कोरोनाः सेक्स आणि मौजमजेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गावात कसा झाला कोरोनाचा उद्रेक?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ख्रिस बॉकमॅन
- Role, फ्रान्स
फ्रान्समधील केप डी-आगदे युरोपातल्या निसर्गप्रेमी आणि हजारो स्विंगर्सचं (सेक्शुअल पार्टनर्सची अदलाबदल करणारे) उन्हाळी सुट्या घालवण्याचं पारंपरिक ठिकाण. मात्र, कोरोना विषाणूच्या उद्रेकाने इथल्या पर्यटनावर परिणाम झाला आहे.
फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तिथे एकाच दिवसात तब्बल 7000 जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेषतः फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या हेरॉल्ट आणि केप दी'आगदे शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
युरोपातल्या निसर्ग पर्यटनासाठीचे सर्वात मोठे रिसॉर्ट्स इथे आहेत. विलासवादावर त्यांचा मुख्य भर असतो. सेक्स, चंगळ, मौज-मजा यासाठी हे रिसॉर्ट प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या या मोठमोठ्या रिसोर्टबाहेर आरोग्य प्रशासनाने मोबाईल टेस्टिंग ऑपरेशन युनिट्स उभारले आहेत.
या मोबाईल टेस्टिंग युनिट्सद्वारे कोरोना चाचणी करण्यात आलेल्या 800 पर्यटकांपैकी तब्बल 30% जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

'आम्ही इथे का आहोत, हे आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे'
इथल्याच मुख्य शहरापासून जरा दूर 'village naturiste' नावाचं एका मोठं रिसॉर्ट आहे. खरंतर एक गावच. या गावात डझनभर स्विंगर्स क्लब, सॉना आणि इरॉटिक नाईटक्लब्ज आहेत. जोडप्यांना त्यांचे खाजगी क्षण घालवण्यासाठीची ही गुप्त ठिकाणंच आहेत. बरेचदा हे सगळं खुलेआम सुरू असतं.
अर्थातच सर्वच निसर्गप्रेमी स्विंगर्स नसतात. निवांत क्षण घालवण्यासाठी बरेचजण इथे येत असतात.
एका स्विंगर कपलने बीबीसीला सांगितलं, "इथे दिवसभर सगळेच एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि अर्थातच विवस्त्र असतात."
"आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे की आम्ही इथे का आलोय. याच समुद्रकिनाऱ्यावर इतरही अनेक पारंपरिक फॅमिली कॅम्प्स आहेत जिथे सेक्स क्लब्ज नाहीत."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

उन्हाळ्यात इथे दररोज जवळपास 45 हजार पर्यटक असतात. यातले बहुतांश पर्यटक आठवडाभरासाठी येतात. बेबीलोन, क्युपिड, एडेन अशा नावांनी जागा भाड्याने घेऊन राहतात. तर काही जण फक्त विकेंड्सना येतात. एक दिवस चैनीत घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
मात्र, ही परिस्थिती कोव्हिडच्या आधीची आहे.
कोरोनाचा उद्रेक कसा झाला?
ऑगस्ट महिना संपत असताना 'Village naturiste'मधले दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते.
इथल्या एका हॉटेलच्या गच्चीवर पार्टी आयोजित केल्याचं, हॉटेल मालकानेच मान्य केलं आहे. त्या पार्टीत कुणीही सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
'Village naturiste'चे मॅनेजर डेव्हिड मॅसेल्ला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला दुहेरी फटका बसला. आमच्याकडे येणारे 40% पर्यटक परदेशी आहेत. त्यातले बहुतांश नेदरलँड आणि जर्मनीमधून येतात. त्यानंतर काहीजण इटली आणि ब्रिटनमधूनही येतात."

"विषाणू संसर्गामुळे यातले बहुतांश पर्यटक यावर्षी फिरकलेच नाहीत. दुसरं म्हणजे आमच्याच रिसॉर्टमध्ये कोरोनाग्रस्त आढळले. मात्र, ते टाळता आलं नसतंच."
"तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या या गावात दहा हजार कॅम्पसाईट पिचेस आहे. 15 हजार बेड्स आहेत. जवळच्याच मॉन्टपिलिअर शहरापेक्षा या गावाची लोकसंख्या जास्त आहे."
स्थानिक प्रशासनाचा प्रतिसाद
केप डी-आगदेमध्ये जवळपासच्या परिसरापेक्षा चारपट जास्त केसेस असल्याचं फ्रान्सच्या आरोग्य प्रशासनाचं म्हणणं आहे.
मात्र, यापैकी कुणालाही हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्याची गरज भासली नसल्याचं इथल्या स्टाफचं म्हणणं आहे.
इतर जगाप्रमाणेच केप डी-आगदेमध्ये प्रत्येक शहरात आणि गावात चेहऱ्यावर मास्क बांधणं बंधनकारक आहे. मात्र, स्विंगिंगसाठी 'Village naturiste'मध्ये येणारे स्वाभाविकच मास्क वापरत नाहीत. स्विंगींगमध्ये मास्क वापरणार तरी कसा?
मी संध्याकाळी दोन जोडप्यांना भेटलो. ते इथेच राहतात.
वयाच्या चाळीशीत असणारं यातलं एक जोडपं काही वर्षांपूर्वी फ्रान्समधल्याच बॉर्डोक्स शहरातल्या एका स्विंगर्स क्लबमध्ये एकमेकांना भेटले. त्यानंतर ते दोघंही एकत्रच या गावात आले.

