OBC : विजय वडेट्टीवार म्हणतात, 'सत्ता कुणाचीही असो, आम्ही फक्त बशा धुणारे झालोय'#5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) सत्ता कुणाचीही असो, आम्ही फक्त बशा धुणारे झालोय - विजय वडेट्टीवार

"सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं? आम्ही फक्त बशा धुणारे झालोय. आम्हाला भजे दिले की, आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खातायेत ना. ज्यांच्यामुळे मंत्री झालो त्यांच्यासाठी खपायला शिकलं पाहिजे," असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.

औरंगाबादमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वडेट्टीवारांनी ओबीसींच्या सत्तेतील वाट्याबाबत उपस्थितांसमोर आपली मतं मांडली. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.

यावेळी वडेट्टीवारांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. वडेट्टीवार म्हणाले, "पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजेत."

"भावा-भावांमद्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूज आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारका आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या," असं वडेट्टीवार म्हणाले.

2) 2024 ला आम्ही एकाच इंजिनावर येणार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली असताना, देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम देत म्हटलं, "2024 ला आम्ही एकाच इंजिनावर येणार आहोत."

पुणे मेट्रो मार्गाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"ज्या प्रकारे मेट्रोला एकच इंजिन असते. मेट्रोला डबल इंजिनची आवश्यकता नाही, तसंच आम्ही 2024 च्या निवडणुकीत पण आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहोत," असं म्हणत फडणवीसांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

3) न्यायाधीशांच्या तक्रारींना पोलीस, CBI प्रतिसाद देत नाहीत - सरन्यायाधीश

न्यायाधीशांच्या सुरक्षेसंदर्भातील गोष्टींमध्ये न्यायव्यवस्थेला पोलीस, सीबीआयसारख्या यंत्रणा मदत करत नसल्याची खंत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली.

पोलीस आणि सीबीआय न्यायाधीशांच्या तक्रारींना प्रतिसाद देत नसल्याचं सरन्यायाधीश म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

झारखंडमधील धनबादचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सू मोटो दाखल केली आणि त्यावर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

यावेळी सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा म्हणाले, "अनेकदा न्यायाधीशांना मानसिकरित्या त्रास दिला जातो. व्हॉट्सअप, एसएमएसवरून धमक्या दिल्या जातात. सोशल मीडियावरून धमकावलं जातं. काहीवेळा सीबीआय चौकशीचे आदेश दिले जातात. मात्र, त्यांच्याकडून पुढे काहीच होत नाही."

सीबीआयच्या या वागणुकीत फरक पडायला हवा, अशी अपेक्षाही यावेळी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

4) राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट निलंबित?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट निलंबित केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरनं स्पष्टीकरण दिलंय की, राहुल गांधींचं अकाऊंट निलंबित करण्यात आलं नाही, अकाऊंट सेवेत आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

परवाच (6 ऑगस्ट) राहुल गांधींचं एक ट्वीट ट्विटरनं हटवलं होतं. राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या 9 वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्याचे फोटो या ट्वीटमध्ये होते. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणत ट्विटरनं राहुल गांधींचं हे ट्वीट हटवलं होतं.

राहुल गांधींचं अकाऊंट निलंबित झालं नसल्याचं ट्विटर म्हणत असलं तरी काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करून सांगितलंय की, "राहुल गांधी यांचं अकाऊंट निलंबित झालंय आणि ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होईपर्यंत राहुल गांधी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लोकांशी संपर्कात राहीतल, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

5) काँग्रेसच्या वर्धापन दिनी शिवाजी पार्कात राहुल गांधींची सभा होणार

काँग्रेसच्या वर्धापन दिनी (28 डिसेंबर) शिवाजी पार्कात राहुल गांधी यांची सभा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर ही सभा होणार आहे. त्यात काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलंय. त्यामुळे या सभेचं महत्त्वं वाढलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

राहुल गांधी यांच्या सभेची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी मुंबईत येणार असल्याची माहिती दिली होती.

शिवसेना आणि मनसेच्या सभांसाठी ओळखलं जाणारं शिवाजी पार्काचं मैदानातून काँग्रेस महापालिकेचं रणशिंग फुंकणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)