You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बार्बीला मुद्दाम 'सेक्सी' का केलं गेलं? यामुळे तुमच्या मुलींवर वाईट परिणाम होतोय का?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
जगभरात लहान मुलींसाठी असणारं एक खेळणं म्हणजे बार्बी डॉल. बार्बी हा ब्रँड बाहुली या नावाशी इतका समरूप झालाय की अनेकदा बाहुली कुठलीही असो, कोणताही ब्रँड असो, सामान्य दुकानदार तिला बार्बी म्हणूनच विकतात आणि बापडे आई-बाप बार्बी म्हणूनच विकत घेतात.
आज अचानक बार्बीची आठवण येण्याचं कारण म्हणजे बार्बी डॉल बनवणारी कंपनी मॅटेलने आता ऑक्सफर्डची कोरोना व्हायरसवरची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ प्रोफेसर डेम सारा गिल्बर्ट यांच्या सन्मानार्थ त्यांच्यासारखी दिसणारी बाहुली बनवली आहे.
या बाहुलीमुळे लहान मुलांना , विशेषतः मुलींना विज्ञानशाखांमध्ये करियर घडवण्यासाठी प्रेरणा मिळेल असं सारा म्हणाल्या.
सारा गिल्बर्ट यांच्यासारख्याच विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या इतर 6 महिला शास्त्रज्ञांवर मॅटेलने बार्बी डॉल बनवल्या आहेत.
इमेज बदलण्याचा प्रयत्न
बार्बीने गेल्या काही वर्षांत आपली इमेज बदलायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिलांवर आधारित बाहुल्या आणल्या.
या प्रख्यात टेनिसपटू नाओमी ओसाकावर आधारित बाहुली असेल किंवा तेरा वर्षांची स्केटबोर्डर स्काय ब्राऊन हिच्यासारखी दिसणारी बार्बी असेल, गेल्या काही बार्बीचं कित्येक दशक टिकून राहिलेलं 'नाजूकसाजूक गुलाबी राजकन्या' हे रूप बदलताना दिसतंय.
2016 साली बार्बीच्या तीन वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या बाहुल्या काढल्या गेल्या. उंच, गुबगुबीत आणि बुटकी.
बार्बी बनवणाऱ्या कंपनीने त्यावेळेस या तिन्ही प्रकारच्या बाहुल्यांचं फार मोठ्या प्रमाणात मार्केटिंगही केलं होतं. पण तरीही बार्बीवर टीका करणाऱ्यांना हे बदल पुरेसे वाटत नाहीत.
गेल्या काही वर्षांत जसे बार्बीत बदल घडत गेले तशी बार्बीच्या टीकाकारांची संख्याही वाढलीये.
नुस्तीच टीका करणारी तोंडं वाढली असती तर कदाचित बार्बी बनवणारी कंपनी मॅटेलने त्यांना भाव दिला नसता. पण 2013 नंतर बार्बीचं मार्केटही डाऊन होतंय. सोप्या शब्दात, बार्बी तेवढी विकत घेतली जात नाहीये जेवढी आधी घेतली जात होती. तिची लोकप्रियता घटतेय.
2012 ते 2017 या काळात बार्बीची विक्री 25 टक्क्यांनी घटली. बार्बीमुळे लहान मुलींवर वाईट परिणाम होतोय असंही म्हटलं जातंय. नव्या पालकांना बार्बी आपल्या मुलींच्या हातात नकोय. पण का?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी बार्बीच्या जन्माची कथा समजून घ्यायला हवी. बार्बीचं आयुष्य कसं मुलींच्या मनात ठसवलं गेलं हे जाणून घ्यायला हवं.
बार्बी डॉलच्या जन्माची कथा
बार्बीचं पहिलं डिझाईन (तेच ते, प्रमाणाबाहेर मोठे स्तन आणि अमानवीय लहान कंबर असलेलं) एका महिलेनेच बनवलं होतं. त्या महिलेचं नाव होतं रूथ हँडलर.
मॅटल कंपनीचे सहसंस्थापक इलियट हँडलर यांच्या पत्नी. त्यांनी आपल्या पतीला व्यवसायात पुढे जाण्यासाठी मदत केली असं म्हणतात.
"बार्बी ही संकल्पना पूर्णपणे त्यांचीच," पॅरिसमधल्या लेस आर्ट्स डेकोराटिफ्स या म्युझियममधल्या बार्बी संग्रहाच्या क्युरेटर अॅन मॉनिर म्हणतात.
