नीरज चोपडाचं 'रोड मराठा' म्हणून कौतुक संकुचित जातीय अस्मितेचं लक्षण आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदक मिळवलं. भालाफेकीत सुवर्ण कामगिरी करणारा नीरज चोपडा मूळचा हरियाणातील पानिपतचा आहे. तो 'रोड मराठा' असल्याच्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्राला तो अचानक अधिक जवळचा वाटू लागला.
टोकियोत ऑलिम्पिकच्या प्रांगणात जवळपास अकरा वर्षांनी भारताच्या राष्ट्रगीताचा आवाज घुमल्यानं देशभरातून कौतुक होत असताना, मराठी माध्यमांनी नीरजचं महाराष्ट्र कनेक्शन शोधून काढलं.
केवळ माध्यमांनीच नव्हे, तर राजकीय पुढारी, संघटनांकडूनही नीरज 'मराठा' असल्याचं म्हणत त्याचं विशेष कौतुक करण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नीरजनं मराठ्यांची ताकद आणि कौशल्य दाखवून दिल्याचं केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं, तर हरियाणातील रोड मराठा समाजाचे नेते वीरेंद्र मराठा म्हणाले, "रोड मराठा समाजातल्या नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो."
नीरजने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तो रोड मराठा असल्याचा ओझरता उल्लेख आढळतो.
या मुलाखतीच्या प्रस्तावनेत त्यांनी नीरज 'रोड मराठा' असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, पुढे मुलाखतीत नीरजकडून तसा कुठलाही दुजोरा किंवा उल्लेख आढळत नाही.
बीबीसीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी टोकियोत नीरजला त्याच्या राज्याविषयी प्रश्न विचारला असता, नीरजनं दिलेलं उत्तर बोलकं आहे. नीरज हसत म्हणाला, "मी तसा हरियाणातला आहे, पण भारतासाठी खेळतो, तेच जास्त महत्त्वाचं आहे."
प्रत्येक वेळी कुणालाही पदक मिळालं की त्या खेळाडूच्या राज्य, भाषा, जात, धर्म या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला सुरुवात होते. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी पाहूया की रोड मराठे नेमके कोण आहेत.
'रोड मराठा' कोण आणि त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?
रोड मराठा कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी 257 वर्षं मागे जावं लागेल.
सध्याच्या हरियाणातल्या पानिपत इथं सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली याच्याशी युद्ध करण्यासाठी पोहोचलं होतं.

फोटो स्रोत, RAVINDRA MANJREKAR/BBC
14 जानेवारी 1761ला झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सैन्य पराभूत झालं.
या युद्धात जवळपास 40,000 ते 50,000 मराठा सैनिक मारले गेल्याचं म्हटलं जातं.
याबद्दल बीबीसी मराठीने सविस्तर बातमी केली होती. त्यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी सांगितलं होतं, "काही मराठा सैनिकांनी तिथून (युद्धभूमीतून) पळ काढला. ते आजूबाजूच्या परिसरात लपून राहिले. मराठा म्हणून ओळखले जाऊ, अशी भीती त्यांच्या मनात होती. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी या परिसरातील एक राजा रोडच्या नावानं स्वतःची ओळख करून देण्यास सुरुवात केली."
"रोड मराठा समाजाला त्यांच्या मुळाविषयी माहिती नव्हती. पण त्यांनी आपल्या प्रथापरंपरा जपण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. या समाजातील अनेक प्रथा या महाराष्ट्रातील परंपरांशी मिळत्या-जुळत्या आहेत. काही मराठी शब्द त्यांच्या बोलण्यातून आजही येतात," असंही डॉ. वसंतराव मोरे सांगतात. त्यांनी दहा वर्षं रोड मराठा समाजावर संशोधन केलं आहे.
पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समजाचं वास्तव्य आहे. रोड मराठ्यांची निश्चित अशी लोकसंख्या माहिती नसली, तरी डॉ. मोरे यांच्या माहितीनुसार हरियाणात या समाजाची संख्या सहा ते आठ लाख असावी.
इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे रोड मराठ्यांबद्दल वेगळा इतिहास सांगतात. ते म्हणतात की, महादजी शिंदे आणि तुकोजी होळकरांनी दिल्लीवर कब्जा मिळवला. मात्र, 1800 नंतर मराठ्यांची सत्ता कमकुवत झाली, तरी काही सैन्य तिथेच राहिले. त्याच सैनिकांचे वंशज म्हणजे रोड मराठा समाज आहे.
खेळाडूच्या कामगिरीपेक्षा त्यांची अस्मिता एवढी महत्त्वाची का होते?
आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ की, नीरज चोपडा 'रोड मराठा' आहे, हरियाणवी आहे की आणखी कुठल्या समाजातला, हे शोधण्याची गरज का भासली? त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं, हे पुरेसं नाही का? अस्मितेच्या चौकटीशिवाय कौतुकाची थाप देता येऊ शकत नाही का? असे नाना प्रश्न उभे राहतात.

