राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर, 'मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतरावही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील वक्तव्याचा पुरनरुच्चार केला आहे. तसंच शरद पवारांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विविध ठिकाणी दौऱ्यांना सुरुवात केली. त्याअंतर्गत पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर मनसेचं मत मांडलं.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती पातीतील द्वेष वाढल्याचं म्हटलं होतं. त्यावरून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये तूतू-मैंमैं सुरू झाली.

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवारांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

अर्थच कळला नाही - राज ठाकरे

राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांनी 'त्यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचावेत' असं म्हणत, प्रत्युत्तर दिलं होतं. पण त्याचा अर्थच मला कळला नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

"मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. पण माझ्या व्यक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबध ते पवार साहेबांनी सांगावं," असं राज ठाकरे म्हणाले. तसंच कोणत्याही मुद्द्यावर आपल्याला हवं तेच योग्य असं चालत नाही. आपल्याला हवे तेवढेच प्रबोधनकार स्वीकारायचे असं करून चालणार नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली.

वक्तव्यावर ठाम

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जाती-जातींमधील द्वेष वाढल्याचं वक्तव्य केलं होतं. पुण्यातील पत्रकार परिषदेतही त्यांनी त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलेलं पाहायला मिळालं.

आपल्याकडे जाती या हजारो वर्षांपासून आहेत. अगदी 1999 च्या आधीपर्यंतही जातीपाती होत्या. पण 99 नंतर जातीपातींमध्ये असलेला द्वेष हा अधिक वाढला, असं राज ठाकरे म्हणाले.

प्रामुख्यानं शाळा आणि कॉलेजमध्ये गेल्या 15-20 वर्षांच्या काळात जातीपातींचा प्रवेश झाला. या सर्व गोष्टी केवळ निवडणुकीसाठी तत्कालीक वापरल्या जातात, असंही राज ठाकरे म्हणाले. मी ज्या विषयावर बोललो त्याबाबत सर्वांचं मत तशाच प्रकारचं आहे. केवळ मी ते बोलून दाखवलं, असं राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

मराठा समाजाची दिशाभूल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकार आणि नेते यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजातील मुला-मुलींनी मोर्चे काढले. आरक्षण मिळण्याची त्यांची मागणी आहे. हे सगळे मोर्च कसे निघाले, असं राज ठाकरे म्हणाले.

जर मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नसेल तर स्पष्ट सांगायला हवं. विनाकारण माथी भडकवण्याचं काम करू नये असंही ते म्हणाले.

या सर्वातून केवळ जातीय वातावरण तयार केलं जात असून, त्यामुळे केवळ एका निवडणुकीपुरती मतं मिळतात, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

मनसेचा झेंडा, पुरंदरे आणि राजकीय आरक्षण

नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि त्यावर ते पंतप्रधान झाले. जात आणि धर्माच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली नाही. यावरून विकासाच्या मुद्यावरही लोकं मतदान करतात हे स्पष्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडं मी इतिहास संशोधक म्हणून जात असतो. ते ब्राह्मण आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मनसेच्या झेंड्याबाबतही राज ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आलं. त्यावेळी हा नवा झेंडा पक्ष स्थापनेच्या दिवसापासून माझ्या मनात होता. तो प्रत्यक्षात आणला असं ते म्हणाले.

कडवट मराठी आणि हिंदुत्ववादी घरात माझा जन्म झाला आहे, त्यामुळं ते संस्कार माझ्यावर राहणारच असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राजकीय आरक्षणावर राज ठाकरेंनी अत्यंत परखड भूमिका मांडजली. राजकारणात केवळ स्त्री-पुरूष एवढंच आरक्षण असायला हवं. इतर आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)