कोरोना लस : मुंबई-पुण्यात लसीकरण सारखं का बंद पडतंय?

कोरोना, लस, बूस्टर डोस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

कोव्हिड-19 विरोधी लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईत लसीकरण मोहीम दोन दिवस बंद ठेवण्यात आली. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा, लशींचा पुरेसा साठा नसल्याने, सरकारी आणि पालिका रूग्णालयात लसीकरण बंद करावं लागलं.

दुसरीकडे, पुणे आणि राज्यातील इतर भागातही लशींच्या पुरवठ्याअभावी लसीकरण केंद्र काही दिवस बंद ठेवावी लागत आहेत.

लशींच्या पुरवठ्याबाबत "राजकीय नेते थापा मारतात. लशींचे 10 कोटी डोस दर महिन्याला देणं सोपी गोष्ट नाही," असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक, सायरस पुनावाला म्हणाले होते.

राज्यात लसीकरण मोहीम सारखी बंद का पडते? लशींचा अपुरा पुरवठा ही अयोग्य नियोजन याला कारणीभूत आहे? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत दोन दिवस बंद होती लसीकरण केंद्र

मुंबईत 19 आणि 20 ऑगस्टला सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं.

मुंबईत "कोव्हिडविरोधी लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आलं," असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी बीबीसीशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, गुरूवारी (19 ऑगस्ट) मुंबई महापालिकेला कोरोनाविरोधी कोव्हिशिल्ड लशीचे दीड लाख आणि कोव्हॅक्सीनचे 10 हजार डोस मिळाले आहेत.

कोरोना, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई महापालिकेच्या लसीकरण अधिकारी डॉ. शीला जगताप बीबीसीला माहिती देताना सांगतात, "गुरूवारी मिळालेल्या लशींचे डोस सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर पाठवण्यात येत आहेत. शनिवारीपासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल."

पण, लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची पालिकेवर आलेली ही पहिली वेळ नाही. ऑगस्ट महिन्यात 12 आणि 13 तारखेला लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती. तर, 11 ऑगस्टला, सरकारी आणि मुंबई पालिकेच्या 300 लसीकरण केंद्रापैकी फक्त 24 लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात आली होती.

डॉ. जगताप पुढे म्हणतात, "ऑगस्ट महिन्यात चार वेळा लशींचा साठा उपलब्ध झालाय. आठवड्यात एकदा किंवा दोन वेळा लस येईल असं सांगता येत नाही."

मुंबईत एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यातही लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे काही दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती.

इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृत्यूंची नोंद झालीये. सद्य स्थितीत मुंबईत 3030 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, गुरूवारी नवीन 282 कोरोनारुग्णांची नोंद झालीये.

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई, पुण्यात कोरोना लसीकरण सारखं का बंद पडतंय?

डॉ. जगताप पुढे सांगतात, "कोव्हिड विरोधी लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवावं लागतं." मुंबईत आत्तापर्यंत 86 लाख 28 हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोव्हिडविरोधी लस देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत दोन दिवसात खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रात 2.16 लाख लोकांना लस देण्यात आली होती.

लसीकरणाची राज्यातील परिस्थिती काय?

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी (19 ऑगस्ट) केंद्राकडून राज्याला कोरोनाविरोधी लशीचे 21 लाख डोस मिळाले आहेत. यात कोव्हिशिल्डचे 18 लाख आणि कोव्हॅक्सीनचे 3 लाख डोस आहेत.

राज्यात आत्तापर्यंत 5.14 कोटी लोकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली असल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिलीये.

कोरोना, लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास सांगतात, "14 ऑगस्टला तब्बल 9.64 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं होतं."

ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात दोन दिवस लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद करण्यात आलं होतं. आरोग्य अधिकारी सांगतात, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोव्हिशिल्ड लशीचा प्रचंड तुटवडा भासतोय.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला, कोव्हिशिल्ड लशीचा पुरवठा होत नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानंतरही, पुण्यात काही दिवस फक्त कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होती. पण, कोव्हिशिल्ड लस पुरवठा नसल्याने मिळत नव्हती.

लसीकरणाबाबत पुण्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "आत्तापर्यंत पुण्यात 70 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलंय."

लशींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारचा दावा

मे महिन्यात केंद्राय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात 2.16 अब्ज लशी उपलब्ध होतील असा दावा केला होता.

नीती आरोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले होते, "लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत किती लशी उपलब्ध होतील याची माहिती मागवली. या काळात 2.16 बिलीयन (अब्ज) कोव्हिडविरोधी लशीचे डोस उपलब्ध होतील."

देशात भेडसावणारा लशींच्या तुटवड्याचा प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. केंद्रीय आरोग्यंमत्री मनसुख मांडविया यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

ते म्हणाले, "लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्डची निर्मिती 110 दशलक्ष लशींपासून 120 दशलक्ष दर महिन्यापर्यंत वाढवण्यात येत आहे. तर, कोव्हॅक्सीनची निर्मिती 58 दशलक्ष लशींपर्यंत वाढवण्यात आली आहे."

केंद्र सरकारने लशी मिळतील असा दावा केला असला तरी, अजूनही लशींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतोय.

लशींच्या तुटवड्याबाबत सिरमची प्रतिक्रिया काय?

लशींच्या तुटवड्याबाबत काही दिवसांपूर्वी कोरोनाविरोधी कोव्हिशिल्ड लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे संचालक सायरस पुनावाला यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती.

