नारायण राणेंना पुढं केल्याने भाजपाला तोटा होणार का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नारायण राणे विरुद्ध शिवसेना ही जुनीच लढाई पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रस्त्यांवर सुरु झाली आहे. या वेळेस फरक फक्त इतकाच आहे की, राणेंच्या मागे आता भाजप उभी आहे.

काही काळ ते काम कॉंग्रेसला करावं लागलं होतं. राणेंच्या शिवसेनेविरुद्धच्या लढाईचे ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाला काही फायदे असतात, काही तोटे.

आता राणेंच्या भाजपानं सुरु केलेल्या 'जन आशीर्वाद' यात्रेनंतर, तिच्या आधारानं जी राजकीय गणितं आखली होती, ती बरोबर येत आहेत की चुकताहेत? राणेंविरुद्ध शिवसेनेनं आणि महाविकास आघाडीनं जी रणनिती आखली आहे त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाची रणनीती काय असेल?

नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानावरुन जो वादंग सुरु झाला आहे, त्याचे पडसाद राज्यभरात पुढचा काही काळ उमटत राहणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर महाराष्ट्रातल्या चार नव्या मंत्र्यांना विविध भागांमध्ये नेऊन 'जन आशीर्वाद' यात्रेचं नियोजन भाजपानं केलं.

या यात्रेची ठिकाणं जरी पाहिली तर येत्या काळातल्या महानगरपालिका निवडणुकांवर नजर ठेवूनच ती आखली गेली यात संशय नाही. सहाजिकच होतं की मुंबई महानगरपालिका नजरेसमोर ठेवून नारायण राणेंना मैदानात उतरवलं गेलं. पण आता उठलेल्या या वादळानंतर भाजपचा राजकीय उद्देश साध्य होतो आहे का?

भाजपचे नेते आता राणेंच्या समर्थनार्थ माध्यमांसमोर आले आहेत. देवेंद्र फडणवीस पोलीस कारवाईच्या विरोधात आहेत, मात्र पक्ष वक्तव्याच्या समर्थनात नाही असंही स्पष्ट करताहेत. चंद्रकांत पाटील, राम कदम त्यांची बाजू मांडताहेत. राणेंची शैलीच अशी आहे असं सांगताना उद्धव ठाकरेंच्या अगोदरच्या काही वक्तव्यांकडेही ते बोट दाखवताहेत.

रत्नागिरीत राणेंच्या साथीला त्यांच्याविरोधातल्या राजकारणात हयात गेलेले प्रमोद जठार आहेत. भाजपला ही जाणीव आहे की निमित्त जरी राणेंचं असलं तरी महाविकास आघाडीचं खरं लक्ष्य हे भाजप आहे. त्यामुळे आता त्यांची रणनीति कशी असणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

नारायण राणेंवर झालेल्या पोलिसी कारवाईमुळे ते सेनेबाहेर पडल्यानंतर सुरु झालेल्या सूडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु होतो आहे. पण आता ते केवळ राणे विरुद्ध सेना असं असणार नाही, या नव्या अध्यायाला भाजप आणि सेनेच्या नव्या लढाईचीही किनार असेल. त्यामुळे भाजपाची रणनिती कशी असेल?

'झोपी गेलेल्याला जागं केलं'

एक प्रश्न सातत्यानं विचारला जातो आहे की नारायण राणेंचा चेहरा पुढे करुन भाजपनं शिवसेनेला डिवचलं आहे का? राणे आणि शिवसेनेतलं द्वंद्व हे निव्वळ राजकीय नाही. त्याला तीव्र भावनेची किनार आहे.

ती आक्रमकता दोन्ही बाजूंनी आहे. राणेंनी सेना सोडल्यावर कायम त्यांच्या टीकेचा रोख हा ठाकरेंवर ठेवलेला आहे. ते टीका करतात आणि शिवसैनिक चिडतात. हे सातत्यानं होत आलं आहे.

पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं गेल्या काही काळातलं वर्णन मात्र संयमी असं केलं जात आहे. राडेबाजीपेक्षा संयमावर अधिक भर असलेली पक्षाची रणनीती दिसत आहे. पण सेना हा भावनेवर चालणारा पक्ष आहे आणि ते कायम पूर्वी सिद्धही झालेलं आहे. त्याचा त्यांना फायदाही झाला आहे.

2013 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यानं शिवसैनिकांसाठी ती निवडणूक भावनिक झाली आणि त्यांनी ती जिंकली.

