नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट नोटीस

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. कर्ज थकबाकीप्रकरणी राणेंच्या कुटुंबीयांविरोधात लूकआउट नोटीस
नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. एका खासगी कंपनीचं कर्ज थकवल्याप्रकरणी पोलिसांनी ही नोटीस पाठवल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीच्या कर्ज प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीनं 65 कोटींचं कर्ज थकवल्या प्रकरणी नीलम आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

फोटो स्रोत, Facebook/Nitesh Rane
DHFL कडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. नीलम राणे या कर्जासाठी सहअर्जदार होत्या.
तसंच, नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठीही 40 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं आहे. त्यापैकीदेखील जवळपास 34 कोटींची थकबाकी असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी नोटीस जारी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील हे पत्र पाठवण्यात आलं आहे. तक्रारीनंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नोटीस जारी केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
2. मनोहरमामाविरोधात लैंगिक छळ, आर्थिक गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा
स्वतःला बाळूमामांचे शिष्य म्हणवणारे मनोहरमामा म्हणजेच मनोहर भोसले यांच्यावरील आरोपांमुळं सध्या ते चर्चेत आहेत. त्यात गुरुवारी पुण्यात त्यांच्याविरोधात एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एबीपी माझानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
मनोहर भोसले यांच्या विरोधात एक गुन्हा करमाळा इथं लैंगिक शोषण प्रकरणी दाखल झाला. तर बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहे. या प्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपही फेटाळले होते.
घरगुती अडचणींसाठी मनोहरमामा यांचा सल्ला घेण्यासाठी एक महिला करमाळा येथील उंदरगाव मठात आली होती. त्यावेळी तिला आली तीन वाऱ्या करण्यास सांगण्यात आलं. महिलेनं या वाऱ्यांच्या दरम्यान लैंगिक छळ झाल्याचा आरोप करत तक्रार केली आहे.
लैंगिक छळासह आर्थिक फसवणूक केल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. तसंच बारामती इथंही मनोहर भोसले यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अमावस्येच्या दिवशी मनोहरमामांच्या मठात हजारोंच्या संख्येनं भाविक येत असतात. मात्र आता त्यांच्यावर झालेल्या अशा आरोपांमुळं एकच गोंधळ उडाला आहे.
मनोहर भोसले यांच्या विरोधात कलम 376, 2N, 378D, 354, 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्या दोन साथीदारांवरही अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
3. शिवसेना नेत्यांपाठोपाठ शरद पवार, अजित पवारांकडे सोमय्यांचा मोर्चा
महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि प्रामुख्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार, अजित पवारांवरही टीका केली आहे. टीव्ही 9 नं याबाबतचं वृत्त दिलं.
पुण्यात किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत, सुरुवात शरद पवारांपासून करायची की अजित पवारांपासून याचा संभ्रम निर्माण झाल्याचा टोला सोमय्यांनी लगावला.

फोटो स्रोत, Getty Images
पुढच्या आठवड्यात आणखी एका कॅबिनेट मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याचा इशाराही सोमय्यांनी दिला. आठवडाभरामध्ये तिसऱ्या अनिलचं नाव सांगतो, असं सोमय्या म्हणाले. अनिल परब यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असंही ते म्हणाले.
शरद पवार भावना गवळी निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र देतात. ईडीवर टीका करतात. पण शरद पवार यांना भावना गवळींना वाचवायचं असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं असंही सोमय्या म्हणाले.
अजित पवारांवरही त्यांनी टीका केली. अजित पवार यांनी हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनची कागदपत्रं सादर करावी. 65 कोटींमध्ये कारखाना घेऊन 700 कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळं आगामी काळात आता सोमय्या विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
4. NIA ची कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंग यांची भाजपबरोबर डील - नवाब मलिक
परमबीर सिंग आणि भाजप यांच्यात झालेल्या तडजोडीमुळंच राष्ट्रीय तपास संस्था (NIA)च्या आरोपपत्रामध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची दिशाभूल करत या प्रकरणाला वेगळं वळण दिलं. या प्रकरणी त्यांना NIA अटक करण्याची शक्यता होती. त्यामुळं सिंग यांनी भाजपबरोबर डील केली आणि त्यांची अटक टळली असं मलिक म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
NIA नं परमबीर सिंग यांना आश्वासन दिल्यानं त्यांच्या आरोपपत्रात सिंग यांच नाव नव्हतं. तसंच त्यामुळंच परमबिर सिंग आणि भाजप यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्या विरोधात कट रचण्यात आल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
परमबिर सिंग यांनी सायबर तज्ज्ञांचा वापर करून खोटे पुरावे सादर केले. त्यासाठी 5 लाख रुपये दिल्याची कबुली सायबर तज्ज्ञानं दिली होती, असंही नवाब मलिक म्हणाले.
5. लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हास्यास्पद - भाजप खासदार
कोरोनाच्या लसीकरणानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. यावेळी भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत टीका केल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सनं दिलं आहे.
प्रमाणपत्रावर अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असणं हे हास्यास्पद आहे, असं स्वामी म्हणाले. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयानं पंतप्रधानांचा फोटो वापरण्यापूर्वी त्यांची परवानगी घेतली होती का, असा सवालही त्यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोमुळं विदेशात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेनं लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोमुळं तिला सामोरं जावं लागलेल्या अडचणींचा अनुभव सांगितला होता. अधिकाऱ्यांनी तिचा फोटो नसल्यामुळं तिच्यावर बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप केला होता.
विरोधी पक्षांनीही प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या राज्यांनी तर मोदींचा फोटो काढून त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








