संभाजीराजे छत्रपती : 'दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण तसं करायचं नाहीय' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) 'दोन मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, पण तसं करायचं नाहीय' - संभाजीराजे

"आपल्याला एकजुटीनं लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचं नाहीय. ही लढाई संयमानंच लढायची आहे," असं खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणाले.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत संभाजीराजे बोलत होते. आपले महानगरने ही बातमी दिली आहे.

संभाजीराजेंनी याआधी महाराष्ट्र सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. आता पुन्हा लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पुढील मूक मोर्चा नांदेड जिल्ह्यातून होणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली.

मतभेद विसरून केवळ मराठा समाजासाठी एकत्र आल्याबद्दल संभाजीराजेंनी क्रांती मोर्चाच्या बैठकीत समाधानही व्यक्त केलं.

अजित पवार-शाहू महाराज यांची कोल्हापुरात भेट झाल्यानंतर काही आरोप झाले. त्यांनाही संभाजीराजेंनी उत्तर दिलं.

"महाराज मॅनेज झाल्याचे या भेटीनंतर म्हटलं गेलं. मात्र, ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील, त्या दिवशी घरी जाऊन बसेन. छत्रपती असे नाही मॅनेज होणार. माझ्यावर विश्वास ठेवा," असं संभाजीराजे म्हणाले.

2) शहरी नक्षलवादप्रकरणी आरोप निश्चितीसाठी NIA कडून मसुदा तयार

शहरी नक्षलवादप्रकरणी अटकेत असलेल्या 15 आरोपींवरील आरोप निश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी (9 ऑगस्ट) आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

दहशतवादासारख्या गंभीर आरोपांसह 17 आरोपांचा NIA ने तयार केलेल्या मसुद्यात समावेश आहे. यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचाही (UAPA) समावेस आहे.

या मसुद्यावर विशेष न्यायालयातच 23 ऑगस्टला सुनावणी होणार असून, त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल.

या प्रकरणात मानवाधिकार हक्कांसाठी लढणाऱ्या सुधा भारद्वाज, वरवरा राव, हानी बाबू, प्रा. आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांसाह 15 जण अटकेत आहेत.

3) राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाहीय, म्हणून वेळकाढूपणा - फडणवीस

"महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीय. त्यामुळे त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे," अशी टीका महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं.

"सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीय, तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे. एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचा हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केले नाही, तर आरक्षण देण्याचा प्रश्न येतो कुठून?" असं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली.

"जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकराने कारवाई करावी," असंही ते म्हणाले.

4) कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी विरोधक एकवटले, राहुल गांधी अनुपस्थित

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनर आयोजित केला होता.

या डिनरला 15 पक्षांतील 45 नेते आणि खासदार हजर होते. यामध्ये लालूप्रसाद यादव, शरद पवार, अखिलेश यादव, डेरेक ओब्रायन, सीताराम येचुरी आणि संजय राऊत यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

बीजेडी, अकाली दल आणि आम आदमी पक्षाचे नेतेही आले होते.

या बैठकीला कोण आलं होतं, यापेक्षा कोण आलं नव्हतं, याची चर्चा राजकीय वर्तुळात अधिक रंगली. कारण काँग्रेस नेत्यानं आयोजित केलेल्या या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अनुपस्थित होते. राहुल गांधी हे काश्मीर दौऱ्यावर गेले असताना हे डिनर आयोजित केल्यानं ते उपस्थित राहू शकले नाहीत.

5) भाजपला इलेक्टोरल बाँड्समधून एका वर्षात मिळाली 2,555 कोटींची देणगी

2019-2020 या एका आर्थिक वर्षात भाजपला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून 2 हजार 555 कोटी रुपये मिळाले. स्क्रोलनं ही बातमी दिली आहे.

2019-20 मध्ये एकूण 3 हजार 355 कोटींचे इलेक्टोरल बाँड विकले गेले. यातील 78 टक्के रक्कम एकट्या भाजपच्या खात्यात जमा झालीय. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 75 टक्क्यांनी अधिक आहे.

काँग्रेसच्या खात्यात जमा झालेल्या रकमेत 17 टक्क्यांनी घट झालीय. काँग्रेसला इलेक्टॉरल बाँड्सच्या माध्यमातून 318 कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)