सुभाष जाधव : मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, का केलेला आत्महत्येचा प्रयत्न?

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुभाष जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राहणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्याने 20 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरु होते.

रविवारी (23 ऑगस्ट) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांचे नातेवाईक सांगतात.

याच संदर्भात दाद मागण्यासाठी सुभाष जाधव 20 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयात गेले होते. परंतु त्यांना आत न सोडल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा गणेश जाधव याने मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये सावकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

सुभाष जाधव हे आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी रांजणी येथील रहिवासी होते. त्यांनी त्यांच्या गावातील सावकार विलास शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपये हे पाच टक्के व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड त्यांना एका वर्षात करायची होती. ही परतफेड ते करु शकले नाहीत. म्हणून त्यांनी सावकाराकडे आणखी एका वर्षाची मुदत वाढवून मागितली.

त्यावर सावकार विलास शिंदे यांनी सुभाष जाधव यांच्या नावावर असलेल्या 28 गुंठे जमिनीपैकी 17 गुंठे जमिनीचे खरेदीखत त्यांच्या नावावर करुन द्यावे लागेल असे सांगितले होते. तसंच या जमिनीचे 1 लाख वीस हजार रुपये प्रतिगुंठा या दराने खरेदीखत करुन कर्जाची पाच लाख रक्कम आणि व्याजाची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम परत करणार असल्याचं सांगितलं होतं.

नंतर विलास शिंदे यांनी 17 गुंठे ऐवजी संपूर्ण 28 गुंठे जमिन स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचं समजल्यावर गणेश जाधव यांनी सुभाष जाधव यांना या खरेदीखताबाबत रांजणी तलाठी कार्यालयात हरकत घेण्यास सांगितलं होतं.

त्यावर सुभाष यांनी तलाठी कार्यालयात खरेदीखत रद्द करण्याबाबत हरकत दाखल केली असल्याचं गणेश यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटलं आहे. तसंच विलास शिंदे यांच्याकडून वारंवार जमिनीचा ताबा घेण्याचा तसंच कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप देखील गणेश यांनी त्यांच्या तक्रार अर्जात केला आहे.

सुभाष जाधव मंत्रालयात का गेले होते?

याप्रकरणी अधिक माहिती देताना सुभाष जाधव यांचे भाऊ परशुराम जाधव बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सावकाराने जमीन हडप केली म्हणून 20 तारखेला सुभाष मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालयात गेले होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सावकाराकडून दोन महिन्यापूर्वी मारहाण देखील झाली होती. ते वैतागले होते. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून निवेदन देण्यासाठी ते मंत्रालयात गेले होते. मंत्रालयात पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे त्यांनी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला."

तसंच, "काही महिन्यापूर्वी त्यांना सावकाराकडून मारहाण झाली होती तसंच त्यांच राहतं घर देखील त्यांनी पाडलं होतं. याप्रकणी आम्ही पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची देखील भेट घेतली होती. परंतु पुढे काही कारवाई झाली नाही," असंही पुढे परशुराम जाधव यांनी सांगितलं.

या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोपदेखील परशुराम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला.

या प्रकरणी पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संपर्क केला.

देशमुख म्हणाले, "सुभाष जाधव यांनी त्यांच 28 गुंठे शेत मागच्या वर्षी विलास शिंदे यांना विकलं असल्याचं कागदपत्रांमधून समोर येतंय. या व्यवहाराचं खरेदी खत झालं आहे. तसंच सातबाऱ्याला शिंदे यांच्या नावाची नोंददेखील झाली आहे."

"हा व्यवहार झाल्यानंतर ही वडिलोपार्जित जमीन आहे, त्याची वाटणी झाली नाही त्यामुळे ती विकता येणार नाही असा आक्षेप जाधव यांच्या मुलांनी घेतला. जाधव यांच्या मुला मुलीने दिवानी न्यायालयात खटला दाखल केला आहे. ठरल्यापेक्षा जास्त जागा बळकावल्याचा जाधव यांच्या कुटुंबियांचा दावा आहे. परंतु कागदापोत्री संपूर्ण जागेचं खरेदीखत झालं आहे.

"याप्रकरणी दोन वेळा एकमेकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. शिंदे यांना एकदा अटक झाली आहे. जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना कधीही अटक झालेली नाही.

"सुभाष जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर रविवारी त्यांच्या मुलाने मुंबईमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती केस आमच्याकडे ट्रान्सफर झाली आहे. त्यानंतर आम्ही आता विलास शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे आणि पुढील कारवाई सुरु आहे."

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न का केला जातो?

धुळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात 22 जानेवारी 2018 ला आत्महत्या केली होती.

औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती, परंतु त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळाला नव्हता. धर्मा पाटील यांच्याप्रमाणेच अनेकांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वरील मजल्यावरुन कोणी उडी मारु नये म्हणून मंत्रालयात जाळी देखील बसवण्यात आली आहे.

लोक मंत्रालयात आत्महत्येचा का प्रयत्न करतात याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले, "स्थानिक पातळीवर प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे नागरिक मंत्रालयात येतात. यासाठी खरंतर मंत्रालयात येण्याची गरज लागू नये.

मंत्री जनता दरबार भरवतात परंतु त्यात सातत्य राहत नाही. अभ्यागतांच्या वेळेत मंत्री आणि अधिकारी जागेवर नसतात. मंत्र्यांनी आता बंगल्यावरुन काम करण्याचा ट्रेन्ड होत आहे. भेटण्यासाठी येणारा कामाचा माणूस असेल तर मंत्री भेटतात नाहीतर भेट नाकारली जाते."

"मीडिया आणि सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे. एखादी घटना घडली तर त्याची दखल घेतली जाते असं जनतेला वाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मीडिया किंवा सोशल मीडियात दखल घेतली जाईल यासाठी असं प्रकारचं वर्तन करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)