दानिश सिद्दिकींच्या हत्येच्या आधी आणि नंतर काय झालं होतं?

    • Author, विनित खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकींची अफगाणिस्तानात नुकतीच हत्या झाली. दानिशची हत्या नेमकी कुठल्या परिस्थितीत झाली, याबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दानिश सिद्दिकींच्या मृत्यूआधी आणि नंतर काय झालं, हे जाणून घेण्यासाठी बीबीसने काबुल, कंदहार आणि स्पिन बोल्डकमध्ये अधिकारी, पत्रकार आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. यातील बऱ्याच जणांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपलं नाव न छापण्याची विनंती केली.

स्पिन बोल्डक पाकिस्तानला लागून छोटंसं शहर आहे. तालिबान आणि सरकारी सैन्य यांच्यात लढाई सुरू असताना अफगाण लष्करासोबत वृत्तांकनासाठी स्पिन बोल्डकला जाण्याआधी दानिश कंदहार गव्हर्नरच्या कार्यालयात होते.

सुरक्षेच्या कारणास्तव दानिश सिद्दिकी, कंदहारचे गव्हर्नर आणि इतर लोकांना सांगितलं गेलं की, कार्यालयातच राहावं. कंदहार गव्हर्नरचे प्रवक्ते बशीर अहमदी यांनी पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दिकी यांच्यासोबत तीन दिवस कार्यालयात घालवले.

बशीर अहमदी त्या दिवसाची आठवण काढून सांगतात, "ते दिवस सलमान खानचा टीव्ही शो 'बिग बॉस'सारखे होतं. आम्ही एकाच घरात राहत होतो, एकाच खोलीत वेळ घालवला."

"दानिश हुशार व्यक्ती, हुशार फोटोग्राफर होता. त्याच्यासारखं कुणीच नव्हतं," असं अहमदी सांगतात.

त्या तीन दिवसात आम्ही सोबत जेवलो. सर्वजण एकत्र राहिलो. अहमदी सांगतात, "दानिश आणि मी अफगाणिस्तान, कंदहार आणि देशाच्या चालू घडामोडीवर चर्चा केली. आम्ही चांगले मित्र बनलो होतो. त्याच्यासोबत घालवलेला वेळ माझ्या कायम आठवणीत राहील."

दानिश सिद्दिकींवर ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी ते अफगाण सैन्याच्या एका तुकडीसोबत होते.

कंदहारपासून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावरील स्पिन बोल्डकच्या बाहेरील परिसरात झालेल्या हल्ल्यात दानिश सिद्दिकीसोबत दोन अफगाण सैनिकही मृत्युमुखी पडले. दानिशसोबत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अफगाण स्पेशल फोर्सचे कमांडर सेदीक करजईही होते.

अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, तिघांनाही 16 जुलैच्या सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास गोळी मारली गेली.

स्पिन बोल्डकमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की, "शहराच्या चौकात तालिबाननं त्यांचे मृतदेह आणले आणि प्रदर्शनासाठी ठेवलं गेलं आणि हवेत गोळीबार केला गेला. दुपारी जवळपास 12 वाजण्यापर्यंत त्यांचे मृतदेह तिथेच ठेवण्यात आले होते. दानिशच्या मृतदेहाला विद्रूप करण्यात आलं होतं."

या व्यक्तीनं पुढे सांगितलं की, "ते मृतदेह पाहण्यासाठी बरेच लोक तिथे जमले होते आणि त्यातीलच काही लोकांनी सांगितलं की तालिबानने बुलेटप्रूफ गाडी दानिशच्या चेहऱ्यावर चढवली."

"तालिबानी सांगत होते की, त्यांनी एका भारतीय गुप्तहेराला पकडलं आणि ठार केलं. आणि ते आताही हेच सांगत आहेत. तालिबानने दानिश सिद्दिकींच्या हत्येबाबत नकारच दिलाय," असंही ती स्थानिक व्यक्ती सांगते.

दानिश रॉयटर्ससाठी काम करत होते. रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटलंय, "तालिबान प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटलं की, तालिबानला हे माहित नव्हतं की, ज्या ठिकाणी भीषण युद्ध झालंय, तिथे एक पत्रकार वृत्तांकन करत होता आणि हे स्पष्ट नाही की, सिद्दिकीची हत्या झालीय."

