तृतीयपंथी वधू असणारी ही दागिन्यांची जाहिरात इतकी का चर्चेत आहे?

फोटो स्रोत, BHIMA JEWELLERY
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केरळमधल्या एका दागिन्यांच्या ब्रँडची जाहिरात सध्या बरीच चर्चेत आहे कारण या जाहिरातीत प्रमुख भूमिका एका तृतीयपंथी मॉडेलने केली आहे.
1 मिनिट 40 सेकंदांच्या या जाहिरातीत एका ट्रान्सवूमनची कहाणी दाखवली गेलीये. एक विचित्र दिसणारा किशोर, ज्याच्या चेहऱ्यावर भरपूर केस आहेत, ज्याला स्वतःवर विश्वास नाही आणि हळूहळू तो किशोर एका सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेल्या, सुंदर दागिने घातलेल्या वधूत कसा रुपांतरित होतो याची ही कथा आहे.
22 वर्षांच्या मीरा सिंधानिया रेहानीने या जाहिरातीत प्रमुख भूमिका निभावली आहे.
केरळची दागिन्यांची पेढी 'भीमा ज्वेलरी' ची ही जाहिरात आहे. एका ट्रान्समहिलेला तिच्या कुटुंबात कसं स्वीकारलं, कसं प्रेम मिळालं आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या कुटुंबाने तिला एका सुरेख दागिना देऊन तिच्या जगण्याचा उत्सव कसा साजरा केला याची कहाणी आहे ही.
या जाहिरातीचं नाव 'प्युअर अॅज लव्ह' म्हणजे 'प्रेमाइतकंच शुद्ध' असं आहे. एप्रिल महिन्यात रिलीज झालेल्या या जाहिरातीला आजवर यूट्यूब नऊ लाख आणि इंस्टाग्रामवर 14 लाखाहूनन जास्त व्ह्यूज मिळालेत.
ट्रान्सजेंडर लोकांच्या अडचणी
मीरा दिल्ली विद्यापीठात शिकते. ती सायकोलॉजीची विद्यार्थानी आहे आणि पार्टटाईम मॉडेलही आहे.
दोन वर्षांपूर्वी तिने आपल्या कुटुंबापासून वेगळं राहायला सुरुवात केली. मीरा म्हणते की दोन वर्षांपूर्वी तिने या जाहिरातीविषयी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तिच्या मनात अनेक शंका होत्या.
ती म्हणते, "माझ्या ट्रान्सवूमन या ओळखीचा कोणी व्यावसायिक स्तरावर फायदा घ्यावा असं मला वाटत नव्हतं. या जाहिरातीत माझ्या आयुष्यात आजवर झालेले बदल दाखवले जाणार होते. या गोष्टीची धाकधूक मनात होती. यातला एक बदल म्हणजे मला दाढीमिशी असलेल्या तरुणाच्या रूपात दाखवणार होते."
"पण जेव्हा मी याची कथी ऐकली आणि या जाहिरातीच्या दिग्दर्शकांविषयी रिसर्च केला तेव्हा मी हो म्हणाले. मला आनंद आहे की मी ही जाहिरात केली. या जाहिरातीमुळे मला माझीच ओळख नव्याने कळाली."
एका अंदाजानुसार भारतात 20 लाख ट्रान्सजेंडर लोक आहेत. सन 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की ट्रान्सजेंडर लोकांनाही इतरांच्या बरोबरीने हक्क आहेत.
तरीही ट्रान्सजेंडर लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत. आजही समाजात ट्रान्सजेंडर लोकांकडे हीन दृष्टीने पाहिलं जातं.
केरळची ट्रान्सजेंडर पॉलिसी
बऱ्याचशा ट्रान्सजेंडर लोकांना त्यांच्या घरचे लोक घराबाहेर काढतात. यातले बरेचसे लोक लग्नात किंवा मुलांच्या जन्मानंतर नाच-गाणं करून आपलं पोट भरतात. काही भीक मागतात तर काही देहविक्रय करतात.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रान्सजेंडर लोकांसाठी भारतात केरळ सगळ्यात चांगली जागा समजली जाते. सन 2015 मध्ये केरळने ट्रान्सजेंडर पॉलिसी आणली. याचा उद्देश ट्रान्सजेंडर लोकांप्रति होणारा भेदभाव संपवणं हा होता. असं करणारं केरळं पहिलं राज्य होतं.
पण तरीही भारतात इतर राज्यांसारखी केरळमध्येही ट्रान्सजेंडर लोकांना वाईट दर्जाची वागणूक दिली जाते.
भीमा ज्वेलरीच्या ऑनलाईन मार्केटिंग डिव्हीजन हेड नाव्या राव यांनी अशी जाहिरात बनवण्याची कल्पना मांडली.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की या कल्पनेबद्दल त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी शंका उत्पन्न केल्या.
