You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजू शेट्टी- आमचं राजकारण सत्तेसाठी नाही, सगळ्यांचे हिशेब चुकते करणार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. राजू शेट्टी- आमचं राजकारण सत्तेसाठी नाही, सगळ्यांचे हिशेब चुकते करणार
विधान परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजू शेट्टी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आम्हाला जागा दिली नाही तरी हरकत नाही. सर्वांचे हिशेब चुकते करायला समर्थ असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. लोकसत्तानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्यात आलेल्या नावांमध्ये राजू शेट्टी यांचा समावेश होता. पण महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या नावाची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
त्यावर बोलताना राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशाराच दिला आहे. ''सगळ्यांची वेळ येत असते आणि प्रत्येकाचे हिशेब चुकते करायला मी समर्थ आहे,'' असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या संकटानंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोर्चे काढले होते, तसंच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर सरकारनं त्यांच्या नावाची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
''राजकारण करताना आमदारकी मिळवणं हा आमचा उद्देश नाही. भविष्यातदेखील तसं असणार नाही. त्यामुळं विधानपरिषदेची जागा मिळाली नाही म्हणून फारसा फरक पडत नाही. मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत,'' असं शेट्टी म्हणाले.
2 .कल्पिता पिंपळेंची मुख्यमंत्र्यांकडून फोनवर चौकशी, दोषींनी कठोर शिक्षेचं आश्वासन
फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे मनपाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी केली.
गुन्हेगारांना शिक्षा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कल्पिता यांना दिलं. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कल्पिता यांनी बरं झाल्यावर पुन्हा कारवाई सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. ''कारवाईची काळजी करू नका, ती जबाबदारी आता आमची आहे. तुम्ही लवकर बऱ्या व्हा,'' असं उद्धव ठाकरे यांनी कल्पिता यांच्याशी बोलताना म्हटलं.
पिंपळे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना या प्रकरणातील आरोपींनी शिक्षा व्हायला हवी अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
त्यावर, "तुम्ही चिंता करु नका. दोषींना नक्की शिक्षा होईल आणि अगदी कठोर शिक्षा होईल," असं मुख्यमंत्री म्हणाले.
''मी रोज या प्रकरणाची माहिती घेत आहे. मला रोज यासंदर्भातील रिपोर्ट मिळतात. पण केवळ या प्रकरणाचं राजकारण करायचं नाही, म्हणून भेट घ्यायला आलो नाही,'' असं मुख्यमंत्री फोनवरून बोलताना म्हणाले.
3. ठाण्याच्या धर्तीवर भिवंडीत म्हाडाची 20 हजार घरे उभारणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
भिवंडी महानगरपालिकेनं भूखंड उपलब्ध करून दिल्यास म्हाडाच्या वतीनं 20 हजार घरे उभारण्याची तयारी असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीनं याबाबचं वृत्त दिलं आहे.
भिवंडीमध्ये शुक्रवारी (3 सप्टेंबर) इमारत कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर 6 जण जखमी झाले. त्याठिकाणी भेट देण्यासाठी आव्हाड आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घरांची घोषणा केली.
ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये म्हाडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणांवर घरांची निर्मिती करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भिवंडीतही घरं बांधली जाणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
4. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार नाट्यगृहं, काय आहेत नियम?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास सगळ्या सेवा हळू-हळू सुरू झाल्या. पण नाट्यगृहं अजूनही बंद आहेत. मात्र आता 5 नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृहं 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी शुक्रवारी (3 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातली नाट्यगृहं सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
त्यानंतर याविषयी तातडीनं अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला. 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहं सुरू करण्याचे आदेश तातडीनं प्रशासनाला देण्यात आले.
कोरोनाच्या काळात गेल्या जवळपास एका वर्षापेक्षा अधिक काळापासून नाट्यगृहं बंद असल्यानं यावर अवलंबून असलेल्या कलाकार आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळं या निर्णयानं या सर्वांना दिलासा मिळणार आहे.
5. लहान मुलांसाठी आणखी एक लस, कॉर्बेव्हॅक्सच्या मानवी चाचणीला परवानगी
लहान मुलांना कोरोनाचं लसीकरण करता यावं यासाठी अनेक लशींच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. त्यात आता लहान मुलांसाठीच्या आणखी एका लशीच्या मानवी चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेव्हॅक्स लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला मंजुरी देण्यात आली आहे. पाच वर्षांवरील मुले आणि प्रौढांच्या चाचणीसाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती बायोटेक्नॉलॉजी विभागानं दिली.
या लशीची निर्मिती कॉर्बेव्हॅक्स बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काऊन्सिल यांच्या माध्यमातून केली जात आहे.
लसीकरण मोहिमेमध्ये मुलांचं लवकरात लवकर लसीकरण करून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना अधिकाधिक लशींना मान्यता मिळाल्यास लहान मुलांचं लसीकरणही लवकर होण्यास मदत होऊ शकेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)