मृतदेह गोळा केले

बशीर अहमदी यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला तालिबान मृतदेह देण्यास तयार नव्हता. मृतदेह मिळवण्यासाठी त्यांना तयार करावं लागलं. सरकारच्या आग्रहावर रेड क्रॉसच्या एका टीमनं मृतदेह स्पिन बोल्डकवरून उचलून कंदहारच्या मीरवायस हॉस्पिटलला पोहोचवलं.

हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "जेव्हा आमच्यापर्यंत दानिशचा मृतदेह पोहोचला, त्यावेळी त्याचा चेहरा ओळखूही येत नव्हता. दुसऱ्याच दिवशी दानिशचा मृतदेह फॉरेन्सिक तपासासाठी हवाई मार्गे काबुलला पाठवला गेला."

बशीर अहमदी आणि कंदहारच्या हॉस्पिटलमध्ये या तिन्ही मृतदेहांना पाहणाऱ्या एका पत्रकाराच्या माहितीनुसार, सेदीक करजाईच्या चेहऱ्याला विद्रूप केलेलं नव्हतं.

आम्हाला दानिशच्या मृतदेहाचा अहवाल तर सापडला नाही. मात्र, कंदहारच्या या पत्रकारानुसार, दानिशच्या मानेच्या खाली गोळीची खूण दिसली नाही. दानिशचा मृतदेह विद्रूप केल्याच्या अनेक बातम्यांवर तालिबाननं अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, जर तालिबानकडून असं केलं गेलं असेल, तर त्याचं कारण स्पष्ट नाही.

अफगाण जर्नलिस्ट सेफ्टी कमिटीचे प्रमुख नजीब शरीफी म्हणतात, "ज्या पद्धतीने दानिशचा मृतदेह विद्रूप केला गेला, ते निंदनीय आहे."

ते म्हणतात, "याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे, ते पत्रकार होते. दुसरं कारण म्हणजे, ते भारतीय होते."

तालिबानसाठी दानिश सिद्दिकीचं राष्ट्रीयत्व ओळखणं कठीण काम नव्हतं. ते ट्विटरवर प्रचंड सक्रीय होते आणि आपल्या पासपोर्ट आणि मीडियाशी संबंधित कागद त्यांच्यासोबतच असणार.

खरंतर हत्येच्या काही तासांआधीच दानिश सिद्दिकी यांनी लढाईच्या स्थितीचे ट्वीट केले होते.

16 जुलैला काय झालं?

16 जुलैला बशीर अहमदी कंदहार गव्हर्नरच्या कार्यालयात होते. त्यांच्यासोबत गव्हर्नरसह मिलिट्री कमांडरही होते, जे अफगाण लष्कराच्या कारवाईवर नजर ठेवून होते. अफगाण स्पेशल फोर्स कमांडर सेदीक करजई सातत्यानं कार्यालयाच्या एका व्यक्तीला परिस्थिती सांगत होते आणि ती व्यक्ती कार्यालयातील लोकांना अपडेट करत होती.

बशीर अहमदी सांगतात की, "त्यावेळी युद्धसारखी स्थिती होती. सेदीक यांनी आम्हाला माहिती दिली की, ते पुढे येत आहेत. तालिबानला मारत आहेत. ते चांगलं काम करत आहेत. सगळेच आशादायी असतानाच बातमी आली की, सेदीक करजई यांच्या फोनचा संपर्क होत नाही आणि काही मिनिटात कळलं की, त्यांचाच मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह तालिबान्यांच्या ताब्यात आहे."

बशीर सांगतात, "सेदीक करजई आमच्या सर्वात उत्कृष्ट योद्ध्यांमधील एक होते. गेल्या 20 वर्षांच्या लढाईत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील 13 जणांना गमावलं होतं."

या घटनेनंतर काही मिनिटांनीच दानिशी सिद्दिकी यांच्या मृत्यूची बातमी आली.

बशीर सांगतात की, "गव्हर्नर, कमांडर्स असे सगळेजण धक्क्यात होते. आताच तर आम्ही दानिशसोबत लंच आणि डिनर केला होता. आम्ही विचारही केला नव्हती की, दानिशला मारलं जाईल. कारण आम्हाला विश्वास होता की सेदीक करजई विजय होतील."

