You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दानिश सिद्दीकी यांची तालिबानकडून निघृण हत्या, अमेरिकन वृत्तपत्राचा दावा
भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान संघटनेच्या कट्टरवाद्यांनी 'निर्घृण हत्या' केली, असं अमेरिकेतल्या एका वृत्तपत्राने म्हटलं आहे. वॉशिंग्टन एक्झामिनर असं या वृत्तपत्राचं नाव आहे.
या बातमीनुसार पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्या चकमकीत अडकल्यामुळे झाला नाही तर तालिबानने सरळ सरळ त्यांची हत्या केली.
वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करणारे 39 वर्षीय दानिश रिपोर्टिंगसाठी अफगाणिस्तानातल्या कंदहारच्या स्पिन बोल्डक भागात होते, तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता.
आधी आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं गेलं की दानिश यांचा मृत्यू अफगाणिस्तानची सेना आणि तालिबानच्या चकमकीत झाला होता.
तालिबानने एक निवेदन जारी करून त्यांच्या मृत्यूला आपण जबाबदार असल्याचा इन्कार केला.
तालिबानने म्हटलं की, "आम्हाला भारतीय पत्रकाराच्या मृत्यूबद्दल खेद आहे. या भागात रिपोर्टिंगसाठी येणाऱ्या पत्रकारांनी सुचना द्यावी, आम्ही त्यांची काळजी घेऊ."
'मशिदीवर हल्ला झाला कारण दानिश तिथे होते'
वॉशिंग्टन एक्झामिनरची बातमी आता तालिबानचे दावे खोटे आहेत असं म्हणतेय.
या बातमीनुसार दानिश सिद्दीकी अफगाणी सैन्यासोबत स्पिन बोल्डक भागात अफगाण-तालिबान संघर्ष कव्हर करायला गेले होते. स्पिन बोल्डक भाग तालिबानच्या ताब्यात आहे.
या बातमीत म्हटलंय की, "जेव्हा अफगाणी सैन्य आणि दानिश एका कस्टम पोस्टपासून काही अंतरावर होते तेव्हाच त्यांच्यावर तालिबानने हल्ला केला. अफगाणी सैन्य दोन तुकड्यांमध्ये विभागलं गेलं. यादरम्यान अफगाणी सैन्यातले काही कमांडर आणि सैनिक दानिश यांच्यापासून वेगळे झाले."
वॉशिंग्टन एक्झामिनरनुसरा यावेळी झालेल्या गोळीबारात दानिश सिद्दीकी जखमी झाले आणि त्यांना प्राथमिक उपचार देण्यासाठी स्थानिक मशिदीत नेण्यात आलं.
जेव्हा तालिबानला कळलं की सिद्दीकी यांना उपचारासाठी मशिदीत नेलंय, तालिबानने त्या मशिदीवर हल्ला केला. या रिपोर्टमध्ये स्थानिक तपासाच्या हवाल्याने लिहिलंय की तालिबानने मशिदीवर हल्ला केला कारण दानिश तिथे होते."
या रिपोर्टनुसार, "तालिबानने जेव्हा सिद्दीकी यांना पकडलं तेव्हा ते जिवंत होते. तालिबान्यांनी त्यांची ओळख पटवली आणि मग त्यांना गोळी मारली."
'आधी डोक्यावर मारलं आणि मग गोळ्या झाडून शरीराची चाळणी केली'
अमेरिकन एंटरप्राईज इंस्टिट्युटचे फेलो मायकल रूबिन यांच्यामते, "सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे फोटो सोशल मीडियावर फिरले यात त्यांचा चेहरा स्पष्ट ओळखता येतोय. मी भारत सरकारच्या एका सुत्राकडून मिळालेले सिद्दीकींचे आणखी काही फोटो आणि एका व्हीडिओचाही अभ्यास केला."
रूबिन यांनी लिहिलंय की, "मी व्हीडिओत पाहिलं तालिबानी बंडखोरांनी आधी सिद्दीकी यांच्या डोक्यावर वार केले आणि मग गोळ्यांनी त्यांच्या शरीराची चाळणी केली."
अफगाणिस्तानात गेले होते रिपोर्टिंगसाठी
फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तान लष्कर आणि तालिबान यांच्यातील संघर्षाचं छायाचित्रण करण्यासाठी अफगाणिस्तानात गेले होते.
तिथं पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर अफगाणिस्तानचं लष्कर आणि तालिबानींच्या संघर्षात दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची बातमी 16 जुलै रोजी आली होती.
दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. रॉयटर्सनं त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा दलाची एक तुकडी स्पिन बोल्डक शहरातील बाजारावर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तालिबानींबरोबर चकमक झाली आणि त्यात दानिश यांच्यासह अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं, अफगाणिस्तानच्या कमांडरनं रॉयटर्सला सांगितलं.
दानिश आठवडाभरापासून अफगाणिस्तानच्या विशेष दलासह कंधहार प्रांतात होते. त्याठिकाणाहून ते अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील संघर्षाच्या बातम्या पाठवत होते, अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे.
रॉयटर्सचे प्रमुख मायकल फ्रिडेनबर्ग आणि मुख्य संपादक अॅलेसँड्रा गॅलोनी यांनी याबाबत अधिक माहिती मिळवत असून, या भागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं.
अद्याप भारत सरकारकडून दानिश यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया आलेली नाही.
रॉयटर्सची प्रतिक्रिया
"दानिश अत्यंत हुशार पत्रकार होते. त्याचबरोबर ते उत्तम पती, पिता आणि सहकाऱ्यांमध्ये आवडते होते. या अत्यंत दुर्दैवी काळात त्यांच्या कुटुंबाबरोबर आमच्या संवेदना आहेत," असं फ्रिडेनबर्ग आणि गॅलोनी म्हणाले.
