You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
No Kissing Zone : तुम्ही रस्त्यावर चुंबन घेऊ शकता का? कायदा काय सांगतो?
- Author, मयांक भागवत,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
मुंबईतील एका सोसायटीने, इमारतीसमोरच्या रस्त्यावर प्रेमी युगलांसाठी 'NO KISSING ZONE' अशी सूचना लिहिली.
मुला-मुलींकडून खुल्लेआम, सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांना कंटाळून, ही सूचना लिहील्याचं सोसायटीचे प्रशासनाचं म्हणणं आहे.
भारतात सार्वजनिक ठिकाणी मुला-मुलींनी 'Kiss' करणं, चुंबन घेणं, मिठी मारणं याकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतो.
पण, सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत चुंबन घेऊन प्रेम दर्शवणं, हा गुन्हा आहे? याबाबत कायदा काय सांगतो. हे आम्ही कायद्याच्या जाणकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
IPC- भारतीय दंड संहिता काय सांगते?
सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं, कायद्याने गुन्हा आहे का? हे आम्ही बॉम्बे हायकोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील स्वप्ना कोदे यांना विचारलं.
त्या सांगतात, "कोणत्याही अश्लील कृतींमुळे इतरांना त्रास होत असेल. तर, भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे. यामध्ये तीन महिन्यांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात."
यासाठी पहिल्यांदा भारतीय दंड संहितेचं (IPC) कलम 294, जे अश्लील कृतीबाबत आहे. याची माहिती करून घेणं गरजेचं आहे.
माजी न्यायमुर्ती एम. आर. मलिक यांनी लिहीलेल्या क्रिमिनिल मॅन्यूअल, या पुस्तकात IPC च्या सेक्शन 294 बद्दल माहिती देण्यात आलीये.
भारतीय दंड संहितेच्या कलम 294 प्रमाणे,
- जो कोणी इतरांना त्रास होईल अशा प्रकारे, सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अश्लील कृती करेल
- कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास अश्लील गाणे म्हणेल किंवा शब्दांचा उच्चार करेल
- याला तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील
- हा गुन्हा दखलपात्र, जामीन मिळणारा आणि मॅजिस्ट्रेट कोर्टात चालणारा असेल
पण, माहितीमध्ये दिलेल्या कॉमेंट्समध्ये न्यायमूर्ती मलिक, या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, ते सांगतात.
ते लिहितात, कलम 294 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला दोन गोष्टी सिद्ध करणं गरजेचं आहे,
- गुन्हेगाराने अश्लील कृत्य सार्वजनिक ठिकाणी केलं पाहिजे. अश्लील गाणं किंवा शब्द सार्वजनिक ठिकाणच्या जवळ उच्चारले असले पाहिजेत
- यामुळे इतरांना त्रास झाला पाहिजे
यासाठी माजी न्यायमूर्ती मलिक यांनी काही खटल्यांची उदाहरणं दिली आहेत.
जर कृत्य अश्लील नसेल, किंवा सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेलं नसेल, किंवा अश्लील गाणं, शब्द सार्वजनिक ठिकाणी उच्चारले नसतील. ज्यामुळे इतरांना त्रास झाला नसेल. तर, गुन्हा होत नाही. यासाठी ते पवन कुमार विरुद्ध हरियाणा सरकारच्या याचिकेचा दाखला देतात.
तर, मध्यप्रदेश सरकार विरुद्ध राम औतार खटल्याचा दाखला देत, सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याजवळ अश्लील शब्द उच्चारले तर गुन्हेगार 294 कलमांतर्गत दोषी ठरतो, असं त्यांनी लिहिलं आहे.
मग सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं गुन्हा आहे? हे पहाण्यासाठी आम्ही वकील प. रा. चांदे यांनी 2015 साली लिहिलेलं 'प्रमुख फौजदारी कायदे' हे पुस्तक पाहिलं.
यात प. रा. चांदे यांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 294 बाबत माहिती देताना काही टीपा लिहिल्या आहेत. यातील एका टीपमध्ये अश्लील कृती म्हणजे काय? याबाबत माहिती देण्यात आलीये.
वकील प.रा.चांदे आपल्या पुस्तकात लिहितात,
- अश्लील कृती यात- स्वत:चा देह उघडा टाकणे, अश्लील वागणूक- जसे संभोग, चुंबन घेणे वैगेरे कृती येतात
- सार्वजनिक जागा म्हणजे, बाग, सिनेमा थिएटर, सरकारी कार्यालय, फिरण्याच्या जागा
- हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, प्रथमवर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा- बिगर समजुतीचा आहे
- मानसिक त्रास-क्लेश (annoyance) दाखवणे जरूरीचं आहे
वकील प.रा.चांदे आपल्या पुस्तकात काही खटल्यांची उदाहरणं देतात.
एकाने दोन सभ्य तरुणींना पूर्वीची ओळख नसताना अनैतिक लैंगिक संबंध सूचित केले, शब्द वापरले आणि रिक्षात त्याच्याबरोबर चला असं सुचवलं, तर, हा अपराध घडला आहे. यासाठी ते इफार अहमद खटल्याचा दाखला देतात.
चुंबन किंवा किस याला अश्लील म्हणता येईल?
भारतीय दंड संहितेचं कलम 294 अश्लील कृत्यांबद्दल आहे. पण, यात चुंबन किंवा सार्वजनिक ठिकाणी किस घेणं अश्लील आहे का नाही? याबद्दल स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.
मग, कायद्यात अश्लील कृत्य म्हणजे काय? याची व्याख्या देण्यात आलीये? हे आम्ही जाणकार वकिलांकडून जाणून घेतलं.
