Sex Education : 'भारतीय लोक सेक्सविषयी बोलत नाहीत, म्हणून मी त्यांना त्यासाठी मदत करते'

पल्लवी बर्नवाल

फोटो स्रोत, PALLAVI BARNWAL

    • Author, शब्दांकन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी मेघा मोहन

'अनेक भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जात नाही, त्यामुळे पालकांनाच त्यांच्या मुलांशी लैंगिकतेविषयी आणि नातेसंबंधांविषयी बोलावं लागतं. पण अनेकदा या विषयावर काय बोलायचं याबाबत पालकांमध्ये संभ्रम असतो,' असं 'सेक्स कोच' पल्लवी बर्नवाल सांगतात.

मागे वळून पाहताना विचार केला तर मला असं वाटतं की, माझ्यावर रूढीवादी भारतीय संस्कार झाले त्यामुळेच पुढे मला सेक्स कोच होण्यासाठी काहीप्रमाणात पाठबळ मिळालं.

हे अर्थातच मला त्या वेळी जाणवलं नव्हतं. पण माझ्या पालकांचे नातेसंबंधच माझ्यावर सुरुवातीच्या काळात परिणाम करणारे ठरले.

माझ्या आईवडिलांच्या वैवाहिक नात्याविषयी अनेक वर्षं चर्चा सुरु होत्या. मी जवळपास आठ वर्षांची होते तेव्हा मला त्यांच्या संबंधांविषयी प्रश्न पडायला लागले. पार्ट्या वगैरे व्हायच्या, तेव्हा मी माझ्या आईवडिलांपासून दूर असेन तर सगळ्या आत्या-मावश्यांचा गोतावळा माझ्या भोवती जमून चौकश्या करायचा.

"तुझे आईबाबा एकाच खोलीत झोपतात का?"

"त्यांच्यात काही भांडण होताना ऐकलंयस का?"

"कोणी पुरुष तुमच्या घरी येतो का?"

मी स्वयंपाकघरातल्या टेबलापाशी आइसक्रीमचा बाउल घेऊन उभी असायचे किंवा खेळायला कोणी मुलं आहेत का ते बघत गार्डनमध्ये भटकत असायचे, तेव्हा अचानक या अनोळखी बायका उत्साहाने मला घेरायच्या आणि असल्या प्रश्नांचा भडीमार करायच्या- मला अर्थातच या प्रश्नांची उत्तरं माहीत नव्हती.

अनेक वर्षांनी माझा स्वतःचा घटस्फोट झाल्यावर माझ्या आईने मला यामागची सगळी कहाणी ऐकवली.

माझ्या आईवडिलांचं लग्न झाल्यानंतर, माझ्या भावाचा नि माझा जन्म होण्यापूर्वीच्या काळात माझ्या आईला एका माणसाविषयी खूप तीव्र आकर्षण वाटत होतं. या आकर्षणाचं रूपांतर शारीरिक संबंधांमध्ये झालं. काही आठवड्यांमध्ये तिच्या मनात अपराधी भावना निर्माण झाली आणि तिने हे संबंध थांबवले. पण भारतीय समाजामध्ये भिंतींनाही कान व डोळे असतात. हळूहळू या संबंधांविषयीच्या अफवा माझ्या वडिलांपर्यंत पोचल्या.

पल्लवी बर्नवाल

फोटो स्रोत, Pallavi Barnwal

अखेरीस दोन मुलं झाल्यावर, लग्नाला दहा वर्षं झाल्यानंतर वडिलांनी माझ्या आईला याबद्दल विचारलं.

या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी त्याचा वैवाहिक नात्यावर परिणाम होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण अनेक वर्षं कुजबुज ऐकून झाल्यावर आता त्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं. आईने त्यांना सगळं सांगितलं. तिचे हे संबंध सेक्सपेक्षाही जवळीकीच्या उद्देशाने आलेले होते, असं ती म्हणाली. त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू होण्यापूर्वी ही गोष्ट घडून गेली होती.

आईचं बोलणं थांबलं तेव्हा खोलीतलं वातावरण स्तब्ध झाल्याचं तिला जाणवलं. माझे वडील तत्काळ तिथून निघून गेले. इतकी वर्षं त्यांना वाटणारी शंका खरी असल्याचं आईच्या बोलण्यानंतर स्पष्ट झालं आणि त्या क्षणी दोघांच्या नात्यातला विश्वास पूर्णतः संपुष्टात आला. लवकरच त्यांचं नातंही रोडावत गेलं.