नदेज सांगतात, "हे गाव एका रात्रीतून मॅजिक लोकेशनवरून ट्रॅजिक लोकशन बनलं. आम्ही सर्वच जोखीम पत्करत असलो तरीसुद्धा लॉकडाऊन खूप कठोर होता आणि दिर्घकाळही होता. त्यामुळे आमच्याच भल्यासाठी आम्हाला बाहेर पडणं भाग होतं."
'रिस्क घेणाऱ्यांमध्ये तरुण अधिक'
अॅलेन आणि त्यांच्या पत्नी माझ्यासमोर बसले होते. दोघंही विवस्त्र होते. पण चेहऱ्यावर एक पारदर्शी शिल्ड घातली होती.
दोघांनीही वयाची साठी पार केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही एका गावाला दोष देणं चुकीचं आहे.
"आमच्या वयात निश्चितच आम्ही कुठे जातोय, कुणाच्या संपर्कात येतोय, याची आम्ही दक्षता घेतोच. तरुणच अधिक रिस्क घेत आहेत. पण हे काही इथेच घडतंय असं नाही. देशात सगळीकडेच जिथे-जिथे तरुण एकत्र आले तिथे संसर्ग पसरला आहे."
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं लक्षात येताच इथले अनेक क्लब आणि बार जिथे शारीरिक संपर्क अधिक यायचे तातडीने बंद करण्यात आले.
विकी बीच रिसॉर्टही बंद करण्यात आलं. या रिसॉर्टचे संचालक करीम इसारतेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला माझ्या 22 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागलं. हा सिजन तर संपला. पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या पूल पार्टी ही आमची ओळख आहे. मात्र, अशा पार्टी आम्ही यापुढे करू शकणार नसल्याचं प्रशासनाने सांगितलं."

ले ग्लॅमोर नाईटक्लबसुद्धा पर्यटकांमध्ये बरंच लोकप्रिय आहे. 'नेक्ड फोम पार्टी'साठीचं हे खास ठिकाण. एका पार्टीत जवळपास हजार लोक एकत्र यायचे. मात्र, मार्चमध्येच या पार्ट्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या पार्ट्या बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. इतका की आगदेमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावून सांगावं लागलं की सर्वांना जरा धीर धरा, ले ग्लॅमोर नाईटक्लब लवकरच सुरू होईल.
'मौज-मजा करण्याचा कुणाचाच मूड नाही'
फिलीप बॅरे गेल्या 30 वर्षांपासून कपड्यांचं दुकानं चालवतात. त्यांचे जवळपास 120 आउटलेट्स आहेत. त्यांचीही पार निराशा झाली आहे.
बीबीसीशी बोलताना फिलीप म्हणाले, "स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी आम्ही अत्यंत महत्त्वाचे आहोत. आमच्याकडे काम करणाऱ्या 800 पैकी 300 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागलं आहे. व्यवसायात मला 80% नुकसान झालं आहे आणि असा मी एकटा नाही."
"आजमितीला इथे फक्त 5000 लोक आहेत. एरवी या सिझनमध्ये किमान 25 हजार पर्यटक असतात. पण यावर्षी मौज-मजा करण्याचा कुणाचाच मूड नाही."
फिलीप सांगत असले तरी मी ज्या स्विंगर्सना भेटलो त्यांनी सांगितलं की कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी स्विंगर्स अॅक्टिव्हिटी पूर्णपणे थांबलेली नाही. उलट या परिस्थितीत सगळेच अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बीचवर गेल्यावर याचा प्रत्ययही येतो. कमरेभोवती चेन घातलेल्या स्त्रिया तर संपूर्ण शरीर शेव्ह केलेले पुरूष बीचवर फिरताना दिसतात.

यातले बरेचजण वयाची पन्नाशी, साठी उलटलेले आहेत. मात्र, तरीही आकर्षक दिसण्याची हौस तिळमात्र कमी झालेली नाही. काही तरुणही आहेत.
संध्याकाळी बरेचजण कपडे घालून अर्थातच सेक्सी आउटफिटमध्ये बीचवरच्याच ओपन-एअर बारमध्ये दिसतात. सगळा मामला 'एका कटाक्षा'साठी असतो आणि काही क्षणातच त्यातलेच अनेक जण जोडप्यांनी टेबलावर गप्पा मारताना दिसतात. काही आपल्या पार्टनरसोबत आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये परततात. तर काही बीचवरच्या वाळूमध्ये बसून एकांताचे क्षण घालवतात.

पूर्वीपेक्षा गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र, तरीही काही पर्यटक आहेत. सुट्टीसाठी डी-आगदेला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाने काही काळ तरी वाट बघण्याचं आवाहन केलं आहे.
तर जे लोक घरी परतण्याच्या विचारात आहेत त्यांनी कोव्हिड टेस्ट करूनच परतावं, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