केंद्र सरकारने या वर्षाअखेर सर्वांचं लसीकरण होईल असा दावा केलाय. याबाबत तुमचं मत काय? यावर बोलताना ते म्हणाले, "राजकारणी थापा मारतात. सद्य स्थितीत आम्ही 10 कोटी डोस निर्माण करतोय. जगभरात कोणतीही कंपनी दर महिन्याला एवढे डोस निर्माण करू शकत नाही."

कोरोना लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनाविरोधी लशीसोबत इतरही लशींची निर्मिती होते. सायरस पुनावाला पुढे सांगतात, लोकांना कोरोनाविरोधी लशीची गरज आहे. त्यामुळे, आमचं उद्दिष्ट 15 कोटी लस तयार करणं आहे.

त्यामुळे, इतर लशींना मागे ठेऊन कोरोनाविरोधी लशीला प्राधान्य देतोय असं सीरमकडून सांगण्यात आलंय.

खासगी रुग्णालयात लस उपलब्ध पण सरकार रुग्णालयात नाही असं का?

मुंबई आणि पुण्यात सरकारी आणि पालिकेची लसीकरण केंद्र लशीच्या पुरवठ्याअभावी बंद करावी लागतात. मात्र, दुसरीकडे खासगी रुग्णालयात लशी उपलब्ध असल्याने लसीकरण सुरू आहे.

नाव न घेण्याच्या अटीवर आरोग्य अधिकारी सांगतात, मुंबईतील खासगी रुग्णालयात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 10 लाख लशी उपलब्ध होत्या. तर, पुण्यातील खासगी रुग्णालयात 3 ते 4 लाखांच्या आसपास लशी उपलब्ध आहेत.

टाईम्स ऑफ इंडियानेदेखील, मुंबईतील खासगी रुग्णालयात 10 लाख लशी उपलब्ध असल्याची बातमी दिली होती.

खासगी रुग्णालयांना, तयार होणाऱ्या लशींमधील 25 टक्के कोटा दिला जातो. पण, खासगी रुग्णालयात लस पैसे देऊन मिळत असल्याने लोकंचा जास्त कल सरकारी रुग्णालयांकडे दिसून येतो.

खासगी रुग्णालयाकडे उपलब्ध असलेल्या, पण वापरता न आलेल्या लशींबाबत संसदेत राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, "देशातील खासगी रुग्णालयं 25 टक्के लशींचा कोटा वापरत नाहीयेत. त्यामुळे लशींचा उरलेला साठा सरकारी रुग्णालयात वापरण्यात येईल."

एका महिन्यात खासगी रुग्णालयांमध्ये 7 ते 9 टक्के लशींचा न वापरलेला साठा असल्याचं समोर आलंय, अशी माहिती त्यांनी संसदेत दिली. त्यामुळे "सरकारने खासगी रुग्णालयात न वापरण्यात आलेल्या लशींचे डोस सरकारी कोट्यात घेण्याचा निर्णय केलाय," असं ते पुढे म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यसभेत पुढे म्हणाले, खासगी रुग्णालयांना 25 टक्के लशींचा कोटा देणं जरूरी नाही. खासगी रुग्णालयं जे खरेदी करतील. तो कोटा त्यांना दिला जाईल. बाकी सप्लाय सरकार घेत आहे.

मुंबई महापालिका अधिकारी सांगतात, जे नागरिक पैसे देऊन लस घेऊ शकत होते. त्यांनी लस घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात लस घेण्याचं प्रमाण कमी होताना पहायला मिळतंय. तर, सरकारी लसीकरण केंद्रांवर खूप मोठी गर्दी दिसून येत आहे.

कोरोना लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यातही खासगी रुग्णालयातील न वापरण्यात आलेल्या लशी सरकारी रुग्णालयात वापरण्याबाबत विचार सुरू होता. याबाबत माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "खासगी हॉस्पिटलमधील लशींची एक्सपायरी संपत आलीये. या लशी आम्ही त्यांच्याकडून घेणार होतो. याबाबत काहींनी प्रतिसाद दिला होता."

देशातील लोकांचा दुसरा डोस बाकी?

लशींच्या तुटवड्यामुळे राज्यातील अनेकांना कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस मिळाल्यानंतर दुसरा डोस मिळालेला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुण्यात म्हणाले, "ज्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आलाय. त्यांना दुसरा डोस देण्यावर प्राधान्य असणार आहे."

मुंबईत 18 ऑगस्टपर्यंत 82 लाख लोकांना कोरोनाविरोधी लशीचा डोस मिळालाय. यात दोन्ही डोस झालेल्यांची संख्या 20 लाख, तर 61 लाख लोकांचा फक्त पहिला डोस झालाय

पीटीआयच्या माहितीनुसार, दिल्लीचे आरटीआय कार्यकर्ते रमण शर्मा यांनी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे वेळेत कोरोनाविरोधी लशीचे डोस किती लोकांना मिळाले नाहीत याची माहिती मागितली होती. केंद्राने 3 कोटी 83 लाख लोकांना, मुदतीच्या वेळेत लशीचा डोस मिळाला नाही अशी माहिती दिली आहे.

केंद्राच्या माहितीनुसार, 17 ऑगस्टपर्यंत को-विन पोर्टलनुसार 3.40 कोटी लोकांना कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस वेळेत मिळाला नाही. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनंतर दिला जातोय. तर, कोव्हॅक्सीन लशीचा दुसरा डोस न मिळालेल्यांची संख्या 46,78,406 एवढी आहे. कोव्हॅक्सीन लशीचा दुसरा डोस 28 ते 42 दिवसांनंतर दिला जातो

रमण शर्मा म्हणतात, "लोकांना लशीचा दुसरा डोस मिळाला. पण, तो वेळेत मिळाला नाही. त्यामुळे लस घेणारा व्यक्ती सुरक्षित आहे का? हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे. याचं उत्तर सरकारने दिलं नाहीये."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)