You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियांका चोप्रा, जॅकलीन फर्नांडीस झाल्या सोनालीच्या फॅन
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
"लाखो चाहते असलेली प्रियांका चोप्रा इन्स्टाग्रामवर माझा व्हीडिओ स्टोरी म्हणून का ठेवेल? हा प्रश्न मला पडला. प्रियांका चोप्राची स्टोरी हा माझाच व्हीडिओ आहे हे मी दहावेळा पाहिलं."
सोनाली वाघरियांना झालेला हा आनंद त्यांनी बीबीसी मराठीकडे अशा शब्दात व्यक्त केला.
कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या सोनाली दीपक वाघरीया या मेहंदी आर्टिस्ट आहेत. लग्नसमारंभ आणि इतर सोहळ्यात त्या मुली, महिलांच्या हातावर मेहंदी काढतात. पण मग त्या एकदम प्रसिद्धीच्या झोतात कशा आल्या हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
त्याचं झालं असं की, केवळ हौस म्हणून सोनाली यांनी इन्स्टाग्रामवर व्हीडिओ अपलोड केला होता. कणखर स्त्री कधीही हतबल होत नाही, उलट ती आणखी जोमाने उभी राहते, अशा आशयाचा हा व्हीडिओ होता. पण त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो व्हीडिओ चक्क इंग्लिश भाषेत बनवला होता.
"मला विश्वास बसला नाही. मला वाटलं कोणीतरी दुसऱ्याने प्रियांकाचा डीपी ठेवून आपला व्हीडिओ स्टोरी म्हणून ठेवला असेल. मी प्रियांकाची चाहती आहे. पण लाखो चाहते असलेली प्रियंका आपली स्टोरी का ठेवेल, हा प्रश्न मला पडला," हे सांगताना सोनाली हरखून गेल्या होत्या.
त्या पुढे सांगतात , "रात्री एक वाजता इतरांच्या कमेंटमधून मला प्रियांकाने माझा व्हीडिओ स्टोरीला ठेवल्याचं कळालं. पण इतक्या लोकांमध्ये प्रियंकानं आपल्याला पाहिलं याचा खूप आनंद झाला."
त्यानंतर सोनाली यांनी प्रियंकाला मेसेज केला. "खूप खूप धन्यवाद. मी तुमची खूप मोठी फॅन आहे."
पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे प्रियंकाने हा मेसेज लाईक केला.
सोनाली मेहंदी आर्टिस्ट कशा झाल्या
सोनाली यांचं बालपण मुंबईत गेलं. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सोनाली यांना केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेता आलं. त्या सांगतात, "माझं शिक्षण गुजराती माध्यमातून झालं. तेही सातवीपर्यंतच. कारण ते मोफत होतं."
शिक्षण थांबलं तरी सोनाली शांत बसल्या नाही. घरच्यांना हातभार म्हणून त्या वयाच्या आठव्या वर्षांपासून लोकांना छाप्याची मेहंदी काढायला लागल्या.
सांताक्रुझ इथं झोपडपट्टीत राहणाऱ्या सोनाली जुहू बीचवर छापा मेहंदी काढायच्या. इथं परदेशी नागरिक यायचे. हौस म्हणून ते मेहंदी काढून घ्यायचे. पण या लोकांनी आपल्याकडून मेहंदी काढून घ्यावी, यासाठी त्यांनी निरीक्षण करून तोडकं-मोडकं इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. इथूनच त्यांना इंग्रजी भाषेवर प्रेम जडलं.
सोनाली मेहंदी आर्टिस्ट ते इंस्टाग्रामर कशा झाल्या?
पुढे अवघ्या 18 व्या वर्षी लग्न करून सोनाली कोल्हापूर मध्ये आल्या. मुंबईच्या गजबजलेल्या नगरीतून कोल्हापूरसारख्या शांत ठिकाणी जमवून घेणं त्यांना अवघड जात होतं. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पुन्हा मेहंदी काढणे या आपल्या छंदाला व्यवसाय म्हणून पाहायचं ठरवलं.
शास्त्रशुद्ध मेहंदी काढण्यासाठी त्यांना प्रशिक्षण गरजेचं होतं. पण इथेही पैसे नसल्याने त्यांनी केवळ निरीक्षण करून मेहंदीचे नवनवीन प्रयोग स्वतःच्या हातावर सुरू केले. तेव्हाही रोज मेहंदी काढते म्हणून त्यांना टोमणे सहन करावे लागले.
आज सोनाली यांनी हातावर मेहंदी काढावी यासाठी त्यांना अनेक लग्नसमारंभात बोलावलं जातं.