सेक्स आणि भावनिक जवळीकीविषयी योग्यरित्या बोलता न आल्यामुळे आपली कुटुंबं कशी मोडून पडतात, हे मला या वेळी स्पष्टपणे जाणवलं.

आम्ही बिहारमध्ये राहत होतो. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या प्रदेशांपैकी हा एक भाग आहे. इथल्या मैदानी प्रदेशातून गंगा नदी वाहत जाते. माझं बालपण पारंपरिक विचारणी असणाऱ्या वातावरणात गेलं. बहुसंख्य कुटुंबांप्रमाणे आमच्याही घरात सेक्सविषयी मोकळेपणाने बोललं जात नव्हतं. माझे आईवडील एकमेकांचा हात हातात घेत नसत किंवा एकमेकांना मिठीही मारत नसत. आमच्या समाजातल्या इतर कोणत्याच जोडप्यामध्ये शारीरिक जवळीक उघडपणे दिसायची नाही.

मी 14 वर्षांची होते तेव्हा मला लैंगिक संबंधांशी संबंधित पहिली झलक मिळाली.

एकदा दुपारी कंटाळलेली असताना मी माझ्या वडिलांच्या कपाटातली पुस्तकं चाळत होते. तिथे कादंबऱ्या नि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एक छोटीशी पुस्तिका चेपल्यासारखी ठेवलेली होती. त्यात स्त्री-पुरुषांच्या शारारिक संबंधांचं गोपनीय विश्व धुंडाळणाऱ्या अनेक तपशीलवार लघुकथा होत्या. हे अर्थातच काही खास साहित्यिक स्वरूपाचं लेखन नव्हतं, त्यात बराचसा खट्याळपणा होता. एका लघुकथेत एक तरुण मुलगी कुतूहलापोटी भिंतीत भोक पाडते आणि पलीकडचं पलंगात एकमेकांजवळ आलेलं जोडपं बघतते. त्यात चुंबन हा शब्द मी पहिल्यांदा वाचला आणि त्याचा अर्थही मला शोधावा लागला होता.

मला अनेक प्रश्न पडलेले होते, पण त्याबद्दल बोलायला कोणीच नव्हतं.

माझं नि माझ्या मैत्रिणींचं कधीच याबद्दल काही बोलणं व्हायचं नाही.

मी त्या पुस्तकात अगदी गढून गेले. नंतर माझी आई दुसऱ्या खोलीतून हाका मारत होती, तेव्हा माझी तंद्री भंग पावली.

90चं दशक संपत आलेलं होतं. मी काही चुकीचं केलेलं नाहीये हेसुद्धा मला तेव्हा कळलं नाही. जगभरातील अनेक मुलं या वयात शारीरिक जवळिकीविषयी शिकायला लागलेली असतात, बहुतेकदा शाळेत त्यांना याबद्दल माहिती दिली जाते, हेही मला माहीत नव्हतं.

भारतामध्ये सेक्स हा शालेय अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग नाही किंबहुना, भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने 2018 साली पहिल्यांदा शाळेतील लैंगिक शिक्षणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली. एकोणतीस राज्यांपैकी अर्ध्याहून अधिक राज्यांनी या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला.

'टाईम्स ऑफ इंडिया'मधील वृत्तानुसार, ग्रामीण भारतातील अर्ध्याहून अधिक मुलींना मासिक पाळीविषयी किंवा ही पाळी का येते याविषयी काहीही माहिती नसते.

ती पुस्तिका सापडल्यामुळे काही मला मोकळं वाटलं नाही. उलट, मी त्या पुस्तिकेतला तपशील माझ्या मनात गाडून टाकला आणि भारतातील अनेक मुलींप्रमाणे मी रूढीवादी जगत राहिले. पंचविसाव्या वर्षी मी पहिल्यांदा शरीरसंबंधांचा अनुभव घेतला, पण दोन वर्षांनी माझं ठरवून लग्न झालं तोवरही मला याबद्दल फारसा काही अनुभव नव्हतं.

पल्लवी बर्नवाल
फोटो कॅप्शन, TED Talk मध्ये बोलताना पल्लवी

लग्नानंतरची पहिली रात्र म्हणजे सगळा विचकाच होता. माझ्या नवऱ्याच्या आईवडिलांचं ते घर होतं, तिथल्या बेडरूममध्ये पलंगावर फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. ते सगळं मला विनोदी वाटायला लागलं. भिंतींपलीकडून डझनभर लोक इकडेतिकडे जात-येत असल्याचे आवाज येत होते. आमच्या लग्नासाठी खास बाहेरून ही पाहुणेमंडळी आलेली होती. इतर ठिकाणी झोपायला जागा नसल्यामुळे आमच्याच खोलीच्या बाहेर दारात त्यांनी तळ ठोकला होता.