वकील स्वप्ना कोदे सांगतात, "कायद्यात अश्लील कृत्य म्हणजे काय? याची स्पष्ट व्याख्या सांगण्यात आलेली नाही."
अश्लीलतेची व्याख्या स्पष्ट नसल्याने प्रेमी युगलांना पोलीस, समाज आणि कोर्टाकडून वारंवार त्रास दिला जातो, असं स्वप्ना म्हणतात.
आभा सिंह बॉम्बे हायकोर्टात वकील आहेत. त्या म्हणतात, "चुंबन घेणं किंवा किस करणं हे अश्लील कृत्य नाही. याला अश्लील नक्कीच म्हणता येणार नाही."
21 व्या शतकात जग बदलतंय. सार्वजनिकरीत्या प्रेम दर्शवणं हे अगदी सहज किंवा कॉमन झालंय असं म्हणायला हरकत नाही, त्या पुढे सांगतात.
चुंबन हे अश्लील कृत्य आहे? यावर बोलताना वरिष्ठ वकील अमित कारखानीस म्हणाले, "किस करणं हा गुन्हा नाही. अश्लील किंवा वल्गर कृत्य करणं गुन्हा आहे. किसिंग नक्कीच वल्गर कृत्य नाही."
कायद्यात अश्लील म्हणजे काय, याची ठोस व्याख्या सांगण्यात आलेला नाही, असं अमित कारखानीस पुढे म्हणाले.
कायद्याचे जाणकार सांगतात, किसिंगला अश्लील म्हणणं म्हणजे, चुकीचा अर्थ लावण्यासारखं आहे.
पण, काही मुलं-मुली रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फक्त किस पुरतं मर्यादीत राहात नसतील तर? जाणकार सांगतात, रस्त्यावर संभोग करत असतील तर याला अश्लील कृत्य म्हणावं लागेल.
ऑक्सफर्ड डिक्श्नरीत अश्लीलतेची व्याख्या काय?
ऑक्सफर्ड डिक्श्नरीमध्ये OBSCENE किंवा अश्लील याचा अर्थ, आक्षेपार्ह (offensive) किंवा तिरस्करणीय (disgusting) लैंगिक कृत्य (sexual matters) असा देण्यात आला आहे.
मुंबई पोलीस कोणत्या कायद्यांतर्गत करवाई करतात?
मुंबईतील चौपाट्या, सी-फेस, बागा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यांविरोधात अनेकवेळा पोलिसांकडून कारवाई केली जाते.
मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, "एखाद्या व्यक्तीने अश्लील कृत्य होत असल्याची तक्रार दिली पोलीस कारवाई करतात."
काहीवेळा या मुला-मुलींना समज देऊन सोडलं जातं. तर, काहीवेळा यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्याचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.
बॉम्बे हायकोर्टाच्या वकील आभा सिंह म्हणतात, "बॉम्बे पोलीस अॅक्टच्या कलमांतर्गत ही कारवाई केली जाते. सी-फेस, प्रोमनाडवर बसलेल्या किंवा किस करणाऱ्यांवर कारवाई केली जाते."
यासाठी आम्ही बॉम्बे पोलीस अॅक्ट तपासून पाहिला. सरकारच्या वेबसाईटवर हा कायदा आम्हाला मिळाला.
बॉम्बे पोलीस अॅक्टचं कलम 110 सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या गैरवर्तनाबद्दल आहे.
"कोणताही व्यक्ती जाणून-बूजून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा नजरेत येईल अशा ठिकाणी असभ्य वर्तन करणार नाही."
किसिंग प्रकरणी गुन्हे दाखल आहेत का?
वकील स्वप्ना कोदे सार्वजनिक ठिकाणी किस केल्यानंतर दाखल गुन्हाचं उदाहरण देतात.
"साल 2007 मध्ये एका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्याने, भारतातील फेमस बॉलीवूड अभिनेत्रीचा सार्वजनिक कार्यक्रमात किस घेतला होता. कोर्टाने या अभिनेत्यांविरोधात वॉरंट जारी केला होता."
भारतात मॉरल पोलिसांगच्या नावाखाली पार्क, सी-फेस आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
स्वप्ना कोदे पुढे म्हणतात, "2018 मध्ये कोलकात्यात मेट्रो स्टेशनवर एक कपल किस करत होतं. काही लोकांनी या जोडप्याला मारहाण केली. त्यानंतर, मोठ्या संख्येने युवा या जोडप्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते."
या घटनेच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात छापून आल्या आहेत.
गेल्यावर्षी अभिनेता मिलिंद सोमणने गोव्यातील एका बीजवर नग्नावस्थेत धावताना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. गोवा पोलिसांनी मिलिंद सोमणवर कलम 294, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
कायदे बदलण्याची वेळ आलीये?
वकील आभा सिंह पुढे म्हणतात, "हे कायदे खूप जुने आहेत. याला बदलण्याची आता वेळ आली आहे. समाजाने आता या गोष्टींना मान्य करायला हवं."
देशातील सर्वच मोठ्या महानगरात मुलं-मुली सार्वजनिकरीत्या एकमेकांना मिठी मारून किंवा किस करून आपलं प्रेम दर्शवताना पहायला मिळतात.
अमिक कारखानीस यांच्या मते, एखादं कृत्य अश्लील आहे का नाही. हे पोलीस ठरवतात. समाजाला हे ठरवण्याचा काहीच अधिकार नाही.
केरळातील 'Kiss for Love' कॅम्पेन
केरळमध्ये 2014 मध्ये किस फॉर लव्ह मोहीम सुरू करण्यात आली होती. प्रेमी युगलांविरोधात मॉरल पोलिसिंग करणाऱ्या काही संघटनांच्या कारवाईच्या विरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)