फोटो स्रोत, NIRANJAN CHHANWAL/BBC
पण हे नीरज चोपडाच्याच बाबतीत होतंय, असंही नाही. याआधीही असं होत आलंय.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची जात गूगलवर शोधली गेली, तसंच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळवल्यानंतर धावपटू हिमा दासबाबतही असंच झालं. तिचीही जात कोणती, हे शोधून काढण्यात लोकांना जास्त रस होता, हे गूगलच्या डेटावरून पुढे आलं.
टेनिसपटू सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केल्यानंतर तिला 'पाकिस्तानी' म्हणून चिडवलं गेलं, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी टीममध्ये खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबाला जातिवाचक शब्दांनी हिणवलं गेल्याचा आरोप आहे.
याविषयी बोलताना मुंबई विद्यापीठातील माध्यम विभागाचे प्रमुख संजय रानडे म्हणतात, "लोकांनी एखाद्या खेळाडू किंवा अन्य चांगल्या क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीला आपल्या समूहाशी जोडून घेणं, हे काही तात्कालिक नाहीये. यामागे इतिहासातले संदर्भ आहेत."
ते पुढे सांगतात, "भारतात असे अनेक समाज समूह आहेत, ज्यांच्याकडे स्वत:चे असे आयकॉन्स नाहीत. अशावेळी नीरज चोपडासारखे खेळाडू समोर येतात, त्यावेळी त्यांना आपल्या गटाचा शिक्का मारून आपल्या बाजूला खेचण्याची चढाओढ दिसून येते."
"माध्यमांनी यात हस्तक्षेप करून, अशा आदर्श व्यक्तींना तटस्थ म्हणून समोर ठेवलं पाहिजे. म्हणजे, कुठल्याही एका समाजाचा म्हणून नव्हे, तर ती व्यक्ती सर्वांसाठी तितकीच आदर्श आहे, हे सांगितलं पाहिजे, तरच नीरज चोपडाच्या बाबतीत आता सुरू आहे, तशा गोष्टी थांबू शकतील," असं संजय रानडे म्हणतात.
'हा तर नीरजचा अपमान'
प्रादेशिक माध्यमांनी नीरज चोपडाबाबत केलेल्या वृत्तांकनाबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आक्षेप नोंदवतात.