मी व्हर्जिन आहे, असं माझ्या त्या वेळच्या नवऱ्याला मी सांगावं, असं आईने मला बजावलेलं होतं. त्यामुळे मी लाजल्यासारखं दाखवलं आणि आता काय करावं याबद्दल गोंधळलेलीच राहिले. आम्ही धड एकमेकांशी बोललोही नव्हतो आणि आता अचानक बेडरुममध्ये एकमेकांसमोर होतो. आता मी पत्नी म्हणून माझी कर्तव्यं पार पाडावीत, अशी अपेक्षा होती.

मी व्हर्जिन नव्हते, पण मी शरीरसंबंधांसाठी तयारही नव्हते. लग्नानंतर पहिल्या रात्री काय करायचं, असं विचारणारे कित्येक डझन मेसेज मला दर महिन्याला येतात. यात फक्त शारीरिक पातळीवर काय करायचं, अशी विचारणा केलेली नसते, तर कसं वागावं, खूप लाजल्यासारखंही दाखवायचं नाही आणि खूप अनुभवी असल्यासारखंही दाखवायचं नाही, हे कसं साधायचं, असे प्रश्न लोक विचारतात.

मी आणि माझा नवरा पाच वर्षं सोबत होतो. आपण चुकीच्या व्यक्तीशी लग्न केल्याचं मला सुरुवातीलाच लक्षात आलं. त्यामुळे त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणं मला भयंकर वाटायचं. आम्ही काही वेळा आणि तारखा निश्चित केल्या होत्या. शेवटी माझ्या एका सहकाऱ्याशी शारीरिक जवळीक साधल्याची कल्पना माझ्या मनात यायला लागली आणि तेव्हा मला नवऱ्याशी असलेले माझे संबंध पूर्णच कोलमडल्याचं लक्षात आलं. मी त्यावर काही कृती केली नाही, पण मला आमचे संबंध टिकवायचेही नव्हते. शेवटी आमचा घटस्फोट झाला.

32 वर्षांची असताना आम्ही वेगळे झालो. मी आता एकल माता (सिंगल मदर) होते आणि अचानक माझ्यावर कोणताच दबाव उरला नाही. मी घटस्फोटित महिला होते आणि समाजाच्या नजरेतून उतरलेली होते.

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या शहरात माझे अनेकांशी लैंगिक संबंध आले, पण त्यांना काही भविष्य नव्हतं. मी प्रयोग केले, वृद्ध पुरुषांसोबत, विवाहित पुरुषांसोबतही झोपले. मी अधिक मोकळी झाले आणि माझ्या संभाषणांचं स्वरूप बदलायला लागलं. माझे विवाहित मित्रमैत्रिणी माझ्याकडे सल्ला मागायला यायचे. माझ्या स्वातंत्र्यापासून स्फूर्ती घेऊन माझी आई दिल्लीला माझ्यासोबत व माझ्या मुलासोबत राहायला आली. सुरुवातीपासनच तिच्यात बंडखोरीची प्रेरणा होती.

माझ्या अवतीभवती सेक्सविषयी आणि महिलांच्या हक्कांविषयी अनेक स्त्रीवादी चर्चा होत होत्या. दिल्लीत 2012 साली एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

पण या सर्व चर्चांमध्ये सेक्स / लैंगिक संबंध ही काहीतरी हिंसक कृती असल्यासारखं आणि त्यात काही आनंद नसल्यासारखं बोललं जात होतं, याची मला चिंता वाटत होती. किंबहुना अनेकदा भारतीय महिला शारीरिक जवळीक सुखाची मानत नाहीत. या विषयावर इतकं मौन बाळगलं जातं आणि लाजेचं वातावरण असतं की तरुणींना काही वेळा स्वतःवर झालेला अत्याचारही ओळखू येत नाही.

