राज ठाकरे यांना युती हवी असल्यास भाजपाच्या तालावर ताल धरावा लागेल का?

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'कृष्णकुंज' या निवासस्थानी जाऊन 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या नव्या युतीच्या शक्यता पुन्हा एकदा बोलल्या जाऊ लागल्या आहेत.

"भाजपा आणि मनसे यांच्या युतीचा कोणताही प्रस्ताव सध्या आमच्यासमोर नाही," असं सांगून पाटील यांनी ही केवळ एकमेकांच्या भूमिका समजून घेण्यासाठी असलेली औपचारिक भेट होती असं म्हटलं.

पण भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांचा राज यांच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिका स्पष्ट करण्याबद्दलचा आग्रह भविष्यातला सूर स्पष्ट करणारा होता.

"राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय युतीची चर्चा शक्य नाही, असं आम्ही यापूर्वी अनेकदा म्हणालो आहे," असं पाटील यांनी सुरुवातीलाच म्हटलं आणि आजच्या भेटीतही याच विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं.

"परप्रांतियांबाबत कटुतेची वा द्वेषाची भूमिका नसेल तर ते जोरात सांगायला हवं," असा स्पष्ट सल्ला देताना भाजपानं "जर युती हवी आहे तर परप्रांतियांबाबतची, विशेषत: उत्तर भारतीयांबाबतची भूमिका बदला" असा संदेशच एका प्रकारे या 'अनौपचारिक' भेटीतून दिला आहे, असा आता प्रश्न आहे.

त्यामुळे अगोदरच 'हिंदुत्वाच्या' वाटेवर चालू लागलेले राज ठाकरे आता आता परप्रांतियांच्या मुद्द्यावरुनही भाजपाच्या तालावर ताल वा सुरात सूर मिसळणार का अशीही चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे चंद्रकांत पाटील भेट

फोटो स्रोत, Mns

गेल्या दोन वर्षांतली राज यांची आणि त्यांच्या पक्षाची भाजपाकडे वाढलेली जवळीक लपून राहिली नाही आहे. शिवसेनेला पर्याय म्हणून त्यांच्या मित्रत्वाची जागा भाजपा मनसेला देऊ शकतो ही शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात 'मनसे'च्या स्थापनेपासूनच बोलली गेलेली आहे.

पण गेल्या दोन वर्षांमध्ये, विशेषत: 'महाविकास आघाडी'च्या स्थापनेनंतर ही जवळीक अधिक वाढली. अगोदर राज यांनी आपल्या पक्षाचा झेंडा भगवा करुन आपल्या भूमिकेत हिंदुत्व आणलं. तेव्हापासून ते आक्रमकतेनं तो मुद्दा मांडत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेनेसारखीच मनसे-भाजपा युती होईल असं ते गणित आहे.

केवळ हिंदुत्व्व नव्हे तर परप्रांतियांचाही मुद्दा

पण भाजपाला या नव्या युतीसाठी केवळ हिंदुत्व हवं आहे असं दिसत नाही. त्यांना 'मनसे'च्या उत्तर भारतीयांच्याबद्दलच्या आक्रमक भूमिकेबद्दल आक्षेप आहे. तो वारंवार बोलून दाखवलाही गेला आहे. काहीच दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत बोलतांना मनसेनं परप्रांतियांबद्दलची भूमिका स्पष्ट केल्यावरच पुढची बोलणी होऊ शकतील अशा आशयाचं विधान केलं होतं.

प्रामुख्यानं मुंबईचा विचार करता, उत्तर भारतीय हा भाजपाचा मतदार आहे. गेल्या निवडणुकीतही त्यांनी भाजपाचा पारड्यात मोठं मत टाकलं होतं. त्यामुळे मनसेला जवळ घेऊन त्या मतांना धक्का लावणं भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. म्हणून भाजपा मनसेला त्यांची भूमिका बदलण्याचा दबाव वाढवतं आहे का असाही प्रश्न आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या मते राज यांनी स्वत:ची भूमिका त्यांना सांगितली आणि ती पाटील यांना पटलीही. पण ते जोरात सर्वांसमोर मांडायला पाहिजे असा सल्ला त्यांनी राज यांना दिला. आता जरी ही भूमिका समजून घेण्याची भेट असली, तरीही प्रदेशाध्यक्षांनी दिलेला हा अनौपचारिक सल्ला होता की सल्लावजा आदेश अशी चर्चा आता होते आहे.

राज ठाकरे चंद्रकांत पाटील भेट

फोटो स्रोत, Getty Images

"माझ्या मनातले मुद्दे मी उपस्थित केले. उदाहरणार्थ राज ठाकरे असं म्हणाले की उत्तर प्रदेशमधल्या माणसाला उत्तर प्रदेशमध्ये 80 टक्के नोकऱ्या मिळायला पाहिजेत. हे जसं माझं उत्तर प्रदेशमध्ये जाऊन म्हणणं असेल, तेच माझं म्हणणं महाराष्ट्रात असेल. मी त्यावर म्हणाला की हरकत नाही. पण जसं जम्मू काश्मीरमध्ये आजवर बाहेरच्या राज्यातल्या कोणाला नोकरी करणं, व्यवसाय करणं याला बंदी होती.

