बाळंतपणाविषयी या 6 गोष्टी 'खोट्या' असल्याचं तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील चित्रपटांमध्ये बाळंतपण अनेकदा दाखवलं जात असलं, तरी ते चित्रण प्रत्यक्षातील बाळंतपणाच्या प्रक्रियेपासून बरीच फारकत घेणारं असतं.
अमेरिकेतील चित्रपटांमध्ये असंख्यवेळा बाळंतपणाची दृश्यं आलेली आहेत, पण बहुतेकदा त्याचं वास्तव जीवनाशी काहीही साधर्म्य नसतं.
वेड्यापिशा झालेल्या स्त्रिया, अचानकपणे बालकाभोवतीचं पाण्यासारखं आवरण तुटणं, अशा गोष्टी आपण किती वेळा पाहतो? स्वतःला सावरता न आल्यामुळे बाळंतिणीच्या खोलीतच बेशुद्ध पडणाऱ्या नवऱ्यांचं काय?
अगदी नाजूकपणे ठेवलेल्या चादरीवर आडवं पडून छताकडे किंवा कॅमेऱ्याकडे पाहणारी गोंडस बाळं तेवढी समोर येतात.
'धिस इज गोइंग टू हर्ट' या पुस्तकामध्ये ब्रिटिश डॉक्टर अॅडम के यांनी बाळंतपणावेळी काय होतं याचं तपशीलवार वर्णन केलं आहे. त्या पुस्तकाचा आधार घेत आणि तीन तज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही हॉलिवूडने रुजवलेल्या बाळंतपणाविषयीच्या सहा मिथकांचा दंभस्फोट करणार आहोत.
1. आपला जन्म वर पाहात होत नाही
बहुतांश बाळंतपणांमध्ये मातेच्या योनिमार्गातून पहिल्यांदा बालकाचं डोकं बाहेर येतं.
चित्रपटांमध्येही असं घडतं. पण पडद्यावर नुकतंच जन्मलेलं बालक वर बघताना दाखवलेलं असतं, जेणेकरून तुम्हाला त्यांचा इवलासा गोंडस चेहरा दिसावा. हे वास्तवाशी सुसंगत मात्र नसतं.
नव्वद टक्क्यांहून अधिक बालकांचं डोकं आधी बाहेर येतं आणि ते खालच्या बाजूला वळलेलं असतं, त्यांचे गाल छातीपाशी टेकलेले असतात, ढुंगण वर उचललेलं असतं आणि त्यांचे पाय व हात त्यांच्या शरीरालगत दुमडलेले असतात.
म्हणजेच त्यांचा चेहरा मातेच्या पाठीकडे वळलेला असतो. त्यामुळे कॅमेऱ्याला बाळाच्या डोक्याच्या मागची बाजू दिसू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
"मुलं खाली बघत किंवा किमान थोडंसं बाजूला बघत जन्माला येणं ही सर्वाधिक नैसर्गिक स्थिती आहे," असं बार्सेलोना, स्पेन इथले स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूतितज्ज्ञ दामिआन डिक्सेअस म्हणतात.
"बालकासाठी पुरेशी जागा वापरली जाणं हे यामागचं कारण असतं. बालकं खाली बघत असतील तर मातेच्या ओटीपोटातील बहुतांश जागा त्यांना उपयोगात आणता येते," असं ते सांगतात.
"चित्रपटांमध्ये बहुतेकदा बालकं वरती बघत, त्यांचे डोळे उघडे असलेल्या अवस्थेत- किंबहुना स्मित करत, जन्माला आल्याचं दाखवतात! हे अर्थातच अगदी असाधारण आहे," असं डॉक्टर डिक्सेअस म्हणतात.
शिवाय, चित्रपटात दाखवतात तितक्या स्वच्छ अवस्थेत मुलांचा जन्म होत नाही.
"मुलं कधीही पूर्ण स्वच्छ अवस्थेत जन्माला येत नाहीत. हा चित्रपटांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रश्न आहे की कालविपर्यास आहे ते काही मला माहीत नाही," असं डिक्सेअस म्हणाले.
पूर्वी रुग्णालयांमध्ये बालकांचा जन्म झाल्यावर लगेचच त्यांना आंघोळ घालून त्याभोवतीचं पांढरं, चरबीयुक्त आवरण (गर्भ-मेदावरण) काढून टाकलं जात असे, मग पूर्ण स्वच्छ अवस्थेत बालक मातेच्या स्वाधीन केलं जात होतं.
पण अत्याधुनिक वैद्यकीय पद्धती अवलंबणाऱ्या ठिकाणी आता असं होत नाही, असं ते सांगतात. जन्मानंतर काही तास ते आवरण तसंच ठेवल्याने बालकाला अनेक लाभ होत असल्याचं अभ्यासांमधून स्पष्ट झालं आहे.
