कोरोना : मुंबई अजून 'अनलॉक' का करण्यात आली नाही?

मुंबई महानगरपालिका

फोटो स्रोत, SOPA Images/getty images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही तुलनेने कमी झाली आहे. मुंबईत सध्या 10 हजारांच्या आसपास इतके कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. रूग्णांची संख्या कमी झाली तरी निर्बंध कशासाठी? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

जून महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्याचबरोबर 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चे रूग्ण वाढत गेले.

तिसर्‍या लाटेची भीती आणि 'डेल्टा प्लस' च्या वाढत्या रूग्णांमुळे पाच टप्प्यातली शिथिलता थांबवून सर्व जिल्हे तिसर्‍या टप्यात आणले गेले.

सर्व दुकानं, बाजारपेठा, रेस्टॉरंट या 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. मॉल्स बंद करण्यात आले.

हे निर्बंध घालून आता एक महिना होऊन गेला. पण निर्बंध कायम आहेत.

मुंबईची परिस्थिती आटोक्यात?

मुंबई महापालिका क्षेत्रात 10,925 इतके कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईत रूग्ण दुपटीचा कालावधी 928 दिवसांवर गेला आहे. सरासरी रूग्णवाढ ही 0. 07 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. अनेक दिवसांपासून मृत्यूदरही 1 टक्यांपेक्षा कमी राहिला आहे. मुंबईत लसीकरणासाठी पात्र असलेल्या 90 लाख लाभार्थ्यांपैकी 48 लाख जणांनी लशीचा पहीला डोस घेतला आहे. तर 13 लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात दैनंदिन रूग्णांपैकी ठाण्यात 96, नवी मुंबईत 97, कल्याण डोंबिवलीमध्ये 127 अशी रूग्णसंख्या आहे.

त्यामुळे परिस्थिती सुधारत असताना व्यापारी, दुकानदार आणि सामान्य माणसांकडूनही निर्बंध शिथिल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/getty

किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा सांगतात, "सध्या दुकानं सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू आहेत. याऐवजी दुकानांना सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यासंदर्भात सरकारने विचार करावा.

"दुकानं, रेस्टॉरंट, व्यापारी यांच्या कर्मचार्‍यांचं 50% लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता सरकारने कालमर्यादा वाढवावी ही आमची मागणी आहे. "

'लोकल प्रवासाला मुभा द्या'

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकल ट्रेनचा प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला. पहिली लाट ओसरल्यावर मर्यादित स्वरूपात प्रवासाला परवानगी देण्यात आली. पण दुसर्‍या लाटेत पुन्हा लोकल ट्रेनचा प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी बंद करण्यात आला.

बसेसमध्ये 100% क्षमतेनुसार प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. इतर वाहतूकही सुरळीत सुरू आहे. मग फक्त लोकल ट्रेनमधूनच कोरोना पसरतो का? असा सवाल प्रवासी संघटना विचारत आहेत.

मुंबई लोकल

फोटो स्रोत, Getty Images

मध्य रेल्वे प्रवासी संघटनेने सदस्य मधु कोटीयान म्हणतात, "लोकलमध्ये गर्दी होते मान्य आहे. पण प्रवासासाठी परवानगीच द्यायची नाही, हा कुठला मार्ग आहे? ज्या लोकांचे लशीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्या, अशी आमची मागणी आहे.

या अटीनुसार दररोज 3-4 लाख लोक प्रवास करू शकतील. मुंबईत फक्त ठाणे किंवा अंधेरीतून लोक येत नाहीत, तर कर्जत, कसारा, वसई, विरार इथून लोक दररोज बसने कसा प्रवास करणार? पण सरकारच्या निर्बंधांमुळे लोक हा खडतर प्रवास करतही आहेत. पण लोकल प्रवासाबाबत सरकारने व्यवहारीक मार्ग शोधलाच पाहीजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते पुढे सांगतात.

दरम्यान, लोकल प्रवासाबाबत लोकांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठक घेतली.

'मुंबई बाहेरून येणाऱ्या 40 लाख प्रवाशांमुळे कोरोना वाढण्याची धास्ती आहे. त्यामुळे लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेताना एमएमआर परिसराचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा' असं मत मुंबई महापालिका अधिकार्‍यांनी या बैठकीत मांडलं आहे.

टास्क फोर्सचा ग्रीन सिग्नल?

सध्याची परिस्थिती पाहता मुंबई अनलॉक करता येऊ शकेल का? याबाबत टास्क फोर्सने काही मर्यादा घालून अनलॉक करता येऊ शकेल, असं मत व्यक्त केल्याची माहिती आहे.

पण जास्तीत जास्त लसीकरण हाच अनलॉक करण्यासाठीचा महत्वाचा उपाय असल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"कुठलीही गोष्ट पूर्णपणे सुरू करायची असेल 70 टक्के लसीकरण होणं गरजेचं आहे. तर त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. लोकल प्रवासासाठीही हाच नियम लागू शकतो," असं टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सुरू असलेल्या बैठकांमधून मिळालेल्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने आस्थापना, दुकानांच्या वेळा, रेस्टॉरंटस् याबाबत शिथिलता देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

सकाळी 7 ते 4 ऐवजी रात्री 10 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवता येऊ शकतात का? यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे? याबाबत तज्ञांची मतं जाणून घेतली जात आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगतात, "शिथिलतेसंदर्भात विचारविनिमय सुरू असला तरी अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील."

त्यामुळे मुख्यमंत्री आता काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)