आता ३७० कलम हटल्यानंतर बाहेरच्या राज्यांतले कोणीही तिथं नोकरी वा व्यवसाय करु शकतात. मग मुंबईत का तसं नको? जम्मू काश्मीरमध्ये जसं स्थानिकांनी आग्रह धरला पाहिजे की स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या द्या, तसा तुम्ही इथं आग्रह धरणं बरोबर नाही. त्यामध्ये कटुता आहे. द्वेष आहे.

ते म्हणाले की तसं नाही आहे. मग जर तसं नसेल, तर तसं परसेप्शन जातं. तसा समज होतो. लोकांचा तो समज तुम्ही दूर केला पाहिजे. स्थानिकांना प्राधान्य द्या हे माझं मत आहे आणि तुम्ही इथं येऊन तुमच्या कर्तृत्वावर मोठं व्हायला माझी कुठं ना आहे, हे जर तुमचं म्हणणं असेल तर ते जरा जोरात म्हणायला पाहिजे, असं मी त्यांना म्हटलं," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'राज यांच्या मनात कटुता नाही, पण ते प्रत्यक्ष व्यवहारात यावं लागेल'

राज ठाकरेही त्यांची भूमिका ही द्वेषाची वा कटुतेची नाही हे भाजपाला पटवून देतांनाही पाहायला मिळताहेत. नाशिकमध्ये त्यांचं पाटील यांच्याशी बोलणं झाल्यावर 'मनसे'तर्फे काही काळापूर्वी उत्तर भारतीय संमेलनात राज यांनी केलेलं भाषण त्यांना पाठवण्यात आलं होतं.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

आजही राज यांनी त्यांनी भूमिका समजावून दिली आणि ती कटुतेची नाही असं सांगितलं, असं पाटील म्हणाले. "त्यांनी अशी भूमिका आम्हाला समजावली, पण ती व्यवहारात पण आणायला लागेल. ती व्यवहारात आणणं हे सोपं नाही आहे. मला आज हे पूर्ण पटलं की त्यांच्या मनात परप्रांतियांबद्दल काहीही कटुता नाही. पण महाराष्ट्रातल्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी ते जे आंदोलन करतात त्यातून असं प्रतीत होतं की त्यांच्या मनात परप्रांतियांबाबत कटुता आहे. पण ती नाहीये हे प्रत्यक्ष व्यवहारात यावं लागेल," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांनी व्यापक भूमिका घ्यायला हवी या सल्ल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे, "ते (राज ठाकरे) म्हणाले की ठीक आहे. कोविडमुळे गेल्या दीड वर्षांत माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात जरा प्रयत्न कमी झाले.

आता जरा कोविड कमी झाला आहे, तर मी जी हिंदुत्वाची लाईन पकडली होती ती मी अधिक आक्रमक करेन. पण माझं परप्रांतियांबाबत काही कटुता, द्वेष, घृणा असण्याचं काही कारण नाही."

त्यामुळे हे स्पष्ट आहे की राज यांनी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर भूमिका मवाळ करावी अशी भाजपाची स्पष्ट मागणी आहे. पण राज ती मान्य करणार का? भाजपाला अपेक्षित असलेला तालच ते मनसेला धरायला लावणार का? तेव्हाच भाजपा आणि मनसे राजकीय युती शक्य आहे का?

गरज मनसेची आणि भाजपाचीही

दुसऱ्या बाजूला 'मनसे'साठी ही स्थिती इकडे आड तिकडे विहिर अशी आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता आणि मनसेचा निवडणुकांमधला खेळ पाहता, त्यांना राजकीय युतीची गरज आहे असा एक मतप्रवाह पक्षात आहे. अगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. पण नंतर त्यांनी सत्तेसाठी शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर मनसेचा तो मार्ग अडला.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे भाजपा हा पर्याय मनसेपुढे आहे. पण त्यासाठी त्यांनी सांगितलेला ताल धरायचा असेल तर ज्या भूमिकेवरुन मनसेची सध्या आहे तेवढा विस्तार मुंबई आणि महाराष्ट्रात झाला, त्या परप्रांतियांचा मुद्द्यावरुन हटावे लागेल. तसं करावं लागलं तर जो पक्षासोबत राहिलेला मतदार आहे त्याबाबत मनसेला विचार करावा लागेल.

स्थानिक मराठी, रोजगार आणि परप्रांतियाचं स्थानिकांच्या संधीआड येणं हे मुद्दे जर सोडले तर त्याचा फायदा शिवसेनेला होईल का, असा पेचही मनसेसमोर असेल. त्यामुळे आता राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांनी दिलेला सल्ला कसा प्रत्यक्षात आणतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

अर्थात, मनसेचा गरजेसोबतच, या प्रश्नाची दुसरी बाजू ही भाजपाची गरज अशीही असू शकते. गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा वेळेस पश्चिम आणि पूर्व उपनगरातल्या बहुतांश बहुभाषिक मतदारांमुळे मतदान वाढलेल्या भाजपाला शिवसेनेला शह द्यायला मराठीवादी पक्षाचीही गरज आहे.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे, "भाजपाला गरज आहे ती मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर काम करण्याची. मराठीबाबतच्या जुन्या भूमिकांमुळे ते मराठीविरोधी आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे आणि सेना त्याचा कायम फायदा घेत आली आहे. आता जर मनसेसारखा एक मराठीवादी पक्ष त्यांच्याकडे आला तर ही जुनी प्रतिमा बदलण्यास भाजपाला फायदा होईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)