You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई लोकल प्रवासासाठी ऑफलाईन पास कसा मिळणार?
मुंबईत स्वातंत्र्यदिनापासून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे मात्र त्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेतलेलं असणं आवश्यक आहे. यासंदर्भातील नियमावली सरकारने जाहीर केली आहे.
दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मुंबईत लोकल प्रवास सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती.
मुंबईत लोकल प्रवास सुरू करत आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून लोकलचा प्रवास लशीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झाले आहेत त्यांना प्रवासाची मुभा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
लशीकरण झालेल्या नागरिकांची माहिती अॅपवर टाकली आहे. येत्या काही दिवसात अॅप लॉन्च करण्यात येईल.
ऑफलाईन सिस्टमनेही पास देण्यात येईल. 19 लाख नागरिक असे आहेत ज्यांचे लशीचे दोन डोस झाले आहेत आणि लसीकरण होऊन 14 दिवस झाले आहेत. हे नागरिक लोकल प्रवासासाठी पात्र असतील.
15 तारखेपर्यंत अॅप, महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पास कलेक्ट करावेत.
सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी बुधवार 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सुरु होणार कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया
- नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोव्हिड लसीकरण दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक
- पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना दिनांक 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा
- मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष उघडणार
- संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 स्थानकांवर मदत कक्ष
- सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत
- घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये
- बनावट कोव्हिड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही
कोव्हिड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार, दिनांक 11 ऑगस्ट 2021 पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे, त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
कोव्हिड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाईन ऍपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. ऍप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल.
तत्पूर्वी उद्या, दिनांक 11 ऑगस्ट 2021 पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, असे चहल यांनी नमूद केले.
रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन करुन ही रेल्वे पास देण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, त्याबाबत बोलताना चहल यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
अशी असेल प्रक्रिया
1. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक 358 मदत कक्ष असतील.
2. मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
3. ज्या नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
4. रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका (अथवा संबंधित महानगरपालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.
5. मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोव्हिड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट - दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोव्हिड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.
6. सदर शिक्का मारलेले कोव्हिड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.
7. कोव्हिड लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.
8. मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी 7 ते रात्री 11 अशी तब्बल 16 तास पडताळणी सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करु नये, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
9. जर कोणीही बनावट कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
10. अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोव्हिड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.
11. मुंबई महानगर प्रदेशातील इतर सर्व महानगरपालिका / नगरपरिषद / स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही याचप्रकारे उद्यापासून व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावून वैध प्रक्रिया पार पाडावी.
12. शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. तथापि, त्यास आणखी काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता, टप्प्या-टप्प्याने तसेच ज्यांना अधिक आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य देवून पडताळणी पूर्ण करुन मासिक पास प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, मासिक पास प्राप्त करणे अतिशय सुलभ होणार आहे. ती व्यवस्था देखील पुढील आदेश येईपर्यंत सुरु राहील.
13. या संपूर्ण प्रक्रियेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) देखील नेमले असून त्यांच्यासह आवश्यक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)