नाव्या राव म्हणतात की, "आमच्या आधीच्या सगळ्या जाहिरातींमध्ये हसत्याखेळत्या नवऱ्या केंद्रस्थानी होत्या. त्यामुळे लोक या जाहिरातीकडे कसे पाहतील आणि काय प्रतिक्रिया देतील याबद्दल आम्हाला चिंता होती."
"आमची बहुतेक दुकानं केरळच्या ग्रामीण भागात आहेत. भागातले लोक या मुद्द्याबद्दल जागरूक असतील की नाही याची आम्हाला खात्री नव्हती."
तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाने चिंता वाढवली
96 वर्षं जुनी असलेल्या या दागिन्यांच्या पेढीने ही वेगळी जाहिरात बनवण्याचं ठरवलं. कंपनीची दक्षिण भारतात अनेक दुकानं आहेत, आणि संयुक्त अरब अमिरातीतही एक दुकान आहे.
ही जाहिरात बनवण्यामागे कंपनीचा हेतू एक सामाजिक संदेश देणं आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या अधिकारासाठी चर्चा घडवणं हा होता.

फोटो स्रोत, Bhima jewellery
नाव्या राव म्हणतात की अशा प्रकारच्या जाहिरातीने कंपनीचं नुकसानही होऊ शकतं याची त्यांना कल्पना होती.
गेल्यावर्षी दागिन्यांचा आणखी एक ब्रँड तनिष्कने आंतरधर्मीय विवाहाबदद्ल जाहिरात केली होती त्यावरून उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तनिष्कवर जोरदार टीका केली होती. यानंतर कंपनीला ही जाहिरात मागे घ्यावी लागली होती.
मीरा म्हणते की याही जाहिरातीवरून वाद होईल असं तिला वाटलं होतं. "या जाहिरातीत तर एक हिंदू लग्न दाखवलं गेलं होतं जे सरळसरळ पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देत होतं."
क्रांतिकारी पाऊल
पण या जाहिरातीला काही तुरळक टीकेला सामोरं जावं लागलं. पण टीकेच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
नव्या या प्रतिसादाने भारावून गेल्या आहेत. त्या म्हणतात, "या जाहिरातीवर थोड्या प्रमाणात टीका झाली. आमच्यावर आरोप केला गेला की आम्ही त्या मुद्द्यावर चर्चा करतोय जो नैसर्गिक नाही. ही गोष्ट समाजात असायला नको."
"पण आमच्या इनबॉक्समध्ये सकारात्मक संदेशांचा जणूकाही पूर आला होता. यातले अनेक लोक LGBTQ समाजातले होते. त्यातल्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की या जाहिरातीने त्यांच्या काळजाला हात घातला."
व्हीडिओ प्लॅटफॉर्म 'फायरवर्क' च्या ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट सुधा पिल्लई यांच्या मते ही जाहिरात म्हणजे 'क्रांतिकारी पाऊल' आहे.
त्या म्हणतात, "मी एका मल्याळी न्यूज चॅनलवर ही जाहिरात पाहिली. मला वाटतं या जाहिरातीवरून ते त्यांचे दागिने तर विकू शकणार नाहीत पण त्यांचा उद्देश जर लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं हा असेल तर त्यात ते यशस्वी झालेले आहेत."
"मी आजवर कोणत्याच पारंपारिक ब्रँडला इतकं परिणामकारक काही करताना पाहिलेलं नाही. एका पारंपारिक दागिन्यांच्या ब्रँडने अशा प्रकारचं पाऊल उचलणं क्रांतिकारीच होतं."
इंस्टाग्रामवर अनेक लोकांनी हा व्हीडिओ सुंदर आहे असं म्हटलं आणि काहींनी असंही म्हटलं की हा व्हीडिओ पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
यूट्यूबवर एका व्यक्तीने लिहिलं की, "मला पडद्यावर यायला प्रेरणा देईल अशा व्यक्तीला भेटवल्याबद्दल धन्यवाद."
गेमचेंजर ठरणार?
भारतात ट्रान्सजेंडर लोकांना सहसा विनोदी पात्र म्हणून पडद्यावर दाखवलं जातं. सुधा पिल्लई म्हणतात की अशा प्रकारच्या जाहिराती गेम चेंजर ठरतील.
त्या म्हणतात, "जाहिराती आणि टीव्ही सीरियल्सचा चित्रपटांच्या तुलनेत खूप जास्त फरक पडतो. ते लोकांच्या घरात वारंवार दाखवले जातात आणि त्यांच्यात लोकांच्या विचारांवर परिणाम करण्याची ताकद असते. अशा जाहिराती पाहून लोक सुरुवातीला कचरतील पण लोकांचे विचार बदलण्यासाठी हे गेमचेंजर ठरू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








