नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची कारवाई, भाजपचं चक्काजाम आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीमधून नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक एसपी राणेंना अटक करण्यासाठी आले असल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.

"पोलीस अधीक्षक म्हणतात की आमच्यावर दबाव आहे. पण त्यांच्याकडे कोणताही अटक वॉरंट नाही," अस प्रमोद जठार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. हे कायद्याचं राज्य आहे वॉरंट दाखवा आम्ही गाडीत बसून यायला तयार आहोत, असं ते पुढे म्हणाले.

नारायण राणे काही खुनी नाहीत ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी असा काय गुन्हा केला आहे, असा सवाल जठार यांन केला आहे.

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राणेंच्या वक्तव्यावरून राज्यात ठिकठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.

राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे .नाशिक मधल्या केससाठी रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का, असा सवाल विचारत कोर्टानं हा अर्ज फेटाळला आहे. तांत्रिक मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला.

परिणामी नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण हायकोर्टानं त्यांच्या जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. या जीमन अर्जावर तातडीने सुनावणी का गरजेची आहे याची माहिती द्या, असा सवाल कोर्टानं राणेंच्या वकिलांना केला आहे.

वक्तव्याचं समर्थन नाही पण पक्ष राणेंच्या पाठीशी-फडणवीस

"मुख्यमंत्र्यासंदर्भात बोलताना संयम बाळगणं आवश्यक. बोलण्याच्या भरात राणे बोलले असतील. भाजप राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भाजप राणेंबरोबर आहे", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"शर्जील उस्मानी राज्यात येतो. भारतमातेला शिव्या देतो, हिंदूंना शिव्या देतो. आक्षेपार्ह भाषेत बोलतो. त्याच्यावर कारवाई करता येत नाही. मात्र अख्खं पोलीस दल राणेंना अटक करण्यासाठी काम करतं. कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नाही", असं फडणवीस म्हणाले.

आमच्या कार्यालयावर चालून आले, तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोक आहोत असं ते म्हणाले.

"पोलीस दलाचा गैरवापर. निष्पक्ष म्हणून पोलीस दल ख्यातीप्राप्त. परंतु या सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात पोलीस दलाचा ऱ्हास झाला आहे. बस म्हटलं की लोटांगण घालत आहे. सरकारला खूश करण्याकरता पोलीस दल कारवाई करत राहिलं तर प्रतिमा खराब होईल",

"या सरकारच्या काळात वसूलीकांड झालं. प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका बसला. अशा परिस्थितीत पोलिसांचा वापर सरकार करतंय, अलीकडे पोलीसजिनी सरकार. न्यायालयातर्फे चपराक बसते आहे.

"लाथा घाला, चौकीदार चोर है म्हणतात. आमच्याविरुद्ध, कुटुंबीयांविरुद्ध बोलतच असता. दुटप्पी भूमिका असू नये. राणेंच्या वक्तव्याप्रकरणी कारवाई अयोग्य आहे", असं ते म्हणाले.

राज्यभरात भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने

महाड, नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत. तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व शांतता बाधित होईल असे चिथावणी देणारे वक्तव्य दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी युवा सेनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमो आले आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दगडफेक सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली असा आरोप युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी केला.

आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी सेनेच्या कार्यकर्त्यांना अडवून धरलंय तर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोसायटीच्या आत ढकललं आहे.

पुण्यातही आंदोलन

पुण्यात गुडलक चौकात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन या नारायण राणे यांच्या मालकीचा मॉल आहे त्या मॉलच्या प्रवेश द्वारा जवळील एक काच शिवसैनिकांनी फोडली.

चिपळूणमध्ये सेना-भाजप आमनेसामने

चिपळूणमध्ये शिवसेनेचे भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची माहिती समोर येते आहे. चिपळूण शहरातील अतिथी हॉटेल जवळील भाजपाच्या कार्यक्रमादरम्यान शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ता एकमेकांत भिडले. यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घटना स्थळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजावलं. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मागे गेले.

अमरावतीत भाजप कार्यालयावर हल्ला

अमरावती भाजप विभागीय मुख्य कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न, कार्यालयाबाहेरील भाजपचे बॅनर पेटवण्यात आले.

