सुप्रिया सुळे : आमच्या सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे - #5मोठ्याबातम्या

सुप्रिया सुळे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. आमच्या सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे - सुप्रिया सुळे

"आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही," अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कोणाच्या आईला, कोणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे." लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या, विरोधी पक्षनेत्याची अनेक कामं मुख्यमंत्र्यांकडे असतात. आम्ही दोन्ही बाजूला राहिलो आहोत त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे. एखाद्या विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्यत गैर काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

2. 'हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा' - नितेश राणे

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. "हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा," असं नितेश राणे म्हणाले आहेत. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

नितेश राणे म्हणाले, "तुम्ही स्वच्छ असाल तर ईडी तुमच्यावर कारवाई करणार नाही. त्यामुळे हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. घाबरण्याचं काही कारण नाही."

नितेश राणे

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणाले, "अनिल परब यांनी आता पळपुटेपणा करू नये. ईडीसमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं."

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता होत असतानाच अनिल परब यांना ईडीची नोटीस आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी कायदेशील लढाई लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

युवासेनेनं नारायण राणेच्या जुहूमधल्या घराबाहेर केलेल्या आंदोलनासंदर्भात सुद्धा नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "घरच्या हल्ल्याचा हिशेब वेगळा होणार. त्याचा राजकारणाशी संबंध नाही."

3. महाराष्ट्रात साच्या शेतातून 5 टन गांजा जप्त

अहमदनगर जिल्ह्यात ऊसाच्या शेतातून पोलिसांनी 5 टन गांजा जप्त केला आहे. पाथर्डी तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत जवळपास 50 लाख आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.

गांजा

फोटो स्रोत, Getty Images

याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. या महिला गांजाची राखण करत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं आहे. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात ऊसाच्या शेतात गांजा ठेवला होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.

गांजावर राज्यात बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्याने यामागे एखादी टोळी कार्यरत असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

4. पोलिसांनी नोटीस बजावली तरीही मनसेकडून दहिहंडी उत्सवाची तयारी

ठाकरे सरकारने दहिहंडी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी यंदाही दहिहंडी साजरी करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. परंतु मनसेने सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

बाळा नांदगावकर, राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

ठाण्यात मनसेने दहिहंडी उत्सवाची तयारी सुरू केली असून पोलिसांनी याप्रकरणी 149 प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. तरीही मनसेकडून नौपाडा भागात दहीहंडीची तयारी सुरू आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

मनसेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील आले होते. "बंदी केवळ हिंदू सणांवरच का? बस, रेल्वे सर्व काही सुरू असताना केवळ सणांवर बंदी का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कितीही नोटीसा आल्या तरी दहिहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम आहे अशी भूमिका सुद्धा बाळा नांदगावकर यांनी मांडली.

5. बाळाला वडिलांचे नाव देण्यास नुसरत जहाँचा नकार

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. परंतु बाळाला वडिलांचं नाव देणार नसल्याची नुसरत यांची भूमिका आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

नुसरत जहां

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या बाळाचे नाव नुसरतने ईशान ठेवलं आहे. आपण सिंगर मदर म्हणूनच बाळाला सांभाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच बाळाच्या वडिलांच्या नावासा खुलासा करण्यासही नुसरतने नकार दिला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे.

2019 मध्ये नुसरत जहांने निखील जैन यांच्याशी विवाह केला. 2020 मध्ये मात्र ते वेगळे झाले. नुसरत जहाँ सध्या अभिनेता यश दासगुप्ता यांच्यासोबत लिव्ह इन संबंधांमध्ये आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)