच दिलेल्या आहेत.

शाहरूखच्या विरोधातली काही निवडक ट्वीट्स इथे देत आहोत.

यतिन कुमार या युझरने लिहिलं, "शाहरूख खानवर बहिष्कार टाका आणि नवोदित कलाकरांना संधी द्या. या व्यक्तीचे सिनेमे किंवा शो घरात जरी टीव्हीवर दिसले तर चॅनल बदला."

उदय कुमार या युझरने लिहिलं, "देशातल्या चुकीच्या गोष्टी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जो बोलेल तो देशभक्त आहे. ज्याला या देशात राहायची भीती वाटत असेल, जो या देशातला पैसा लुटून पाकिस्तानला पुरवत असेल तो देशद्रोहीच म्हणायचा."

अरविंद कुमार पांडे या अकाऊंटवरून लिहिलं आहे, "बॉलिवूडच्या अंधभक्तीचा हा दुष्परिणाम आहे की हिंदुस्तानात अशा विघटनवाद्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत."

जितेंद्र नाथ या युझरने लिहिलं की, "तालिबानी विचारसरणी असणाऱ्या या अभिनेत्याचे सिनेमे कोणी पाहाणार नाही."

एका बाजूने असे ट्वीट होत असतानाच शाहरूख खानचे चाहते आपल्या लाडक्या हिरोच्या समर्थनार्थ पुढे आले. थोड्याच वेळात #WeLoveShahRukhKhan ट्रेंड व्हायला लागलं.

जावेद या अकाऊंटवरून एक मीम ट्वीट करण्यात आलं ज्यात दाखवलं होतं की शाहरूखला विरोध करणाऱ्यांपेक्षा त्याला पाठिंबा देणाऱ्याचीं संख्या ट्विटरवर कशी जास्त आहे ते.

याला कॅप्शन दिली होती, "आम्ही भक्तांचे बाप आहोत."

फाईनेस्ट या युझरने 'चक दे इंडिया' चित्रपटातला तो स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात शाहरूखच्या पात्राच्या घराबाहेर 'गद्दार' लिहिलं जातं.

या युझरने लिहिलं की, "शाहरूख खानपेक्षा मोठा देशभक्त दुसरा कोणी नाही."

आदिल या अकाऊंटवरून शाहरूख खानचा जुना एक व्हीडिओ शेअर करण्यात आला, ज्यात शाहरूख म्हणतोय, "अशा प्रकारच्या नकारात्मकतेला उत्तर देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही कारण प्रत्येक वेळी जेव्हा माझ्याविषयी कोट्यवधी वाईट गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अब्जावधी चांगल्या गोष्टीही बोलल्या जात असतात हे मला माहितेय."

क्रेझी बॉय या युझरने लिहिलं, "सर, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो."

आणि यासोबत आजवर शाहरूखने कुठे कुठे किती किती मदत केली आहे त्याची माहिती देणारा फोटो शेअर केला.

याधी कोण झालं होतं ट्रोल?

जेष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा यांनाही मुस्लीम असल्यामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षी द वायरला मुलाखतीत ते म्हणाले होते की, "70 वर्षं इथे राहून, इथे काम करून मी 'भारतीय' नसेन तर काय करावं मला समजत नाही."

ते सीएए-एनआरसीबद्दल बोलत होते.

ते म्हणाले, "भारतीय सैन्य आणि प्रशासनात माझ्या कुटुंबातले अनेक लोक होते. त्यांनी वेगवेगळ्या कालखंडात सेवा बजावली आहे. पण मला मला आयुष्यात आजवर एकदाही वाटलं नाही की मुस्लीम असणं अपंग असल्यासारखं असेल. आता मला प्रत्येत पावलाला माझ्या मुस्लीम असण्याची जाणीव करून दिली जाते. ही गोष्ट काळजी करण्यासारखी आहे."

गेल्यावर्षी आमीर खानलाही टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला भेटल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

आपल्या लाल सिंग चड्डा या चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी आमिर खान टर्कीला गेला असताना त्याने राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोओन यांच्या पत्नी एमीन अर्दोआन यांची भेट घेतली होती.

तेव्हा दिल्ली दंगलीमुळे चर्चेत राहिलेले भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, "यांना भारतात भीती वाटते."

भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी लिहिलं होतं की, "माझं बरोबर होतं म्हणजे. आमिर खान 'तीन खानांपैकीच' एक आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)