रूथ आपल्या मुलीला, बार्बराला (जिच्या नावावरून बार्बी हे नाव पडलं) कागदी बाहुल्यांशी खेळताना पाहात होत्या.
तिथे त्यांना आयडिया सुचली की अशी एक बाहुली काढावी जी तरूण महिलेसारखी असेल, दिसेल. तोवर लहान मुलांच्या सगळ्या बाहुल्या बाळासारख्याच दिसायला असायच्या.
या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळालं ते रूथ यांच्या स्वित्झरलँड दौऱ्यानंतर. 1956 साली त्यांनी स्वित्झरलँडच्या दौरा केला आणि तिथे त्यांना एक जर्मन बाहुली दिसली. तिचं नाव होतं लिली.
ही बाहुली तरूण मुलीची होती. जर्मन वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या एका व्यंगचित्र मालिकेवर ही बाहुली बेतली होती.
"लिली मादक होती, आणि कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडायची जिथे तिला पुरुषांची मदत घ्यावी लागायची. पुरुषांना घायाळ करेल अशी तिची अदा होती," मॉनिर सांगतात.
रूथ यांची मुलगी तोवर मोठी झाली होती, तिचं लग्नही झालं होतं. पण रूथ यांच्या मनात जी बार्बीची कल्पना बार्बरा लहान असताना आली होती, तिला मुर्त स्वरूप द्यायची वेळ आली होती.
1959 साली बार्बी बाहुली बाजारात आली. बार्बी अगदीच लिली सारखी नव्हती. लिली पुरुषांना आकर्षित करण्यासाठी बनवली होती तर बार्बी लहान मुलींना, विशेषतः किशोरवयीन मुलींना, खेळण्यासाठी बनवली गेली होती.
पण काही साम्यस्थळं होती. बार्बीलाही सेक्सी बनवलं गेलं होतं. तिची शरीरयष्टी अमानवी होती. म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे मोठे स्तन, अतिशय बारीक कंबर, सोनेरी केस.
त्यावेळी बार्बीला एकच गोष्ट करायची असायची, ती म्हणजे शॉपिंग. तिला सगळं गुलाबी आवडायचं.
तिच्या पायात कायम उंच टाचेचे सँडल असायचे. तिची टॅगलाईनही होती, "मला शॉपिंगसाठी पुरेसा वेळ मिळेल ना?"
बार्बी पहिल्यांदा बाजारात आली तीही काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा स्वीमसुट घालून. या बाहुलीची खासियत ही होती की तिच्या अॅक्सेसरीज बदलता यायच्या, नवनवीन गोष्टी तिच्यासाठी विकत घेता यायच्या. मग तिचे कानातले असोत, कॅट-आय गॉगल्स किंवा इटूकले पिटूकले मिनी स्कर्ट.
बार्बी हिट ठरली होती.
आता बार्बीला बॉयफ्रेंड हवा. मग 1961 साली केन नावाची तरूणाची बाहुली बाजारात आली. बार्बीचं आयुष्य त्या काळात ज्या ज्या गोष्टी बायकी म्हणून समजल्या जायच्या, त्याभोवतीच फिरायचं. त्या गोष्टी गुलाबी वेष्टनात लाखो मुलींना विकल्या जाऊ लागल्या होत्या.
दिवस सरले तसे लहानमोठे बदल बार्बीत होत गेले.
सत्तरचं दशक संपलं तेव्हा महिला अधिक स्वतंत्र, सामर्थ्यवान झाल्या होत्या, त्याचं प्रतिबिंब बार्बीत पडलं. अंतराळवीर बार्बी बाजारात आली. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांची चळवळ जोर धरायला लागली तेव्हा कृष्णवर्णीय बार्बी आली.
वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी बार्बी दिसायला लागली पण बार्बीचं 'दिसणं' बदललं नाही. ती तशीच राहिली. पुरूषी सौदर्याच्या कल्पनेत जखडलेली. सडपातळ, भरीव स्तन आणि अतिशय बारीक कंबर असणारी.
बार्बी आणि बॉडी इमेज
काहीतरी अवास्तव सौदर्याच्या कल्पना मनात ठेवून बार्बीची बाहुली बनवली गेली असेल तर ती खेळणाऱ्या मुलींच्या मनातही 'बाईने असंच दिसायला हवं' ही कल्पना घर करू शकते असं तज्ज्ञांचं मत पडलं. बार्बीच्या कामापेक्षा तिच्या कपड्यांकडे जास्त लक्ष वेधलं जात होतं.
