नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्हा पडली होती?

उद्धव ठाकरे-नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर एकत्र येतील. चिपी विमानतळाच्या श्रेयावरून या दोघांमध्ये वाद आहेच. पण या ठाकरे - राणे वादाला सुरुवात कुठूऩ झाली?

"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे. बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून...अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल हे विधान केलं आणि राणे-शिवसेनेमधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान 22 ऑगस्टला रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.

त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला.

हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर एकेरीमध्ये टीका केली.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

अगदी काही दिवसांपूर्वीच चिपळूणमधील पूरपरिस्थितीचा दौरा करायला गेलेल्या राणे यांनी कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता.

त्यावेळी बोलताना राणे यांनी म्हटलं होतं, "तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?"

कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करतानाच राणे यांनी म्हटलं होतं की, "राज्यावर येणाऱ्या संकटाला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय सर्व चालूच आहे. मुख्यमंत्री आले आणि कोरोना घेऊन आले. त्यांचे पाय बघायला हवेत, पांढऱ्या पायाचे."

जनआशीर्वाद यात्रा, पूर, कोरोना किंवा राज्यातील इतर कोणतीही परिस्थिती असो... या गोष्टी केवळ निमित्त आहेत. पण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे-शिवसेना हा संघर्ष काही नवीन नाहीये.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रिपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपद असा शिवसेनेत राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता.

मग राणे आणि शिवसेनेमधील संघर्षाची नेमकी ठिणगी कधी पडली? उद्धव ठाकरेंवर नारायण राणे यांचा एवढा राग का आहे?

नारायण राणेंचा शिवसेनेतील प्रवास

नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपद असा राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे.

पण याचा अर्थ तेव्हाही नारायण राणेंसाठी शिवसेनेत सर्व आलबेल होते असं नाहीये. अंतर्गत धुसफूस होतीच.

उद्धव ठाकरे-गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी

फोटो स्रोत, Getty Images

'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "1995 साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.

1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी मराठा बहुजन चेहऱ्याची गरज आहे, हे बाळासाहेबांना जाणवलं होतं. मात्र मनोहर जोशी यांना हटविण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे हे फारसे खूश नव्हते. उद्धव आणि नारायण राणेंमधील बेबनावाची ही पहिली ठिणगी."

नारायण राणेंना अवघं नऊ महिन्यांचं मुख्यमंत्रिपद मिळालं. महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला.

या निवडणुकीत सेना-भाजप युतीचा पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) आत्मचरित्रात या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं.

1999 साली उद्धव ठाकरे यांनी काय केलं?

आपल्या आत्मचरित्रात राणेंनी लिहिलं आहे, "महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला.

1995 पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना 171-117 असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले.

"शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीनं 'सामना'मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नावं बदलली आणि आम्हा सर्वांना अंधारात ठेवून निर्णय घेतला, असं राणे यांनी पुस्तकात नमूद केलं आहे."

नारायण राणे

फोटो स्रोत, HARPERCOLLINS PUBLISHERS INDIA

महत्त्वाचं म्हणजे ज्या 15 उमेदवारांची नावं उद्धव यांनी बददली होती. त्यांपैकी 11 उमेदवार हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षांतून लढले आणि विजयीही झाले. या निवडणुकीत शिवसेनेचे 69 उमेदवार निवडून आले.

हे अकरा बंडखोर आमदार पक्षात असते, तर सेनेच्या आमदारांची संख्या 80 झाली असती. भाजपचेही 56 आमदार निवडून आले होते. त्यामुळे अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करणं युतीला शक्य झालं असतं. पण ही संधी हातातून गेली.

सत्तास्थापनेच्या हालचाली का फसल्या?

काही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने युतीचा आकडा 136वर गेला होता. मात्र तरीही बहुमतासाठी 9 जागा कमी पडत होत्या (विधानसभेतील बहुमताचा आकडा 145), असं राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. काँग्रेसला 75 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 56 जागा मिळाल्या होत्या.

"निकाल लागल्यानंतर बराच काळ कोणत्याही पक्षाने किंवा सर्वांत मोठ्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता. तेव्हा तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर आपल्याला वारंवार 'राणेजी, क्लेम करो' असं सांगत होते. मात्र कुणीही दावा केला नाही, त्यामुळे 12 ऑक्टोबरनंतर अलेक्झांडर थोडेसे त्रस्त दिसू लागले," असं राणेंनी लिहिलं आहे.

युतीच्या एका मोर्च्यामध्ये नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, दिवाकर रावते, विनोद तावडे दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युतीच्या एका मोर्च्यामध्ये नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, दिवाकर रावते, विनोद तावडे दिसत आहेत.

"त्यानंतर एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी आता गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. त्यांना यामध्ये यश येईल का," असा प्रश्न मला विचारल्याचं राणे लिहितात. "त्यावर मुंडे यशस्वी होतील की नाही हे माहिती नाही, परंतु युतीकडे पुरेसे पाठबळ आहे," असं आपण सांगितल्याचं राणे सांगतात.

1999 साली युतीचे सरकार स्थापन न होण्यामागे भाजपची आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे यांची भूमिका कारणीभूत होती, असं 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. 1999 साली भाजपनं पाठिंबा द्यायलाही विलंब केल्याचंही प्रधान सांगतात.

