नारायण राणे अटक : 'शिवसैनिकांची गर्दी जमवली, मग 'कोरोना हृदय सम्राट' गप्प का?'- संदीप देशपांडे

"महाराष्ट्रात दिवसभर कायदा सुव्यवस्था 'फाट्यावर' मारुन आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सुरक्षित अंतर राखलं जात नाही. तेव्हा 'कोरोना हृदय सम्राट' गप्प का?" असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नारायण राणे यांच्या निषेधार्थ मुंबईसह ठाणे,नाशिक, जळगाव, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलं.

मुंबईतील जुहू परिसरात नारायण राणे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

एकाबाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामान्य नागरिकांसाठी निर्बंध लागू करतात आणि दुसऱ्या बाजूला ते पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरुन आंदोलनात गर्दी करतात अशी टीका केली जात आहे.

संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

ते म्हणाले, "आज सकाळ पासून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था "फाट्यावर"मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही गर्दी च गर्दी अस असून "करोना हृदय सम्राट"गप्प का?आणि हो सोशल डिस्टनसिंग चा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत."

'मग दहीहंडी उत्सवालाही परवानगी द्या'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सूचना केली. आरोग्य अधिक महत्त्वाचं असल्याने यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करू नये असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात कुठेही रस्त्यावर उतरुन दहिहंडीचा सण साजरा करता येणार नाहीय.

उद्धव ठाकरे यांची ही भूमिका आणि शिवसैनिकांचे विसंगत वर्तन यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना गर्दी करण्यापासून का रोखत नाहीत? शिवसैनिकांना गर्दी करण्याची परवानगी आहे का? मग दहीहंडी उत्सवाला मनाई का करण्यात आली? अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे नेते सचिन अहिर म्हणाले, "दहीहंडी उत्सव आणि आजच्या आंदोलनाची तुलना करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांबाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले त्यासंदर्भात शिवसैनिकांनी दिलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ती नियोजित नव्हती. पण कायदा सर्वांसाठी सारखा आहे म्हणूनच पोलीसांनी शिवसैनिकांवरही लाठीचार्ज केला."

"दहीहंडी उत्सवात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं शक्य नाही म्हणून आपण दहीहंडी उत्सव साजरा करत नाही आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'भाजपची जनआशीर्वाद यात्रा नियमबाह्य'

भाजपचे नवनीर्वाचित केंद्रीय मंत्री राज्यभरात कार्यकर्त्यांसह जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दीही या यात्रांमध्ये दिसून येत असल्याने भाजपवर टीका केली जात आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत केलं जात नसून एवढ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन यात्रा काढण्यासाठी भाजपनेही परवानगी घेतली नसल्याचं सचिन अहिर म्हणाले.

"जनआशीर्वाद यात्रा काढणार्‍यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांना राज्य सरकारची कोणतीही परवानगी देलेली नाही. ते नियम मोडून गर्दी जमा करत आहेत. नियम सर्वांसाठी समान आहेत. आज शिवसैनिकांनी तोडले तरी त्यांच्यावर कारवाई झालीच आहे."

जनआशीर्वाद यात्रा असो वा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम राजकीय पक्ष मात्र स्पर्धेसाठी नियमांना धाब्यावर बसवताना दिसतात असं तज्ज्ञ सांगतात.

लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, "राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून 'ते आणि आम्ही' हा संघर्ष सुरू आहे. ते जनआशीर्वाद यात्रा काढतात मग आम्ही का नाही काढायची? ते ईडीचा वापर करतात मग आम्ही पोलीसांचा का नाही करायचा? ते गर्दी जमवतात मग आम्ही का नाही जमवायची? हा संघर्ष बंद केला पाहीजे."

'उद्धव ठाकरे शिवसैनिकांवर कारवाई करणार का?'

कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन कोणीही करत असलं तरी नियमानुसार कारवाई अपेक्षित आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता रस्त्यांवर उतरलेल्या शिवसैनिकांवर कारवाई करणार का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

लोकसत्ताचे पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "जरी मुख्यमंत्र्यांनी गर्दी न जमवण्याचं आवाहन केलं असलं तरी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे घेणार नाहीत. सध्या ते शांत राहतील आणि नंतर त्यांना गर्दीबाबत विचारलं की ते शिवसैनिक स्वतः उतरले असं सांगतील. त्यामुळे नेत्यांनी अजेंडा जाहीर करणं आणि कार्यकर्त्यांनी तो त्यांच्या प्रेमापोटी मोडणं हा राजकारणाचा भाग आहे."

"या आंदोलनानंतर शिवसैनिकांवर किती आणि कशी कारवाई होणार? किंवा होणार की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे," असंही ते म्हणाले.

राज्यात भाजप हा प्रमुख विरोधक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत असून त्याचं नेतृत्त्व शिवसेनेचे मुख्यमंत्री करत आहेत. तेव्हा शिवसेनेने अधिक जबाबदारीने वागायला हवं असंही जाणकार सांगतात.

संदीप प्रधान म्हणाले, "मुख्यमंत्री वैयक्तिक बोलताना म्हणतात गर्दी जमवू नका. पण राजकारणाचा मुद्दा येतो तेव्हा त्याला छेद दिला जातो. मुळात कोरोनाची काळजी घेणं ही सामूहिक जबाबदारी आहे. पण राजकीय गोष्टींसाठी जे नियम धाब्यावर बसवले जातात त्यात सामान्य माणूस भरडला जातोय. जर तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात असेल तर राजकारण्यांनी सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करावा. आपण एकीकडे निर्बंध आणतो आणि दुसरीकडे राजकीय पक्ष ते तोडतात. हे योग्य नाही."

नेमकं काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. रविवारी (22 ऑगस्ट) रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.

"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही", अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या विधानाचे पडसाद उमटले. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)