You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा भाऊ साठे: 'माझी मैना गावावर राहिली' या गीताची जादू अजूनही का कायम आहे?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंची अजरामर कलाकृती 'फकिरा'चं पहिलं पान उघडलं की दिसतं, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण.'
डॉ. आंबेडकरांच्या लिखाणाचं वर्णन अनेक अभ्यासकांनी आणि लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे पण अण्णा भाऊंनी त्यांच्या लेखणीसाठी झुंजार हा शब्द वापरला. हे वर्णन अगदीच चपखल आणि मनाला भावणारं वाटतं.
दोन शब्दांतच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याची ताकद अण्णा भाऊ साठे यांच्या शब्दांत आहे. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. 'माझी मैना गावावर राहिली' हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा उत्कर्षबिंदूच वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे गीत अतिशय गाजलं होतं. हे गीत लोकांच्या केवळ ओठांवरच नव्हतं तर हृदयावर कोरल्या गेलं होतं. साठ वर्षानंतरही माझी मैना तितकंच टवटवीत वाटतं.
शाहीर विठ्ठल उमप किंवा आनंद शिंदे यांच्या आवाजात सध्या युट्युबवर असलेलं हे गीत ऐकलं तर अंगावर काटा येतो.
आज अण्णा भाऊ साठेंची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचं 'माझी मैना' समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून मला ज्या गोष्टी समजल्या त्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
माझी मैना ही एक 'छक्कड' आहे. छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे. फडात जी लावणी सादर केली जाते तिला छक्कड म्हणतात अशी नोंद मराठी विश्वकोशात आहे.
माझी मैना ही मराठीतली पहिली राजकीय छक्कड असल्याचं अभ्यासक सांगतात. माझी मैना समजून घेण्यापूर्वी आपण अण्णाभाऊंच्या जीवनपटावर एक नजर टाकू.
अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920चा. त्यांची आई त्यांनी म्हटली होती की 'या दिवशी टिळक बाबाचं मरण झालं तेच दिसाला तू जलमलास'.
'सांगलीहून मुंबई पायी प्रवास'
अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचा. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गावानं अण्णा भाऊंचं भावविश्व समृद्ध केलं. त्यांच्या साहित्यात देखील या भागातली वर्णनं आढळतात.
पण गरिबीमुळे त्यांना आपलं गाव सोडावं लागलं. वाटेगावहून ते मुंबईला पायी आले.
तिथे मिळेल ते काम केलं. कधी हेल्पर म्हणून तर कधी बूटपॉलिशवाला, तर कधी सिनेमा थिएटरमध्ये द्वारपाल अशी विविध कामं करता करता ते नायगाव मिल, कोहिनूर मिल या ठिकाणी कामगार म्हणून लागले. याच ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला.
कामगार चळवळीतल्या वातावरणात त्यांची कला बहरली. ते एक लेखक आणि शाहीर बनले. अमर शेख आणि द. ना. गवाणकर यांच्याबरोबर त्यांनी 'लाल बावटा' कलापथक स्थापन केलं.
या पथकाच्या माध्यमातून ते राज्यभर दौरे करत आणि कामगारांना आपल्या हक्कांबाबत जागृत करत.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
अण्णाभाऊ साठें यांनी कला आणि साहित्य या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले योगदान दिले.
ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते म्हणून पक्षाने ठरवून दिलेली कामं तर ते करायचेच पण ते एक लेखक आणि कलाकार होते. नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून तसेच त्या सादर करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.
1946 मध्ये शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे पुढारी होते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे हे नेते त्यात होतेच पण कलाकार देखील या लढ्यात सामील झाले होते.
पुढाऱ्यांच्या भाषणाआधी अमर शेख आणि अण्णाभाऊ पोवाडे, गीत सादर करून जनमानसांत स्फुल्लिंग चेतवत असत. त्यामुळे या लढ्याला आणखी धार चढली.
या काळात माझी मुंबई, लोकमंत्र्याचा दौरा, शेटजींचे इलेक्शन, अकलेची गोष्ट या कलाकृती त्यांनी सादर करून लोकांची मनं जिंकली.
'माझी मैनाचा राजकीय संदर्भ'
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही.
बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही सल अण्णाभाऊंना लागली. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच 'माझी मैना' या छक्कडचा जन्म झाला.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी 'माझी मैना गावावर राहिली' या नावाने पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला आणि अण्णाभाऊंच्या माझी मैना विषयी अधिक जाणून घेतलं.