2. गर्भ-मेदावरण कसं तुटतं
मातेची उल्वीगुहिका अचानक कशी फुटते आणि गर्भजल कसं भसकन बाहेर पडतं, याच्या प्रतिमाही चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमध्ये सर्रास पाहायला मिळतात.
जवळपास लगेचच गरोदर महिलेला प्रसववेदना सुरू होतात.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, 'सेक्स अँड द सिटी' या टीव्ही-मालिकेमध्ये शार्लट एका रेस्टॉरन्टसमोर वाद घालत असते इतक्यात तिची उल्वीगहुका फुटते आणि ती टॅक्सीकडे धावते.
"उल्वीगुहिका (बालकाची वाढ ज्या गर्भजलात होते ते पाणी राखणारी पिशवी) फुटली आहे का, हे कळण्यासाठी तपासणी करावी लागते. आपल्या अंगावरून पाणी जात असल्याचं संबंधित मातेला कळतं, पण तिला ते स्पष्टपणे दिसत नाही," असं डॉ. डिक्सेअस सांगतात.
गर्भजल व लघवी यांच्यातील फरक ओळखणं वाटतं तितकं सोपं नसतं. विशेषतः केवळ ओलसरपणा किंवा थेंबभर द्रव्य असेल तर अंदाज येत नाही.
आणि सर्वसाधारणतः उल्वीगुहिका फुटणं हा बाळंत होण्याच्या सुरुवातीचा भाग नसतो, तर त्या प्रक्रियेचा एक भाग असतो.
"काही ताण आल्यावर बाळंतपणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, याची जाणीव सर्वसाधारणतः महिलेला होते, आणि त्यानंतर मग उल्वीगुहिका फुटते," असं इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ मिडवाइव्ह्ज (आयसीएम) या संस्थेसोबत कार्यरत असणाऱ्या प्रसविका अॅन येट्स म्हणतात.
"बाळंतपणाच्या खूप आधी उल्वीगुहिका फुटली, बाळ जन्माला येण्याच्या तयारीत असण्यापूर्वीच फुटली, तर त्यातून गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते," असं त्या सांगतात. गेली चाळीसहून अधिक वर्षं जगाच्या विविध भागांमध्ये अॅन यांनी बाळंतपणं केलेली आलेत.
3. बाळाला जन्म देतानाची मातेची स्थिती
चित्रपटांमध्ये अनेकदा बाळंत होणारी माता उंचावलेल्या पलंगावर बसलेली असते.
ज्यूनोमधील एलन पेजपासून नॉक्ट अपमधील कॅथरीन हिगलपर्यंत आणि फ्रेंड्समधील जेनिफर अॅनिस्टनपर्यंत अनेक दाखले या संदर्भात देता येतल.

फोटो स्रोत, Paula Bronstein/getty
वास्तविक मूल जन्माला घालताना बहुतांश माता अशा स्थितीत नसतात.
"युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेट्समध्ये सर्वसाधारणतः महिला अर्धवट बसलेल्या अवस्थेत असतात, त्यांचे पाय समोरच्या बाळंतपणासाठी वापरल्या जाणाऱ्या टेबलावर ठेवले जातात," असं डॉ. डिक्सेअस सांगतात.
"पण स्पेनसारख्या देशात आडवं होऊन गुडघ्यांच्या मागच्या बाजूला आधार दिलेल्या स्थितीत माता मुलाला जन्म देतात, असं अधिक वेळा दिसतं."
स्त्रीरोगविषयक तपासणी करण्यासाठी ही आडवी स्थिती वापरली जाते आणि ब्राझीलमध्येही बहुतेकदा माता अशा स्थितीत थांबून मुलांना जन्म देतात.
या दोन व्यतिरिक्त बाळंतपणाच्या इतरही अनेक स्थिती आहे, त्यांचा चित्रपटांमध्ये किंवा दूरचित्रवाणी मालिकांवर फारसा उल्लेख होत नाही. स्टूलवर बसणं किंवा एका बाजूला आडवं होणं, उभं राहणं, किंवा गुडघ्यांवर बसणं, अशाही स्थितीत बाळंतपणे केलं जातं.
माता बाळंत होण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे, त्यावरही ही स्थिती अवलंबून असते.
बाळंतपण वेगाने व्हावं यासाठी महिला तिची स्थिती बदलूही शकते.
बाळंतपणणाच्या विशिष्ट काल्पनिक चित्रणामुळे वास्तव जगात समस्या उद्भवत असल्याचं येट्स सांगतात.
"विशिष्ट स्थितीत मूल जन्माला घालणं महिलांसाठी अवघड असतं. दुर्दैवाने अनेक जणींनाच चित्रपटात होतं तशा पद्धतीने बाळंतपण होणं अपेक्षित असतं."
4. प्रसूतिपश्चात काळ कुठे आहे?