टिकटॉकबद्दल कसं कळलं?
इंग्लिशची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. मुंबईहून भेटायला आलेल्या भावाकडून त्यांना त्यावेळी टिकटॉकबद्दल कळलं. मग काय सोनाली यांनी टिककॉकवर व्हीडिओ बनवायला सुरुवात केली.
त्या सांगतात, "संसाराचा गाडा हाकत ताणतणावातून मन रमवण्यासाठी मी व्हीडिओ करायचे. त्यातून प्रसिद्धी किंवा पैसे मिळवण्याचा प्रयत्न नव्हता."
पुढे टिकटॉक बंद झालं आणि सोनाली यांची इन्स्टाग्रामशी ओळख झाली. मेहंदीच्या डिझाईन शिकण्यासाठी पती दीपक यांनी सोनाली यांना मोबाईल घेऊन दिला. लग्नसमारंभात मेहंदी काढताना सोनाली यांना इन्स्टाग्राम रील्स बद्दल कळलं. आणि त्यामुळंच आज त्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत.
प्रियांकासह अनेकांनी सोनालीच्या व्हीडिओला दाद दिली
सोनाली यांचा व्हीडिओ पाहून जॅकलीन फर्नांडिसने कौतुक केलं. जॅकलीनने सोनाली यांना मेसेज केला. ती लिहिते, "तुम्ही खूप चांगलं काम करता. तुम्ही मुंबईला येऊ शकता का? आपण रील्स बनवू आणि मेहंदी काढू."
सध्या जॅकलिनची टीम सोनाली यांच्या संपर्कात आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी आणि इंग्लिश बोलण्याची आवड जोपासण्यासाठी व्हीडिओ करते. पण त्यातून इतकी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नव्हतं, असं सोनाली सांगतात.
केवळ हौसेखातर इंग्लिश बोलायला आवडतं म्हणून इंग्लिश भाषेतले व्हीडिओ बनवते, असं सांगणाऱ्या सोनाली यातूनही समाजाला दिशा देण्याची इच्छा बाळगतात.
त्या सांगतात, "बहुतांश स्त्रियांना पदर घेऊन राहावं लागतं. पण त्यातही या महिला आणि मुलींनी स्वतंत्र विचारांवर जगायला हवं हे माझं मत आहे. परिस्थिती काहीही असली तरी ठामपणे उभे राहायला हवे यासाठी सकारात्मक संदेश देणारे व्हीडिओ करत असल्याचं सोनाली सांगतात."
सोनाली मेहंदी आर्टिस्ट आहेत आणि त्यांना भविष्यात मेकअप आर्टिस्ट व्हायचं स्वप्न आहे. संसाराला हातभार म्हणून सोनाली यांचा कोल्हापूर शहरातील महाद्वार रस्त्यावर आर्टिफिशियल ज्वेलरीचा एक छोटासा स्टॉल आहे.
सोनाली सांगतात, "घरच्यांचा पाठिंबा असल्याने आयुष्यात खूप काही करण्याचे ध्येय आहे. व्हीडिओ बनवण्यावरून नातेवाइकांकडून हिणवलं गेलं. पण तू जे करतेस ते इतरांना जमत नाही म्हणून तिला तुला हिणवलं जातं पण त्याकडे लक्ष देऊ नको असं माझ्या सासू सांगतात."
सोनाली यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांचा मोठा पाठिंबा आहे.
सोनाली लग्नसमारंभात जातात त्यावेळी त्यांचे व्हीडिओ पाहून लोक विचारणा करतात. त्या वेळी आपण कोणीतरी सेलिब्रिटी असल्याचं वाटतं, असं सोनाली सांगतात.
पण सोबतच मेहंदी काढायला गेलेल्या सोनाली यांना श्रीमंत लोकांकडून हीन वागणूक मिळाल्याचे अनुभव कमी नाहीत. पण लोकांच्या अशा वागण्याने आपण दुर्बल बनणार नाही तर त्याची शिडी करून आणखी प्रगती करणार असल्याचे सांगताना एक आत्मविश्वासाने भारलेली सोनाली पाहायला मिळते.
एकीकडे प्रियांका, जॅकलीन यांसारखी सेलिब्रिटी आपलं कौतुक करतात तर दुसरीकडे थोड्या पैशांसाठी वाद घालणारे लोक कसा अपमान करतात हा दुहेरी अनुभव सोनाली यांना येत आहे. पण लोकांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःची प्रगती करणार असल्याचं सांगणाऱ्या सोनाली खऱ्या अर्थाने 'स्ट्रॉंग वूमन' आहेत असंच म्हणायला हवं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)