You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BMC : पेंग्विनच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आदित्य ठाकरेंवर निशाणा का साधतंय?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतील भायखळ्याच्या राणीच्या बागेत असलेले पेंग्विन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण मुंबई महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटी रूपयांची निविदा काढली आहे.
या निविदा प्रक्रियेवरून कॉंग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक आणि नेते रवी राजा यांनी 'पेंग्विनची निविदा म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे' असा आरोप केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या निविदेवरून कॉंग्रेस विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटल्याचं चित्र आहे.
तर भाजपकडून निधीअभावी विकास कामं थांबलेली असताना पेंग्विनवर उधळपट्टी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
किंमत वाढल्यामुळे शिवसेना विरूद्ध कॉंग्रेसचा वाद?
2017-18 मध्ये दक्षिण कोरियातून 'हम्बोल्ड' पेंग्विन राणीच्या बागेत आणले गेले. पेंग्विन खरेदीसाठी आणि त्यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष तयार करण्यासाठी एकूण 25 कोटींचा खर्च करण्यात आला.
त्यानंतर 7 सप्टेंबर 2018 साली पेंग्विनच्या देखभालीसाठी 11 कोटींची निविदा काढण्यात आली. तीन वर्षांसाठी असलेली ही निविदा येत्या 7 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली. पण तीन वर्षांनंतर 11 कोटींच्या खर्चात अजून 4 कोटींची वाढ झाली आहे.
यंदा 15 कोटींची निविदा काढण्यात आल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी शिवेसेनेवर आरोप करत असताना म्हटलं आहे, "पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचे डॉक्टर्स नेमणं शक्य असताना निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची काय गरज आहे? जेव्हा पेंग्विन परदेशातून आणले गेले तेव्हा त्याची देखभाल महापालिकेचे डॉक्टर्स करत होते. आपल्या डॉक्टरांना त्या पेंग्विनच्या देखभालीबाबत पुरेशी कल्पना आहे.
"मग निविदा काढून कंत्राटदार नेमण्याची काय गरज आहे? एकीकडे कोरोना काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. कोट्यावधींच्या कंत्राटामुळे अंड्याची संख्या वाढत जाऊ कंत्राटदारांचे खिसे भरणार आहेत. ही निविदा रद्द करण्यात यावी."
कॉंग्रेसने केलेल्या या आरोपांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "पेंग्विनच्या देखभालीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विरोधी पक्षाला जे खर्चाचे आक्षेप आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. "
पेंग्विनवर खर्च किती आहे?
निविदा काढलेल्या रकमेत पेंग्विनची वातानुकूलित सुविधा, पेंग्विनच्या प्रदर्शनाची देखभाल, लाईफ सपोर्ट, इलेक्ट्रिक सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकारी, पेंग्विनसाठी मासे आणि इतर खाद्य याचा खर्च केला जातो.
राणीच्या बागेत एकूण सात पेंग्विन आहेत. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'एका पेंग्विनचा दररोज 20 हजार रुपये खर्च आहे. त्यानुसार सात पेंग्विनवर एका दिवसाला दीड लाख इतका खर्च होतो. यानुसार एका वर्षाचा एका पेंग्विनचा खर्च 71 लाख रूपये आहे. सात पेंग्विनचा वार्षिक खर्च साधारण 5 कोटी आहे. तीन वर्षांसाठी 15 कोटींची निविदा काढण्यात आली आहे.'
राणी बागेचे व्यवस्थापक डॉक्टर संजय त्रिपाठी सांगतात, "राणी बागेत येण्यासाठी लहान मुलांना 25 रूपये तिकीट आहे तर मोठ्या माणसांना 50 रूपये तिकीट आहे. पेंग्विनसाठी आपण वेगळे पैसे आकारत नाही. पण 99% लोक हे पेंग्विन पाहण्यासाठी बागेत येतात. लॉकडाऊनमुळे बाग बंद होती. पण 2019-20 साली तिकीटमधून मिळालेल्या रकमेचा आकडा हा 6 कोटींच्या घरात होता. राणी बागेत पेंग्विन आल्यामुळे पर्यटकांची संख्याही अधिक वाढली आहे."
लक्ष्य मुंबई महानगरपालिका निवडणूक
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी यामागचं कारण समजावून सांगितलं.
ते म्हणतात, "कॉंग्रेस मुंबई महापालिका निवडणूकीत स्वतंत्र लढणार हे जगजाहीर आहे. त्यामुळे अचानक एक दिवशी पहाटे उठून टीका करता येणार नाही. त्यासाठी पूर्वतयारी करावी लागेल. त्यादृष्टीने कॉंग्रेसने शिवसेनेवर केलेली ही टीका आहे असं वाटतं. शिवसेना भाजप हे राज्यात एकत्र होते. पण कल्याण डोंबिवलीच्या महापालिका निवडणूकीत जबड्यात हात घालून दात मोजण्यापर्यंत भाषा गेली होती. कॉंग्रेसने पेंग्विनच्या या निविदेवर टीका करणे हा याच राजकारणाचा भाग आहे."
लोकसत्ताचे पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "मुंबई महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. राज्यातलं सरकार जरी नीट चाललं असलं तरी, आमची शिवसेनेबरोबर हात मिळवणी हे कॉंग्रेसला सातत्याने दाखवण्याची गरज आहे. आता पेंग्विनच्या मुद्यातून कॉंग्रेसला आदित्य ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. त्याची चर्चाही झाली. त्यामुळे यात कॉंग्रेस आपला राजकीय अजेंडा आहे हे उघड आहे."
खर्चाच्या बाबतीत जे समोर आले आहे ते लोकांना पटण्यासारखं आहे. त्याचा योग्य फायदा कॉंग्रेसने घेतला आहे, असं प्रधान यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)