त्यामुळे आता भाजपविरुद्ध केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपसोबत उभा दावा मांडलेल्या शिवसेनेला सैनिकांनी भावनिक होण्याची राजकीय गरज आहे. नारायण राणेंना पुढे करून भाजपानं शिवसेनेला नेमकी हीच संधी दिली आहे का?

काहीच दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा गेल्यानंतर शिवसैनिक विरुद्ध भाजप असा राडा झाला होता. आता तशीच परिस्थिती राणेच्या वक्तव्यानंतर दिसते आहे. त्यामुळे सत्तेचे नवे डाव मांडताना संयमी झालेल्या शिवसेनेला भाजपनं जागं केल असं दिसतं आहे. असं जागं करण्यानं निवडणुकीच्या राजकारणात त्याचा भाजपला फायदा होणार की शिवसेनेला हे आता बघणं अधिक महत्वाचं झालं आहे.

"माझं निरीक्षण हे आहे की राणेंच्या या यात्रेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मुंबईत मिळत होता. वास्तविक इथे भाजपची संघटनात्मक ताकद फार नाही, पण जनतेच्या मनात रोष आहे असं दिसत आहे. मुंबईत राणेंना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे सेना अस्वस्थ होती. पण या वक्तव्यानं सेनेच्या हाती ऐन मुद्दा मिळाला आणि त्याचा त्यांनी तात्काळ फायदा घेतला," असं राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.

भाजपाची रणनीती काय असेल?

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे, त्यावरुन त्यांच्या रणनीतीचीही कल्पना येते.

"राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन आम्ही करत नाही. पण कारवाईच्या विरोधात पक्ष राणे यांच्या मागे उभा असेल," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. यावरुन एक स्पष्ट आहे की भाजपाची रणनीती ही जशास तसं असं उतर देण्याचीच आहे. राणे यांना शिवसेनेविरोधात पुढे करण्याचा राजकीय हेतूही हाच असू शकतो.

"राणे हे शिवसैनिकांमध्ये आणि इतर जे सेनेच्या विरोधात आहेत त्यांच्यामध्ये ध्रुवीकरण करतात. तेच आता सिद्ध झालं. या स्थितीचा भाजपला फायदा होतोच. ज्यांना या सरकारचं काम आवडत नाहीये तेही यामुळे एका बाजूला येतात," असं राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.

शिवसेनेसोबतच्या मैत्रीला तडा गेल्यावर भाजपाला आक्रमक चेहऱ्याची गरज होती. त्यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं आणि त्यानंतर मुंबईकडे लक्ष ठेवून त्यांना प्रचारात उतरवलं. पण त्यामुळे राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तुलना होईल का? जी आक्रमकता इतर भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांमध्ये दिसत नाही, ती राणेंमध्ये आहे. पण त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस हा एकमेव चेहरा असणाऱ्या भाजपात नवा पर्याय तयार होईल का?

मृणालिनी नानिवडेकर यांना तसं वाटत नाही. "राणे आणि फडणवीस यांची तुलनाच करता येणार नाही. तो फक्त माध्यमांचा केवळ एक चर्चा करण्याचा मुद्दा आहे. शिवसेनेला खाजवावं एवढाच राणेंचा भाजपतला उपयोग आहे," असं त्या म्हणतात.

त्यामुळेच भाजप राणेंच्या आक्रमकतेला पूर्ण वाव देईल, पण सध्या वादात असलेल्या विधानांसारखी विधानं झाली, तर त्यापासून अंतर राखेल.

एक मुद्दा असाही नोंदवला जातो आहे की, अजित पवारांसोबतच्या काही तासांच्या सरकारनंतर सत्ता मिळवण्याच्या अशा प्रयत्नासाठी फडणवीसांवर टीका होत राहिली. त्याचा उल्लेख आजही भाजप विरोधकांकडून, टीकाकारांकडून सतत होत असतो.

पण आता राजकीय संधींच्या सतत शोधात असणारे नारायण राणे भाजपत आहेत आणि अशा यात्रा आणि विधानांमुळे वादातही आहेत. त्यामुळे वाद वा टीकेचा हा झोत फडणवीसांवरुन हटून राणेंकडे जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्र्यांबद्दलच्या राणेंच्या विधानानं या चर्चेला पूरक एक उदाहरणही समोर ठेवलं आहे.

भाजपचे नेते सध्या केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये जे बोललं आहे त्यावरच बोलताहेत. पण पोलीस कारवाईनंतर मात्र भाजपची रणानीती काय असेल याबद्दल तूर्तास ते बोलत नाही आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.)