You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः भारतात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ? आयएमएने व्यक्त केली भीती
भारतात प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ असल्याची धोक्याची सूचना तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच आययएमएने दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटनाच्या काही लोकप्रिय स्थळांवर लोकांची झुंबड उडाल्याचे फोटो आणि व्हीडिओ प्रसिद्ध होत आहेत. तसेच या फोटो-व्हीडिओंमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोक मास्क वापरत नसल्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत नसल्याचे दिसते.
भारतामध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या 40 हजारावर आली आहे. मे महिन्यात ही संख्या कोरोना सर्वोच्चबिंदूला असताना दररोज 4 लाख रुग्ण इतकी असे.
ही संख्या घसरल्यामुळे विविध राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत.
मात्र ही संख्या घसरली असली तरी फक्त 6 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण आणि 22 टक्के लोकांना लशीचा एकच डोस मिळाला असल्याने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने सोमवारी स्पष्ट केले, "लोकांनी आणि सरकारने आत्मसंतुष्ट होऊन कोव्हिड नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात एकत्र यायला सुरूवात केली आहे हे अत्यंत वेदनादायी आहे."
आयएमए पुढे म्हणते, "पर्यटनाला चालना, धार्मिक पर्यटन, धार्मिक उत्साह हे सगळं आवश्यक असलं तरी काही महिने थांबता आलं असतं."
अशा ठिकाणी लसीकरण न झालेल्या लोकांना एकत्र येणं हे तिसऱ्या लाटेचे सुपरस्प्रेडर्स ठरू शकतं अशी भीतीही आयएमएने व्यक्त केली आहे.
दुसऱ्या लाटेचं भयावह चित्र भारतानं अनुभवलं आहे. यावेळेस रुग्णालयं कोव्हिड रुग्णांनी ओसंडून वाहात होती तर स्मशानांमध्येही रांगा लागल्या होत्या. ती लाट थोडी कमी झाल्यावर अनेक राज्यांनी पर्यटकांसाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी निर्बंध शिथिल केले आहेत.
पण अशा एकत्र येण्याचे वाईट परिणाम होऊ शकतात असं तज्ज्ञांना वाटतं.
एप्रिल महिन्यात हरिद्वार कुंभमेळ्यात लाखो लोक एकत्र आले होते. तिथून परतलेल्या अनेक लोकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.
आता उत्तर प्रदेश राज्य 25 जुलै रोजी वार्षिक कावड यात्रेची तयारी करत आहे.
भारतामध्ये तिसरी लाट टाळण्यासाठी नियम कडकपणे लागू करण्याची आणि लसीकरण मोहीम गतीमान करण्याची गरज तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.
भारतात सध्या दररोज 40 लाख लोकांचं लसीकरण होत आहे. पण ते प्रमाण 80 ते 90 लाखांवर जाण्याची गरज आहे.
तरच हे वर्ष संपेपर्यंत 18 वर्षांवरील सर्व लोकांचं लसीकरण करण्याचे ध्येय पूर्ण होऊ शकतं. अनेक राज्यांमध्ये आजही लशींचा तुटवडा जाणवत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)