दिवसभराच्या चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयाबाहेर

शिवसेनान नेते अनिल परब हे आज अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. काही तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर आले.
आपण ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली असं त्यांनी म्हटलं. ईडी ही ऑथोरिटी आहे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं काम आहे असं ते बाहेर आल्यावर म्हणाले.
आजपर्यंत (28 सप्टेंबर) परब यांनी ईडीसमोर हजर व्हावं असे आदेश अनिल परब यांना देण्यात आले होते.
ईडी कार्यालयात जाण्याआधी त्यांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य करू असं म्हटलं होतं.
'मी आज ईडीच्या कार्यालयात जाणार असून त्यांना सर्व सहकार्य करीन, मी काहीही चूक केलेलं नाही' असं अनिल परब यांनी म्हटल्याचं ट्वीट ANI वृत्तसंस्थेने केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्राचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. 28 सप्टेंबर 2021 पर्यंत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
याआधीही अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर ते हजर राहतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानुसार आज ते हजर होत आहेत.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट करून म्हटलं होतं की, "आशा आहे की, अनिल परब 28 सप्टेंबरला ईडीसमक्ष उपस्थित होतील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
याआधीही हजरेचे दिलेले आदेश
अनिल परब यांना ईडीने 31 ऑगस्ट रोजीही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. 29 ऑगस्ट संध्याकाळी अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) अनिल परबांना नोटीस पाठवली होती.
"नोटीस मिळाली, मात्र त्यात कोणत्या प्रकरणाबाबत नोटीस आहे याचा उल्लेख नाही. पण 31 तारखेला सकाळी 11 वाजता हजर राहायला सांगितलंय," असं अनिल परब यांनी नोटीस मिळाल्यानंतर सांगितलं होतं.
ही नोटीस मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
"ईडीने त्यांचा एक अधिकारी भाजपच्या कार्यालयात ठेवला आहे किंवा भाजपचा कोणीतरी एक पदाधिकारी ईडीच्या कार्यालयात काम करतो," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
आमच्या मंत्र्याना नोटीस मिळाली आहे, त्यांना किती वाजता बोलवलं आहे हे भाजपच्या नेत्यांना कसं कळतं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
'या प्रेमपत्राचं स्वागत करतो'
संजय राऊत यांनी म्हटलं होतं, "या प्रेमपत्राचं आम्ही स्वागत करतो. नोटीस पाठवण्यासंदर्भात वेळ पाहिली तर लक्षात येईल. भाजपचे नेते सातत्याने अनिल परब यांचं नाव घेत होते. राजकारणात काम करत असताना अशी प्रेमपत्र येत असतात. ते शिवसेनेचे आहेत. अशानं सरकार किंवा शिवसेना कमजोर होईल असं नाही.
हा सैतानी कारभार आहे. महाविकास आघाडीचं सरकार भक्कम राहणार. आम्ही तयार आहोत जे करायचं आहे ते करा."

फोटो स्रोत, ANI
अनिल परब यांनी नोटीस मिळाल्यावर म्हटलं होतं की, "अशी नोटीस येईल, याची अपेक्षा होतीच. कायदेशीर प्रक्रिया करेन. हजर राहायचं की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेईन."
कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू - संजय राऊत
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) नोटीस आल्याची माहिती सर्वप्रथम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली.
संजय राऊत यांनी ट्विटरवरून सांगितलं की, "जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समझ लिजिए."
तसंच, कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
अनिल परब यांना नेमक्या कुठल्या प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे, हे संजय राऊत यांनी सांगितलं नाही. त्यामुळे ही नोटीस नेमक्या कोणत्या प्रकरणात आहे, हे अस्पष्ट आहे.
सूडाचं राजकारण सुरू आहे - अरविंद सावंत
सूडाचं राजकारण सुरू असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केली.
"इतकं गलिच्छ राजकारण पाहिलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेलं काहींना पाहावलं नाही. त्यामुळे दररोज कुरघोड्या केल्या जातात. सामाजिक जीवनात छळलं जातं," असं सावंत यांनी म्हटलं.
"आमच्याकडे आलात तर तुम्ही देशभक्त आणि नाही आलात तर तु्न्ही देशद्रोही असं सुरू आहे," असंही सावंत यांनी म्हटलं.
असा आहे अनिल परब यांचा राजकीय प्रवास
अनिल दत्तात्रय परब हे मागच्या 20 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. बीकॉमनंतर एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं ते पेशाने वकील आहेत.
वकिली करता करता सार्वजनिक उत्सवाचे आयोजन, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिरं, आरोग्य तपासण्या, सामान्यांना कायदे विषयक मोफत सल्ले अश्या कार्यक्रमांमधून ते राजकारणात सक्रिय होत होते.
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जायचे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जी आंदोलनं व्हायची त्यात परब यांचा पुढाकार असायचा. 2001 साली पहिल्यांदा ते शिवसेनेचे विभाग प्रमुख झाले. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाची सुरवात झाली.
2015 साली पहिल्यांदा प्रकाशझोतात?
अनिल परब यांच्या कामाची दखल घेऊन 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विधानपरिषदेवर वर्णी लागली. परब हे 2004 ते 2010, 2012 ते 2018 आणि 2018 साली फेरनिवड अशा पध्दतीने ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2015 साली अनिल परब हे प्रकाशझोतात आले. जानेवारी 2015 मध्ये वांद्रे पश्चिमचे आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं.
त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सामंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेसकडून नारायण राणे हे रिंगणात उतरले.
राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. तृप्ती सावंत यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. तृप्ती सावंत विरूद्ध राणे यापेक्षा शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष वांद्र्यात रंगला होता. या निवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे अनिल परब यांच्यावरचा विश्वास वाढत गेला.
2017 साली महापालिकेची जबाबदारी
2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. यादरम्यान शिवसेना भाजपची महापालिकेत असलेली युती तुटली. मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला अनेकदा घेरण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी अनिल परब यांनी भाजपच्या सर्व आरोपांना उत्तरं दिली. जेव्हा गरज होती तेव्हा कायद्याच्या आधारावर अनिल परब समोर येऊन बोलू लागले.

फोटो स्रोत, Twitter/Anil parab
या निवडणुकीत अनिल परब यांच्यावर प्रमुख जबाबदार्या देण्यात आल्या होत्या. या निवडणुकीच्या रणनितीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे पडून पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा चर्चेत आला. शिवसेना महापालिकेत पुन्हा सत्तेत बसली. अनिल परब यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी चोख पाडली त्यामुळे त्यांच्याबाबतची पक्षात प्रतिमा उंचावत गेली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