1999 सालच्या निवडणुकीत उमेदवारांची नावं बदलण्याबाबत प्रधान यांनी म्हटलं होतं, "साधारणतः प्रत्येक पक्षाचे दहा-पंधरा टक्के उमेदवार बदलले जातात. मात्र ती नावं बदलण्यात उद्धव यांची भूमिका किती होती हे सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतः सर्व निर्णय घ्यायचे. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले."

विलासरावांचं सरकार का नाही पाडता आलं?

2002 विलासराव देशमुख यांच्या सरकारचा पाठिंबा काही अपक्ष आणि लहान पक्षांनी काढल्यावर विरोधी पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या हालचालींबद्दल राणे यांनी पुस्तकात विस्तृत लिहून ठेवलं आहे.

नारायण राणे-विलासराव देशमुख

फोटो स्रोत, Getty Images

काही अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना गोरेगावच्या 'मातोश्री' क्लबमध्येही ठेवण्यात आलं होतं. परंतु संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सर्व काही बदललं.

दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असं काही नाही. या सरकार पाडण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा नाही,' असं स्पष्ट केलं. या सर्व घडामोडींमागे उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, जॉर्ज फर्नांडीस होते, असं राणे यांनी लिहिलं आहे.

महाबळेश्वरमधील अधिवेशन शेवटची ठिणगी

2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते.

या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती. पण त्यावेळेस शिवसेनेचा कोणताही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहीला नाही. या प्रसंगापासून राणे शिवसेनेपासून दुरावण्याचा वेग वाढला, असं धवल कुलकर्णींनी म्हटलं होतं.

धवल कुलकर्णी यांनी राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध बिघडण्याचा ट्रिगर पॉइंट महाबळेश्वरमधील शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ठरला, असं सांगितलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते प्रमोद महाजन, राज ठाकरे आणि नारायण राणे. 2004 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली पत्रकार परिषद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते प्रमोद महाजन, राज ठाकरे आणि नारायण राणे. 2004 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली पत्रकार परिषद

त्याबद्दल विस्तारानं सांगताना धवल कुलकर्णी म्हणतात, "जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वर इथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी होती. याच कार्यकारिणीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नावाची कार्यकारी प्रमुख म्हणून घोषणा केली. मात्र नारायण राणेंचा या प्रस्तावाला विरोध होता.

आपल्याला काहीच माहीत नसल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र राणेंनी या गोष्टीत तथ्यं नसल्याचं म्हटलं. हा प्रस्ताव मांडला जाण्याच्या आधी राणे बाळासाहेबांना भेटले होते. उद्धव यांच्या नावाला त्यांनी विरोध केला होता. पण बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, की नारायण, आता निर्णय झालाय."

रंगशारदातील 'ते' भाषण

2004 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राणेंनी सेनेच्या उमेदवारांसाठी मेहनत घेतली होती. अनेक उमेदवार उद्धव यांच्याच पसंतीनं ठरले होते. पण तरीही राणेंनी पक्षासाठी काम केलं.

मात्र त्याचवेळी त्यांच्याकडून उमेदवारांना एक संदेशही जात होता- निवडून आला आणि नेता निवडीची वेळ आली तर विधीमंडळ नेता म्हणून मला पसंती द्या. शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वाची नाराजी राणेंवर ओढावणं स्वाभाविक होतं. कारण सेनेत नेतानिवडीचा अधिकार शिवसेनाप्रमुखांचा असतो.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, राणेंनी रंगशारदा इथल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना 'सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जातोय,' असं वक्तव्य केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी रंगशारदामधील मेळाव्यातच शिवसैनिकांना संबोधित करताना राणेंच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

अनेक ज्येष्ठ पत्रकार हा प्रसंग सांगतात. 2004 साली नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. ते परदेशात गेले होते. ते परत आले तेव्हा त्यांच्याविरोधातली नाराजी विकोपाला गेली होती आणि राणेंचीही पक्षातली घुसमट वाढली होती.

त्यातून 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वाभिमानी पक्ष आणि नंतर भाजप असा नारायण राणेंचा प्रवास झाला आहे.

'उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सेनेला भविष्य नाही'- राणेंचं आत्मचरित्रातील मत

राणे यांनी या आत्मचरित्रात आणखी एक मत व्यक्त केलं आहे - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला भविष्य नाही.

"उद्धव आजूबाजूच्या काही होयबांना विचारून निर्णय घेतात. ते माणूस म्हणून चांगले आहेत, पण ते एक terrible leader आहेत. उद्धव हस्तीदंती मनोऱ्यात राहत असल्यामुळं त्यांचं लोकांशी नातं जुळू शकत नाही," असं मत त्यांनी आपल्या पुस्तकात व्यक्त केलं आहे.

2014 मध्ये शिवसेनेला 63 जागा मिळाल्याचं यश उद्धव स्वतःकडे घेतात, याशिवाय चूक काहीही नाही, असं राणे म्हणतात.

शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढली असली तरी पडद्याआडून त्यांची भाजपाशी हातमिळवणी आहे, हे लोकांना माहिती होतंच त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असलेल्या लाटेमुळे पक्षाला फायदा झाला, असं राणे यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदललं आणि उद्धव ठाकरेंच्या रुपानं पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्री बनली.

दुसरीकडे भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी आणि आता केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे.

एकूणच राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरच्या सोळा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी नारायण राणे आणि सेनेतली कटुता संपलीये असं दिसत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.