दानिश सिद्दिकीचा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला, याला दुजोरा देणं अशक्य आहे. कारण आम्हाला असा एकही अफगाण सैन्य माहित नाही, जो त्या मिशनमधून जिवंत बचावला आहे.

असा एक मतप्रवाह आहे की, त्या सगळ्यांवर लपून गोळीबार केला गेला किंवा आरपीजीने हल्ला केला गेला. त्यात सर्वजण मारले गेले. दुसरा मतप्रवाह असा आहे की, त्यांची बुलेटप्रूफ गाडी तालिबान्यांनी चालवण्यायोग्य ठेवली नाही. तालिबानने त्यांना घेरलं आणि गाडीतून बाहेर काढून गोळीबार केला.

स्पिन बोल्डकमधील एका नागरिकांना सांगितलं की, "जिथं दानिशला मारलं, तिथून शंभर मीटरवर माझं घर आहे. मी घरातच होतो. त्यावेळी मला गोळीबाराचा आवाज आला. तेव्हा मी घाबरलो."

दानिशच्या मृतदेहाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसतोय.

कंदहारच्या एका पत्रकारानं स्पिन बोल्डकच्या लोकांच्या हवाल्यानं सांगितलं की, "तिन्ही व्यक्तींच्या हत्येनंतर बुलेटप्रूफ गाडी घेऊन गेले. मात्र, परत आले आणि दानिशवर गाडी चढवली."

रेड क्रॉसची टीम मृतदेह आणण्यासाठी पोहोचली

अधिकारी आणि स्पिन बोल्डकच्या लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की, रेड क्रॉसची टीम तिथं पोहोचेपर्यंत, तिन्ही मृतदेह त्या चौकातच पडून होते.

स्पिन बोल्डकमधीलच आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, स्थानिक मीडियाकडून कळलं की, भारतीय पत्रकाराची हत्या झाली. ही व्यक्ती संध्याकाळी 4 वाजता चौकात पोहोचली, तेव्हा मृतदेह तिथेच होते.

त्यांनी पुढे सांगितलं की, त्यावेळी त्या चौकात मोठी गर्दी जमली होती.

स्पिन बोल्डक शहराची सीमा पाकिस्तानला लागून आहे आणि त्याचा ताबा तालिबानकडे आहे.

वृत्तांनुसार, तालिबानने या भागात नवीन कर लागू केले आहेत आणि सीमेपलिकडे जाणाऱ्या साहित्यावर कर आकरत आहेत.

17 जुलैला प्रसिद्ध झालेल्या रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलंय की, दानिश सिद्दिकीने त्यांना सांगितलं की, "शुक्रवारी लढाईची रिपोर्टिंग करत असताना छातीच्या इथं दुखापत झाली होती आणि त्यानंतर तालिबान स्पिन बोल्डकमधील लढाईतून मागे गेले."

रिपोर्टमध्ये एका कमांडरच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, जेव्हा तालिबानने दुसऱ्यांदा हल्ला केला, तेव्हा दानिश दुकानदारांशी बोलत होते. स्थानिक अफगाण पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केलेत की, जेव्हा दानिश सिद्दिकी जखमी होते, तेव्हा त्यांना त्याच भागात का सोडलं गेलं?

अफगाण जर्नलिस्ट सेफ्टी कमिटीचे प्रमुख नजीब शरीफी म्हणतात की, "जेव्हा दानिशला दुखापत झाल्याचं रॉयटर्सला कळलं, तेव्हा रॉयटर्सनं दानिशला तिथून बाहेर जायला सांगायला हवं होतं."

बीबीसीला पाठवलेल्या उत्तरात रॉयटर्सनं म्हटलंय की, "आमचे सहकारी दानिश सिद्दिकींच्या मृत्यमुळे आम्हाला प्रचंड दु:ख झालं आहे. आम्ही तथ्यांची चौकशी करत आहोत की, दानिशचा मृत्यू नेमका कसा झाला."

नजीब शरीफी म्हणतात की, "आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, दानिशला बंदी बनवलं गेलं आणि त्यांची हत्या करण्यात आली की गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)