उत्तम कांबळे सांगतात, "माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे. अण्णाभाऊंच्या छकडीतील मैना नितांत सुंदर आहे.
"तसाच हा बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग देखील सुंदर आहे. हा भाग आपल्याला मिळाला नाही. इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे असं अण्णाभाऊ सुचवतात. दोन जिवांची ताटातूट झाल्यावर काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडीमध्ये आपल्याला दिसतं."
उत्तम कांबळे पुढे सांगतात, "केवळ ते त्यावरच थांबत नाही तत्कालीन मुंबईचं वर्णन त्यात येतं. कामगारांचं जीवन कसं, गरिबी कशी आहे याची झलक देखील आपल्याला त्यातून पाहायला मिळते. हे सर्व सांगत असतानाच ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल बोलताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्त सांडलं आहे त्यांचा ते गौरव करताना दिसतात.
"इतकंच नाही तर जे संयुक्त महाराष्ट्रविरोधी नेते आहेत त्यांना देखील हा मराठी समाज अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा ते देतात. यासाठी त्यांनी रामायणाचे संदर्भ वापरले आहेत.
"रावणाचं देखील गर्वहरण झालं होतं तशीच तुमची अवस्था होईल असं ते सुचवतात. यातून आपल्याला त्यांच्या राजकीय जाणिवा किती प्रगल्भ होत्या याची कल्पना येऊ शकते," असं कांबळे सांगतात.
माझी मैना अजूनही प्रासंगिक आहे का?
माझी मैना अजूनही प्रासंगिक आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना उत्तम कांबळे सांगतात. "अर्थातच, माझी मैना आजही प्रासंगिक आहे इतकंच नाही तर ती ताजी आणि टवटवीत आहे."
"ज्या व्यक्तीला ही छक्कड कळते त्या व्यक्तीला तर असंच वाटू शकतं ही छक्कड कालपरवाच लिहिली आहे. कारण अद्यापही बेळगाव आणि कारवार हे भाग संयुक्त महाराष्ट्रात आले नाहीत."
"मराठी माणसाला दरवेळी वाटत राहतं निदान यावेळी तरी राघू आणि मैनाची भेट होईल पण तसं होताना दिसत नाही. पण छक्कडमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीची आशा जिवंत राहते.
"वरवर ही कलाकृती एक प्रेमगीत वाटते पण त्यातला अर्थ आणि संदर्भ पाहिला तर ती राजकीय छक्कड ठरते," असं कांबळे यांना वाटतं.
ते पुढे सांगतात, "तत्कालीन राजकारण, समाजकारण, दंतकथा, कृषिजीवन, अलंकार, संस्कृती या साऱ्यांचं प्रतिबिंब या छक्कडमध्ये उमटते म्हणूनच ती सदाहरित आणि कालातीत बनली आहे."
'अण्णा भाऊंच्या साहित्याची अवीट गोडी'
अण्णा भाऊ साठेंनी विपुल लिखाण केलं आहे. कथा, कविता, गीतं, लावण्या, कादंबऱ्या, वग, नाट्य, वृत्तांकन, लेख, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
त्यांच्या साहित्यात अवीट गोडी गोडी आहे आणि वास्तववादी जगात या गोष्टी घडत असल्या तरी त्या काही कमी चमत्कृतीपूर्ण नाहीत. त्यांच्या या अवीटतेचं रहस्य वि. स. खांडेकर यांनी फकिरासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितलं आहे.
ते म्हणतात, "समाजाच्या तळाच्या थरातील माणसं, घटना आणि जीवन हे सारं अण्णा भाऊंनी अनुभवलं आहे, पचविलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आरामखुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात. तसं अण्णा भाऊंचं नाही. या थरांतच त्यांचा जन्म झाला.
"टीपकागद जसा झटकन ओली अक्षरं टिपतो, त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातली दलितांच्या आयुष्यातली आसवं अण्णा भाऊंच्या कलांवत मनाने टिपून घेतली आहेत. नुसती आसवंच नाहीत तर त्यांच्या आकांक्षा. त्यांचे राग-लोभ सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे. या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत," असं खांडेकर लिहितात.
(संदर्भ - अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख यांची शाहिरी, एक आकलन - डॉ. बाबुराव अंभोरे, माझी मैना गावावर राहिली - उत्तम कांबळे, लोकवाङमय गृह प्रकाशन, फकिरा- अण्णा भाऊ साठे)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)