त्यामुळे बार्बीचे लहान मुलींच्या मनावर होणारे परिणाम यावर चर्चा झडायला लागल्या. 2011 साली हंफिग्टन पोस्टमध्ये गालिया स्लेयन या तरूणीने बार्बीच्या शरीराच्या मापांच्या तुलनेचं गुणोत्तर काढून एका सामान्य तरूणीच्या उंचीची बाहुली बनवली. म्हणजे बार्बी जर खरीखुरी तरूणी असती तर तिच्या शरीराची मापं काय असती?
या लाईफ साईज बार्बीचे स्तन होते 39 इंच, कंबर होती 18 इंच आणि पार्श्वभाग होता 33 इंच. तिचे तळपाय इतके लहान होते की तिला अमेरिकन साईज 3 चे शूज लागायचे.
गालियाने या प्रयोगानंतर लिहिलं की, "बार्बी खरीखुरी महिला असती तर तिच्या शरीराचं गुणोत्तर इतकं अमानवीय होतं की तिला कधी दोन पायांवर सरळ उभं राहून चालताच आलं नसतं. तिला हात खाली टेकवून रांगत, खुरडत चालावं लागलं असतं."
पण मॉनिर यांना हे मत पटत नाही. त्या म्हणतात, बार्बी म्हणजे महिला सशक्तीकरणाचं एक प्रतिक आहे. "तुम्ही बघा ना, बार्बीचं लग्न झालेलं नाही, तिला मुलं नाहीयेत. ती स्वतःचं करियर स्वतःच्या मनाने निवडू शकते. मग बार्बी कशीकाय लहान मुलींच्या मनावर वाईट परिणाम करेल?"
त्यांच्या मते एका बाहुलीकडे एक खरी महिला म्हणून पाहणं चुकीचं आहे. तिच्या शरीराची माप अमानवीय आहेत कारण ती फक्त एक 'बाहुलीच' आहे हे आपण विसरता कामा नये.
खऱ्याखुऱ्या शरीरयष्टीची लॅमिली
मग खऱ्या तरूणी मुलीची जशी शरीरयष्टी असेल तशी बाहुली बनवणं शक्यच नाही का? अमेरिकेतले आर्टिस्ट निकोलाय लॅम यांनी याचं उत्तर दिलं.
त्यांनी 2014 साली. अमेरिकेतल्या एका 19 वर्षींय मुलीची शरीरयष्टी जशी असेल त्या मापाने त्यांनी बाहुली बनवली. तिचंच नाव लॅमिली. या बाहुल्यांना अमेरिकेत जोरदार प्रतिसाद मिळाला.
या बाहुलीबद्दल बोलताना निकोलाय म्हणतात की, "कोणती तरी कंपनी खरीखुरी मुलगी जशी असते, तिची शरीरयष्टी जशी असते त्या प्रमाणात बाहुलीची शरीरयष्टी डिझाईन करेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा मीच अशी बाहुली बनवायची ठरवली."
पॅट हार्टली बॉडी इमेज तज्ज्ञ आहेत. त्यांनी बॉडी इमेजेस : डेव्हलपमेंट, डिव्हीअन्स अँड चेंज हे पुस्तकही लिहिलं आहे.
त्या म्हणतात, "खऱ्या तरूण मुलीचं शरीर जसं असेल त्या मापाने एखादी बाहुली बनवण्याचा निर्णय कोणीतरी घेतला हेच महत्त्वाचं आहे. नाहीतर कोणी असा विचारही करत नाही. काडीसारखी बारीक शरीरयष्टी म्हणजेच सगळं काही हे लहान मुलींवर अप्रत्यक्षपणे लादून अनेक लोक भरपूर पैसा कमवत आहेत."
लॅमीलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बाहुलीला फारसा मेक-अप नाही, हाय हिल्सचे सँडल्स नाहीत, तिचे कपडे गुलाबी किंवा छोटे छोटे नाहीत. साध्या 19 वर्षांच्या मुलीचे जसे कपडे असतील तसे तिचे कपडे आहेत.
दुसरीकडे बार्बी बनवणाऱ्या मॅटेल कंपनीने मात्र आपली बाजू मांडताना म्हटलंय की बाहुल्या खेळायला सोप्या अशा असाव्यात. त्यांचे आकार खऱ्या तरूणींसारखे असायला हवेतच असं नाही.