महिलांविरोधातील गुन्हे

  • 2019 साली भारतात रोज सरासरी 87 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आणि मुलांविरोधातील लैंगिक अत्याचाराच्या शंभरहून अधिक घटना दररोज नोंदवल्या जात होत्या.
  • 2019 साली महिलांविरोधातील एकूण गुन्ह्यांची 4,05,861 प्रकरणं नोंदवली गेली.
  • लोकसंख्येच्या दरडोई लैंगिक गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली, तर भारताचं स्थान जगात सर्वांत वाईट प्रदेशांमध्ये मोडतं, असं 2020 सालातील 'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू' या अहवालातून समोर आलं.

मी ग्राहक विक्रीच्या क्षेत्रात काम करत होते, पण हळूहळू मी माझ्या करिअरची वाट बदलली.

आपल्याविषयी कोणतेही समज केले नाहीत, जिथे सेक्सविषयी मोकळेपणाने बोलता येईल, प्रश्न विचारता येतील असं हक्काचं ठिकाण आपण निर्माण करू शकतो, हे माझ्या लक्षात आलं.

मग मी सेक्स आणि न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग कोच होण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं आणि एक इन्स्टाग्राम पेज सुरू केलं. तिथे लोकांनी मला कोणतेही प्रश्न विचारावेत, असं मी आवाहन केलं. संभाषणाला प्रोत्साहन मिळावं, यासाठी मी स्वतःच्या लैंगिक अनुभवांचे तपशील तिथे नोंदवत होते.

याचा सकारात्मक परिणाम झाला. लैंगिक कल्पनारम्यता, मासिक पाळीला कलंक मानण्याची पद्धत, लैंगिक संबंधांचा अभाव असलेलं वैवाहिक नातं आणि अत्याचार इत्यादींसह अनेक विषयांवर लोक माझ्याकडे सल्ला मागू लागले. अनेक जण स्वतः पालक होते.

मग दोन वर्षांनी मला 'TED Talk' साठी बोलावण्यात आलं. पालकांनी त्यांच्या मुलांशी सेक्सविषयी व संमतीविषयी बोलणं का गरजेचं आहे, याबद्दल मला बोलायचं होतं.

केवळ पाश्चात्त्य धाटणीची जीवनशैली स्वीकारलेल्या भारतीय महिलाच लैंगिक संबंध ठेवतात असं नाही, हे दाखवून देण्यासाठी मी साडी नेसून स्टेजवर गेले. जगामध्ये भारतीय लोक सर्वाधिक पोर्नोग्राफी बघतात, अशी पॉर्नहब या वेबसाइटने 2019 साली प्रसिद्ध केलेली आकडेवारी मी उपस्थितांना सांगितली. विशेष म्हणजे देशात अनेक पॉर्न वेबसाइटींवर बंदी असूनसुद्धा ही स्थिती आहे. आपण लैंगिक संबंध गोपनीय मानत राहिलो, पण त्याने कोणाचंच हित साधत नाही.

पल्लवी बर्नवाल

फोटो स्रोत, Pallavi Barnwal

या भाषणानंतर दररोज माझ्याकडे तीसहून अधिक प्रश्न आणि प्रशिक्षणासाठीच्या विनंत्या यायला लागल्या.

सेक्स टॉयचा वापर कसा करायचं असं विचारणी एखादी स्त्री असेल किंवा कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर आता पुन्हा हस्तमैथुन सुरु केलं तर सुरक्षित राहील का असं विचारणारा पुरुष असो (माझं यावरचं उत्तर होतं: कोव्हिड झालेला असताना हस्तमैथुन केल्याने शारीरिक थकवा जाणवू शकतो, पण बरं झाल्यावर पुन्हा पूर्ववत वागणं पूर्णतः रास्त आहे), अशा विविध प्रकारच्या व्यक्ती संपर्क साधू लागल्या.

लैंगिंक संबंधांविषयी मोकळेपणाने बोलण्याची संस्कृती नसल्याने त्यातून आपल्या आयुष्यातले अनेक वेदना देणारे क्षण निर्माण होत असल्याचं मला यातून लक्षात आलं. अनेकदा यात सेक्सचा मुद्दाही नसतो. मानवी जीवनाच्या एका अतिशय नैसर्गिक बाजूबद्दल एकमेकांशी संवाद साधू न शकल्यामुळे माझ्या आईवडिलांच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा आला. माझ्या स्वतःच्या वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक संबंधांचा अभाव होता, त्याचं एक कारण आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो हेसुद्धा होतं.

