अनिल देशमुख यांचे जावई, वकील CBI च्या ताब्यात

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पण दोघांनाही ताब्यात घेताना CBI ने त्याचं कारण अथवा कोणतीच माहिती त्यांना दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

"अनिल देशमुख यांचे मुलगी, जावई आणि वकील हे वरळी येथील निवासस्थानातून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली," असं मलिक यांनी सांगितलं.

"देशमुख यांचे जावई आणि वकील यांना 10 ते 12 जणांनी ताब्यात घेतलं आणि घेऊन गेले. पण यावेळी कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. एकंदरीत ही सगळी कारवाई बेकायदेशीर आहे. कोणत्याही नियम अथवा प्रक्रियेला धरून ही कारवाई नाही," असं मलिक म्हणाले.

"याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. देशात कायद्याचं राज्य आहे की या राज्यकर्त्यांचा नवा कायदा देशात लागू झाला आहे, याचा खुलासा CBI ने करावा," असा आरोप मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांची मुलगी वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर टाच

काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांची 4.20 कोटी रूपयांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचलनालयाने टाच आणली होती.

ईडीने शुक्रवारी (16 जुलै) याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं.

ईडीने दिलेल्या माहितीप्रमाणे, टाच आणण्यात आलेली संपत्ती मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील, उरणमधील आहे.

ही संपत्ती अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमिअर पोर्ट लिंक प्रायव्हेट लिमिडेट यांच्या नावावर होती.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टच्या (PMLA) अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे.

टाच आणलेली संपत्ती

  • मुंबईतील वरळीमध्ये असलेला 1.54 कोटी रूपयांचा प्लॅट
  • उरणमधील जमिनीचे 25 तुकडे

मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयने दाखल गुन्हानंतर ईडीने तपास सुरू केला आहे.

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन समन्स पाठवले पण, अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.

ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.

ईडीचा आरोप आहे की, अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, सचिन वाझेंमार्फत, बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये जमा केले.

त्यानंतर, दिल्लीतील काही कंपन्यांच्या मदतीने 4.18 कोटी रूपये, त्यांच्या ट्रस्टमध्ये आणून पैशांची हेरफेर केली.

ईडीच्या माहितीनुसार, चौकशीत पुढे आलंय की मुंबईचे वरळीतील घर अनिल देशमुख यांच्या पत्नीच्या नावावर आहे. यासाठी 2004 मध्ये कॅश देण्यात आली होती. पण, करार अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना 2020 मध्ये करण्यात आली.

त्याचसोबत, प्रिमिअर पोर्ट लिंक कंपनीमध्ये अनिल देशमुख यांच्या कुटुंबाची 50 टक्के भागीदारी असल्याचं पुढे आलंय.

ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केलीये. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं आहेत.

ईडीने दोन दिवसांपूर्वी तळोजा जेलमध्ये सचिन वाझे यांचा या प्रकऱणी जबाब नोंदवून घेतला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)