बार्बीच्या शरीराचा मुलींच्या मनावर होणारा परिणाम
ससेक्स विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञ हेल्गा डिट्टमार यांच्यामते बार्बीच्या शरीरयष्टीची मापं खऱ्या मुलीच्या शरीरयष्टीच्या प्रमाणात असायला हवीत की नाही हा नंतरचा मुद्दा.
"महत्त्वाचं काय तर बाहुलीच्या शरीराकडे पाहून लहान मुलींच्या मनावर परिणाम होतो का? असं असं होत असेल तर ती चिंतेची बाब आहे."
बार्बीची शरीरयष्टी पाहून आपण तसंच व्हावं असे विचार मनात यावं हे मुलींसाठी हानिकारक आहेच. तसंच बार्बीकडे पाहून 'स्त्रीच्या दिसण्यालाच सर्वात जास्त महत्त्व असतं' असं वाटणंही हानिकारक आहे.
हेल्गा यांनी 2006 साली केलेल्या एका संशोधनात आढळून आलं की साडेपाच ते साडेसात या वयोगटातल्या मुलींनी मुळ बार्बीचे (अतिशय बारीक कंबर, मोठे स्तन, सोनेरी केस) फोटो असलेलं पुस्तक वाचलं की त्यांना स्वतःच शरीर आवडेनासं होतं.
पण ज्या मुली फोटो नसलेलं पुस्तक वाचतात त्यांना असं काही वाटत नाही.
"फोटो पाहिलेल्या मुलींनी आपण आहोत त्यापेक्षा सडपातळ व्हायचं असतं. बार्बीचे फोटो पाहिल्यानंतर त्यांना आत्मविश्वास कमी होतो. जर एका अभ्यासात आम्हाला हे लक्षात आलंय तर जितका जास्त वेळ मुली बार्बीसोबत घालवतील तितका नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होईल हे स्पष्ट आहे," हेल्गा म्हणतात.
पण वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरयष्टीच्या बार्बी आता येत आहेत ही चांगली गोष्ट आहे असंही त्यांना वाटतं.
बदलती बार्बी
लिसा मॅकनाईट बार्बीच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत आणि त्यांना बार्बीची प्रतिमा बदलायची आहे.
त्यांनी वेगवेगळी पावलं त्यासाठी उचलली आहेत. सगळ्यांत आधी तर बार्बीच्या हाय हिल्सला त्यांनी टाटा बाय-बाय केलं. 2015 साली पहिल्यांदा सपाट पायांची बार्बी बाजारात आली. तेव्हापासून बार्बी वेगवेगळे स्किनटोन, रंग, डोळ्यांचे रंग, केसांच्या रंगात बाजारात येतेय. बार्बीच्या बॉयफ्रेंडही आता बदलतोय.
बार्बीची आता साठी उलटलेय. मोठ्या स्तनांची, छोटे गुलाबी मिनीस्कर्ट घालणारी, जराशी मंद बार्बी जी सतत तक्राक करायची की गणित किती अवघड असतं बाई... ती जाऊन आता कोव्हीड-19 वर लस शोधणारी बार्बी बाजारात आलीये.
बार्बी आता मानवी हक्क, LGBTQ समुदायाचे हक्क यावरही बोलते. याचा फायदा मॅटेल कंपनीला होताना दिसतोय.
2018 साली बार्बीचा टर्नओव्हर 2012 नंतर पहिल्यांदाच वाढला. 2020 आणि 2021 मध्ये बार्बीची विक्री वाढली तर तिला जुनं वैभव परत मिळेल अशी कंपनीला आशा आहे.
पण नव्या काळातल्या नव्या आई-वडिलांना मात्र बार्बी आपल्या मुलींच्या हातात द्यायची नाहीये. उदाहरणार्थ यूकेत 2019 साली झालेल्या एका सर्व्हेत 29 टक्के पालकांनी बार्बीसाठी सकारात्मक मतं दिली तर 33 टक्के पालकांनी नकारात्मक मतं दिली.
बार्बीने कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी मुलींनी असंच दिसावं अशी प्रतिमा त्यांना वर्षानुवर्ष जोपासली आहे असंही काही आयांना वाटतं. बार्बीने आता साठी ओलांडलीये पण अजूनही बार्बी एक स्त्रीवादी आयकॉन आहे की महिलेला त्याच जुन्या जोखडांमध्ये अडकवणारी, बाईच्या दिसण्यालाच महत्त्व देणारी संकल्पना याचा वाद शमला नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)