बाळंतपण झाल्यानंतर पहिल्या सहा आठवड्यांचा कालावधी हा प्रसूतिपश्चात काळ मानला जातो.
"चित्रपटांमध्ये प्रसूतिपश्चात काळाचा सर्वाधिक विसर पडलेला दिसतो," असं डॉ. डिक्सेअस सांगतात.
प्रसूतीनंतर होणाऱ्या विविध गोष्टी हॉलिवूडमधील चित्रपटांमधून क्वचितच दाखवल्या जातात.

फोटो स्रोत, Layland Masuda
गर्भवेष्टन काढणं आणि बाळंतपणावेळी मातेला झालेल्या जखमा भरून येणं, अशा अनेक गोष्टी असतात.
"प्रसूतीनंतरच्या निराशेचं चित्रण खूपच वरवरचं झाल्याचं दिसतं," असं डॉ. डिक्सेअस म्हणतात. जगभरात सरासरी दहातील एका महिलेला अशा निराशेला सामोजं जावं लागतं, असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगत असल्याचंही ते नमूद करतात.
स्तनपान किती गुंतागुंतीचं असू शकतं, बाळंतपणाचा महिलेच्या मूत्राशयावर कोणता परिणाम होतो व लघवीवरील नियंत्रण कमी होणं, हेसुद्धा चित्रपटांमध्ये दाखवलं जात नाही. प्रसूतीसंदर्भात स्त्रियांच्या शरीरात इतक अनेक अवघड स्वरूपाचे बदल होतात.
"सिझेरियन करून बाळंतपण झाल्यास त्यातून तब्येत पूर्ववत होणं किती अवघड असतं, हेसुद्धा चित्रपटांमध्ये दाखवलं जात नाही," असं डॉ. डिक्सेअस सांगतात. "या सगळ्या प्रतिमांमुळे बाळंतपण म्हणजे आरामदायी प्रक्रिया असल्याचं आपल्याला वाटतं, ही धोकादायक बाब आहे," असं ते म्हणतात.
5. वेदनेने किंचाळणं
वेदनेने माता किंचाळते आहे, हेसुद्धा चित्रपटांमध्ये सर्रास आढळणारं दृश्य आहे.
"पूर्वीच्या काळी बाळंतपणावेळी मातांना भूल दिली जात नसे," असं क्युबातील डॉक्टर जोसेफिना लोपेझ सांगतात.

फोटो स्रोत, Jose Luis Pelaez Inc/getty
"अवयवांवर येणारा ताण वेदनादायी असतो हे खरं आहे आणि ताण खूप वेळ राहिला तर माता थकून जाते. पण ती किंचाळण्याला केवळ वेदनेचंच कारण असतं असं नाही. अर्थात प्रत्येक जण वेदना वेगवेगळ्या तऱ्हेने सहन करतो."
"मेंदूच्या बाहेरच्या बाजूला भूल दिलेली असेल, तर हे घडत नाही."
चित्रपटांमध्ये काही वेळा बालंतपणावेळी महिला कमजोर झाल्याचं दाखवलं जातं, असं येट्स म्हणतात.
"स्त्रिया सक्षम असतात. हे जगभरात दिसतं," असं त्या सांगतात.
"बाळंतपण वेदनादायी असतं यात काही शंका नाही, पण बहुतेकदा न किंचाळता माता मुलांना जन्म देतात."
"काही वेळा त्या आवाज करतात, पण चित्रपटांमध्ये दाखवतात तशा किंकाळत मात्र कधीच नाहीत," असं येट्स नमूद करतात.
6. भांबावलेले पुरुष
अस्ताव्यस्त आणि चिंतातुर झालेल्या पित्याची प्रतिमाही चित्रपटांमध्ये सर्रास आढळते.
नाइन मंथ्स या विनोदी चित्रपटात ह्यू ग्रान्ट याने केलेली भूमिका हे याचं एक उदाहरण. डिलिव्हरी रूममध्ये पुरुषाने करू नयेत अशा सर्व गोष्टी तो करताना दाखवला आहे.
"खूप चिंतातुर होऊन पुरुषांचे चेहरे पांढरे पडल्याचं अनेकदा दिसतं. काही लोक तर खरोखरच बेशुद्ध पडतात," असं डॉ. डिक्सेअस सांगतात.
"डिलिव्हरी रूममधील पालकांचं चित्रपटांमध्ये होणारं चित्रण अतिशय हास्यास्पद असतं," असं ते म्हणतात.
हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये डिलिव्हरी रूममधील पुरुषाचं असणं उपद्रवी किंवा गोंधळलेलं दाखवलं जातं, असं येट्स म्हणतात.
"वास्तविक मातेसोबत येणारे अनेक स्त्री-पुरुष अगदी पूर्ण सुसंवाद साधत असतात," असं येट्स नमूद करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