'...तर आमचंही सरकार केंद्रात आहे'

"माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी करायला घेतली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, आमचंही केंद्रात सरकार आहे. राज्य सरकारची उडी किती लांब जाते ते पाहूया," असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा देशाचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे. मी माध्यमांशी बोलायला बांधील नाही.

"मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभं राहावं. नोटीस आणि पत्रात यात फरक आहे. ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का आदेश काढायला? कमिशनरांनी वक्तव्य तपासून पाहावं. मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन दगड मारून गेले हा पुरुषार्थ नाही. ते जे काय करत आहेत ते करू दे. तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही."नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले. नारायण राणेंविरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.

कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू आहे- पोलीस आयुक्त

कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्याचं गांभीर्य बघून, पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अटक करण्याचे आदेश आहेत. असं नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले, " ते दोषी आहेत की नाही हे त्यांनी न्यायालयासमोर मांडावं. रुल ऑफ लॉ नुसार कार्यवाही. केंद्रीय मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत. नाशिक पोलिसांचं पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत."

"आमचे पथक 2 तासात रत्नागिरीत दाखल होणार, आम्ही तेथील पोलीस अधीक्षकांना विनंती केलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन आमच्या स्वाधीन करावे, गुन्हा दाखल करताना पूर्णपणे विचार करून गुन्हा दाखल केला आहे, कोणतेही पोलिटिकल प्रेशर नाही, एका संविधानिक व्यक्तीने दुसऱ्या संवैधानिक व्यक्तीवर केलेल्या टीकेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आहे," असं दीपक पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमवारी (23 ऑगस्ट) राणे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी यांनी हे वक्तव्य गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी केली.

अशा वक्तव्याप्रकरणी कारवाई करता येते का याबाबत कायदेशीर चाचपणी केल्यानंतर शिवसेना नेत्याने सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून, असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे हे त्यांनी विसरु नये, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण... - चंद्रकांत पाटील

नारायण राणेंच्या विधानावर तुम्ही प्रशासनिक समज देऊ शकता, पण थेट अटकेची कारवाई करणं ही राजकीय सूडबुद्धी आहे, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मी नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही, पण त्यांची एक शैली आहे. त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करता हे महत्त्वाचं आहे, असंही पाटील यांनी म्हटलं.

प्रोटोकॉलचा विचार करता केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या आधी येतात. त्यांना अशी अटक करता येत नाही. तुमची काही कैफियत असेल तर ती केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकारकडून सरकारचा दुरूपयोग होत असल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- राऊत

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे देण्यापेक्षा प्रहारमधल्या कर्मचाऱ्यांना पगार द्या असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. "नारायण राणेंचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. राणेंना मंत्रिपदी राहण्याचा कोणताही अधिकार नाही. असा मंत्री समाजाची काय सेवा करणार. राणेंचं वक्तव्य हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच अपमान आहे. त्यामुळे राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी", असं राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्याचे आदेश दिल्याचं समजतं. मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवावं अन्यथा काही घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वाट बघत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांना विरोध करणारी पोस्टर्स दादर भागात लावण्यात आली होती. त्यावर नारायण राणेंचा फोटो होता. पोलिसांनी पोस्टर्स हटवली आहेत.

काय म्हणाले होते राणे?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.

त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.

"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चिड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही", अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट आणि शिवसैनिकांकडून शुद्धीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (गुरुवार, 19 ऑगस्ट) मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, राणे निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचं गोमूत्र आणि दुधानं शुद्धीकरण केल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पक्षाने या गोष्टीचा निषेध केला आहे.

केंद्रीय मंत्री राणे यांनी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार आहे, असं जाहीर केल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेकडून विरोध झाला होता.

'एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये घेऊ'

"एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ," असं राणे म्हणाले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

"एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सहीपुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू," असा दावा राणेंनी या वेळी केला.

'सीएम-बीएम गेला उडत, आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं, राणेंनी संताप व्यक्त केला होता.

तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?" असं राणे म्हणाले होते.

जनआशिर्वाद यात्रेतले मंत्री बाटगे; सामनातून राणेंना टोला

मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्या जत्रेत विरोधकांना शिव्याशाप देण्याचं काम सुरू आहे.

या जनआशिर्वाद यात्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल परवा भाजपमध्ये घुसले आणि मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढले.

हे उपरे भाजपचा प्रचार करत आहेत. वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते या जत्रेत येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर टीका करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)