फोटो स्रोत, Getty Images
हेमंत देसाई म्हणतात, "ऑलिम्पिक ही स्पर्धा एखाद्या खेळाडूला जागतिक ओळख देते, मात्र आपली माध्यमं अशा खेळाडूंना भारतीयही नव्हे, तर एखाद्या जातसमूहाशी बांधू पाहते, हे दुर्दैवी आहे. अशाने आपण खेळाडूचं कौतुक नव्हे, तर अपमान करतोय."
त्याचसोबत, "नीरज चोपडाला भारतीय म्हणून आपण अभिमान बाळगला पाहिजेच. मात्र, तो रोड मराठा असल्यानं महाराष्ट्राशी जोडणं म्हणजे आपल्या संकुचित विचारांचं प्रदर्शन घडवणारं उदाहरण ठरेल," असंही हेमंत देसाई म्हणतात.
यावेळी हेमंत देसाईंनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांचं उदाहरण दिलं. ते म्हणतात, "कमला हॅरिस या वंशाने भारतीय असल्या तरी त्या जन्माने अमेरिकन आहेत. तरी आपण त्यांना भारतातल्या विशिष्ट राज्याशी, समूहाशी जोडून घेतलं. नीरजबाबत आपलं तेच होतंय. आपण नीरजला भारतीय म्हणूनच स्वीकारलं पाहिजे आणि तसाच त्याचा अभिमान व्यक्त केला पाहिजे."
'जातनिहाय किंवा धर्मनिहाय समर्थन थांबवलं पाहिजे'
याबाबत पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे या अधिक सविस्तर विश्लेषण करतात.
त्या म्हणतात, "खेळाच्या सोई-सुविधांचा अभाव असतानाही शेतकरी कुटुंबातल्या नीरज चोपडाने ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं, त्याबद्दल आपण अभिनंदन केलं पाहिजे. तसंच, त्याच्याकडून इतर तरुणांना प्रेरणा मिळेल, हेही निश्चित आहे."

फोटो स्रोत, Getty Images
नीरज चोपडाला विशिष्ट समूहाशी जोडलं जाण्याचं कारण सांगताना श्रुती तांबे म्हणतात, "बहुतांश माध्यमं समाजाला चुकीच्या दिशेनं नेत आहेत, हे जसं स्पष्ट आहे, तसंच, प्रगल्भ वैज्ञानिक जाणिवा निर्माण करून भविष्यातील भारत घडवण्याऐवजी उलटी पडलेली पावलं भारतातील बहुतांश समाजघटकांमध्ये दिसतात. पुराणकथा, मिथकांचं गौरवीकरण असेल किंवा अवैज्ञानिक आवाहनं करणं, याची एक लाटच हल्ली दिसून येते. याच लाटेतले लोक नीरज चोपडाचं कौतुक जातीच्या चष्म्यातून करू पाहतात."

फोटो स्रोत, BEN STANSALL
"आज नीरज चोपडाचं अभिनंदन जातीच्या अंगानं होतंय, पण हेच पुढे वाढून जातनिहाय खेळाडू खेळवण्यापर्यंत पोहोचेल, किंवा मुलींबाबत तर जातीचे नियम लावून त्यांना खेळण्यासही बंदी आणली जाईल. हॉकीपटू वंदना कटारियाच्या घराबाहेर जो प्रकार घडला, त्यावरून हे चित्र दूर असल्याचेही वाटत नाही. त्यामुळे हे समूहनिहाय समर्थन थांबवलं पाहिजे," अशी भूमिका श्रुती तांबे मांडतात.
या प्रक्रियेत माध्यमांच्या भूमिकेबाबत श्रुती तांबे म्हणतात, "माध्यमांनी जात समूहाशी नीरजला जोडणं अत्यंत चूक आहे. कारण समाजातला चुकीचा प्रवाह पुढे न्यायचा की तिथेच खोडून काढायचा, याचं भान शिक्षकांप्रमाणे माध्यमांकडे असायला पाहिजे. मात्र, आपल्याकडील माध्यमं स्वतंत्र बुद्धीचे असल्याचे दिसून येत नाही."
"महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अद्याप नीरज चोपडाला कुठल्याही समूहगटाशी जोडून कौतुकाची थाप दिली नाही, ही समाधानाची बाब आहे. कारण नीरज किंवा कुठल्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीबाबत भारतीय म्हणूनच कौतुक करायला हवं, हा पायंडा पडणं आवश्यक आहे, यात शिक्षक, राजकीय नेत्यांसह माध्यमांची भूमिका महत्त्वाची असेल," असं त्या शेवटी म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