"युद्धाचं रिपोर्टींग करताना गोळीबारात ते जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. स्पिन बोल्डकमध्ये तालिबान मागं हटलं त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तेव्हा त्यांची तब्येत ठिक होती," असं रॉयटर्सनं म्हटलं आहे.
त्यापूर्वी भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दजई यांनी दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
"काल रात्री कंधहारमध्ये माझा मित्र दानिश सिद्दीकीच्या मृत्यूच्या वृत्तानं वेदना झाल्या. पुलित्झर प्राप्त भारतीय पत्रकार दानिश अफगाणिस्तानच्या लष्कराबरोबर होते. मी दोन आठवड्यांपूर्वी त्यांना भेटलो होतो. तेव्हा ते काबूलला चालले होते. त्यांचं कुटुंब आणि रॉयटर्सप्रतीही माझ्या संवेदना आहेत," असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
टोलो न्यूज या अफगाणिस्तानच्या टीव्ही चॅनलच्या मते दानिश यांचा मृत्यू कंधहारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यातील संघर्षाचं वृत्तांकन करताना झाला.
तालिबानं बुधवारी स्पिन बोल्डक शहर आणि त्याठिकाणी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील एका महत्त्वाच्या चौकीवर ताबा मिळवला होता.
2018 मध्ये मिळाला होता पुलित्झर पुरस्कार
दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचे मुख्य फोटोग्राफर होते. काही दिवसांपासून ते अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षाचं वृत्तांकन करत होते. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत सातत्यानं त्याठिकाणच्या स्थितीची माहिती दिली होती. एका हल्ल्यातून बालंबाल बचावल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
दानिश सिद्दीकी सध्या मुंबईत स्थायिक होते. याठिकाणी ते भारतातील रॉयटर्स पिक्चर्सच्या मल्टीमीडिया टीमचे प्रमुख होते. .
रोहिंग्या निर्वासितांच्या संकटाच्या वृत्तांकनासाठी केलेल्या फीचर फोटोग्राफी श्रेणीत त्यांना 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धाशिवाय कोरोनाची साथ, नेपाळचा भूकंप आणि हाँग-काँगमधील आंदोलनाचं वृत्तांकनही केलं होतं.
त्यांनी दिल्लीमध्ये जामिया मिलिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. 2007 मध्ये त्यांनी जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून जनसंपर्क विषयांत पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) पूर्ण केली होती.
पत्रकारितेतील सुरुवात त्यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रतिनिधी म्हणून केली होती. नंतर ते फोटो जर्नालिस्ट बनले. 2010 मध्ये त्यांनी रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली होती.
'सरकारला विनंती'
"दानिश सिद्दीकी त्यांच्या पाठिमागं मोठ्या यशाचा वारसा सोडून गेले आहेत. त्यांनी फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळवला होता. कंदहारमध्ये ते अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांबरोबर काम करत होते. त्यांचा एक फोटो शेअर करतोय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,'' अशी पोस्ट माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
कांग्रेस नेते राहुल गांधींनीही दानिश यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. "दानिश यांच्या कुटुंब आणि मित्र परिवाराप्रती माझ्या संवेदना आहे. भारत सरकारनं शक्य तेवढ्या लवकर त्यांचं पार्थिव घरी आणावं, अशी विनंती आहे," असं राहुल गांधींनी म्हटलं.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही दानिश सिद्दीकींच्या निधनावर शोक प्रकट केला आहे. "दानिश यांच्या अकाली निधनाचं दुःख आहे. त्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून साथींमुळं होणारं नुकसान, सामुहिक हत्या आणि मानवी संकटं आपल्यासमोर मांडली होती. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि कट्टरतावाद यांचा खात्मा करायलाच हवा, हा संदेश पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूमुळं जगाला मिळाला,'' असंही ते म्हणाले.
"आपल्या भावना दृश्यांवर जास्तीत जास्त अवलंबून असलेल्या काळात त्यांनी संवेदनशीलता, विषयाची प्रतिष्ठा आणि सौदर्यदृष्टीच्या माध्यमातून आपल्या मनाचा ताबा घेणारी छायाचित्रं टिपली होती. दानिश, आमचा काळ फोटोंमध्ये दाखवण्यासाठी आपले आभार. हे फोटो कायम जिवंत राहतील. ईश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो," असं कॉमेडी आर्टिस्ट कुणाल कामरा यांनी म्हटलं.
सिद्दीकी यांनी काढलेली छायाचित्रे
दानिश सिद्दीकी यांनी अफगाणिस्तानात रिपोर्टिंगसाठी गेल्यानंतर गेल्या आठवड्यात काढलेला हा फोटो..
सिद्दीकी यांच्या शेवटच्या काही फोटोंमध्ये या फोटोचा समावेश होतो.
या फोटोत त्यांनी तालिबान फायटर्सवर गोळीबार करणाऱ्या अफगाण स्पेशल फोर्सेसना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं.
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असताना एका बेडवर दोन रुग्णांना ठेवून उपचार द्यावे लागत होते. त्यावेळचा हा फोटो.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत होते, तेव्हाचा हा फोटो...
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईचं सांत्वन करणाऱ्या मुलांचा सिद्दीकी यांनी काढलेला हा फोटो.
लॉकडाऊन लागल्यानंतर एप्रिल 2020 दरम्यान अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं होतं. त्यावेळी सिद्दीकी यांनी काढलेल्या या फोटोची खूप चर्चा झाली होती.
फेब्रुवारी 2020 दरम्यान दिल्ली दंगल घडली होती. त्यावेळी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण होत असल्याचा हा फोटो सिद्दीकी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)