माझा मुलगा आता आठ वर्षांचा आहे. काही वर्षांमध्येच त्यालाही या विषयाबद्दल कुतूहल वाटू लागेल, हे मला माहीत आहे. मी त्याला अंगावर पाजायचं थांबवलं तेव्हा हेसुद्धा सांगितलं होतं की, आता त्याने स्त्रियांच्या शरीराच्या काही भागांना हात लावणं अपेक्षित नाही. तेव्हा तो खूपच लहान होता, तरीही त्याला ते कळलं. तो लैंगिकदृष्ट्या सक्रिय होईल, तेव्हा त्याला या संदर्भात पुरेशी माहिती असेल आणि तो सुरक्षितपणे या गोष्टी हाताळेल, असं वातावरण मी निर्माण केलेलं असेल, अशी मला आशा आहे. माझ्याविषयी त्याने काही विपरित मूल्यनिवाडा केलेला नसेल, याबद्दल मला खात्री वाटते.

पल्लवी बर्नवाल यांच्या पालकांसाठी काही सूचना

तुमच्या मुलांनी सेक्सविषयी जाणून घेणं का गरजेचं आहे, हे समजून घ्या

मुलांशी लैंगिक संबंधांविषयी व लैंगिकतेविषयी बोलल्याने पुढील आयुष्यातील अनेक समस्यांपासून त्यांचं संरक्षण होईल. आत्मविश्वासाचा अभाव, शारीरिक प्रतिमेविषयीची चिंताग्रस्तता, लैंगिक अत्याचार, रोगट नातेसंबंध आणि लैंगिक उपभोक्तावाद अशा काही दीर्घकालीन समस्या अनेक प्रौढ तरुण-तरुणींना भेडसावत असतात.

त्यांना स्वतःच्या अनुभवांविषयी सांगा

आपल्या आईवडिलांच्या कहाण्या मुलांना जास्त जवळच्या वाटतात. तुम्ही मोठे होत असताना गोष्टी कशा होत्या, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. तुमच्याही काही चुका झालेल्या आहेत, तुम्ही एक खराखुरा माणूस आहात, असं कळून घेणं त्यांना हवंसं वाटतं. तुम्ही त्यांच्या वयाचे असताना तुम्हाला सेक्ससंदर्भात कोणती आव्हानं, कोणते संभ्रम आणि कोणत्या गैरसमजुतींना सामोरं जावं लागलं, याबद्दल तुम्ही बोललात, तर स्वतःच्या मुलांशी तुमचा संवाद अधिक दृढ होईल.

लैंगिक शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

तुमची मतंही सांगा

तुमच्या लैंगिक मूल्यांविषयी मुलांशी बोला. नग्नता, पौगंडावयीन नातेसंबंध, एलजीबीटी, समलिंग विवाह, गर्भपात, गर्भनिरोध, विवाहबाह्य लैंगिक संबंध, सुदृढ नातेसंबंध, कुठवर थांबणं महत्त्वाचं असतं, याबद्दलच्या तुमच्या धारणा काय आहेत, ते मुलांना सांगा. यातून तुम्ही मुलांवर मूल्यचौकट लादण्याऐवजी तिचा आराखडा त्यांच्या समोर मांडत जाता.

त्यांना खऱ्या गोष्टी सांगा

विविध वयोगटातील मुलामुलींना काय जाणून घेणं गरजेचं वाटतं, याबद्दलची तथ्यं समजून घ्या. मुलंमुली १० ते १४ वर्षं वयोगटातील असतात, तोवर त्यांना पुढील माहिती असणं गरजेचं आहे-

1. लैंगिकतेसंबंधीच्या तुमच्या अपेक्षा व मूल्यं

2. पुरुषांच्या व स्त्रियांच्या लैंगिक अवयवांची अचूक नावं आणि कार्यं

3. लैंगिक संभोग म्हणजे काय आणि स्त्री गरोदर कशी राहते

4. वयात येताना कोणते शारीरिक व भावनिक बदल होतात

5. ऋतुचक्राचं स्वरूप व कार्य

6. LGBT संबंध, लिंगभाव, हस्तमैथुन, गर्भपात

7. गर्भनियंत्रण म्हणजे काय

8. लैंगिकदृष्ट्या संक्रमित होणारे आजार कोणते आणि त्यांचा प्रसार कसा होतो

9. लैंगिक अत्याचार म्हणजे काय, असा अत्याचार कसा टाळायचा आणि अत्याचार झाला तर काय करायचं

10. ही सर्व माहिती विशिष्ट वयानुसार द्यावी लागते, त्यामुळे ती कधी द्यावी आणि किती प्रमाणात द्यावी हे तुम्ही ठरवायला हवं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)