You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात आयात होणारी 66% खेळणी आहेत मुलांसाठी घातक
- Author, कमलेश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"माझ्या मुलाला जे खेळणं आवडतं ते मी त्याला घेऊन देते. फार काही बघत नाही. खेळण्यांमुळे काही नुकसान होतं, असं मला वाटत नाही. जेली खेळल्यानंतर त्यांनी हात धुवायला हवे, एवढी काळजी घेते."
दिल्लीत राहणाऱ्या शिबाप्रमाणे इतर अनेक पालकांचंही हेच मत आहे.
खेळणी घातक असू शकतात, असं त्यांना वाटत नाही. मुलांची आवड आणि खेळण्याचा दर्जा बघून खेळणं विकत घेतलं जातं. खेळणं सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्याचा दुसरा पर्यायही त्यांच्याकडे नसतो.
मात्र, भारतात आयात होणारी 66.99% खेळणी मुलांसाठी धोकादायक असल्याचं भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) अहवालात म्हटलं आहे.
भारतातली अनेक खेळणी मेकॅनिकल, केमिकल आणि इतर अनेक प्रकारच्या चाचणीत अपात्र ठरल्याचं QCI ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं आहे.
QCI च्या अहवालानुसार या खेळण्यांमध्ये केमिकलचं प्रमाण अधिक होतं. या केमिकलमुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मात्र, सामान्य माणसांना याची विशेष माहिती नसते. मुलांच्या खेळण्यावर टॉक्सिक (विषारी) आणि नॉन टॉक्सिक लिहिलेलं असतं. मात्र, खेळणी विकत घेताना, हे तपासलं जातंच असं नाही.
सर्वसामान्यपणे जे खेळणं आवडतं ते विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. खेळण्याची किंमत आणि कसं वापरायचं, याव्यतिरिक्त ते फारसे प्रश्न विचारत नाही.
खेळण्यांची गुणवत्ता चाचणी
QCI चे सेक्रेटरी जनरल डॉ. आर. पी. सिंह सांगतात, "आमच्या सर्वेक्षणात आम्हाला आढळलं की, भारतात आयात होणाऱ्या खेळण्यांची चाचणी एका सॅम्पलच्या आधारावर होते आणि या खेळण्यांना एक्सपायरी डेट नाही. त्यामुळे त्या टेस्ट रिपोर्टसोबत येणाऱ्या खेळण्यांच्या मालाची चाचणी झाली आहे की नाही, हे कळत नव्हतं. यावर बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर QCI ला बाजारातील खेळण्यांची गुणवत्ता तपासण्यास सांगण्यात आलं."
QCI ने गुणवत्ता चाचणीसाठी दिल्ली आणि एनसीआरमधून खेळणी आणली. मिस्ट्री शॉपिंगच्या (कुठल्याही दुकानातून कुठलंही खेळणं) माध्यमातून नमुने निवडण्यात आले. NABL मान्यप्राप्त प्रयोगशाळेत खेळण्यांची चाचणी करण्यात आली.
वेगवेगळ्या श्रेणीतील 121 खेळण्यांची चाचणी करण्यात आली.
चाचणीसाठी खेळण्यांच्या श्रेणी केल्या-
- प्लॅस्टिकपासून तयार केलेली खेळणी
- सॉफ्ट टॉय/स्टफ्ड टॉय
- लाकडाची खेळणी
- मेटलची खेळणी
- इलेक्ट्रिक खेळणी
- मुलं आत जाऊ शकतील, अशी खेळणी (उदा. टॉय टेंट)
- कॉस्च्युम
गुणवत्ता चाचणीत खेळण्यांमध्ये घातक केमिकलचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं.
काही खेळणी सुरक्षेच्या दृष्टीने घातक होती. त्यामुळे मुलांना दुखापत होण्याचा किंवा त्वचाविकार होण्याचा धोका होता.
गुणवत्ता चाचणीचे निष्कर्ष
- 41.3% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल चाचणीत फेल
- 3.3% खेळण्यांचे नमुने केमिकल चाचणीत फेल
- 12.4% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल आणि केमिकल चाचणीत फेल
- 7.4% खेळण्यांचे नमुने ज्वलनशीलता चाचणीत फेल
- 2.5% खेळण्यांचे नमुने मेकॅनिकल आणि ज्वलनशीलता चाचणीत फेल
नुकसान काय?
QCI ने खेळण्यांची मेकॅनिकल आणि केमिकल चाचणी केली. त्यानंतर पेंट्स, खेळण्यांमधील धातूंचीही चाचणी करण्यात आली. या चाचणीत केवळ 33% खेळणीच पास झाली.
अशा घातक खेळण्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगताना डॉ. आर. पी. सिंह यांनी म्हटलं, "बरीच खेळणी मेकॅनिकल चाचणीचे निकष पूर्ण करू शकली नाहीत. मेटलच्या खेळण्यांमुळे मुलांना दुखापत होऊ शकते का, तोंडात टाकल्यावर ही खेळणी घशात अडकू शकतात का या गोष्टी मेकॅनिकल चाचणीमध्ये पाहिल्या जातात."
"खेळण्यांमध्ये कुठल्या रसायनांचा वापर केला आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे, हे केमिकल चाचणीत तपासतात. उदाहरणार्थ-सॉफ्ट टॉईजमध्ये थॅलेट नावाचं रसायन असतं. या रसायनामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. या खेळण्यांमधून निघणाऱ्या धाग्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला नको. खेळण्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे त्वचाविकार होऊ शकतात. तोंडात टाकल्यास इन्फेक्शन होऊ शकतं."
"तसंच खेळण्यात शिसं, आर्सेनिकसारखे हेवी मेटलही असता कामा नये. मुलांचे टेंट हाउस आणि कपडे ज्वलनशील असतात. अशी खेळणी लवकर पेट घेतात."
या सर्व केमिकलसाठी जगभरातील आणि भारतीय निकषांनुसार प्रमाण ठरवण्यात आलं आहे. केमिकलचं प्रमाण जास्त असल्यास खेळणी मुलांना घातक ठरू शकतात.
भारतात सर्वाधिक खेळणी चीनमधून येतात. याशिवाय श्रीलंका, मलेशिया, जर्मनी, हाँगकाँग आणि अमेरिकेतूनही खेळणी येतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)