You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिक्षण सेवक भरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदिल, 6,100 पदे भरणार
राज्य शासनाने राज्यातील शिक्षण सेवक भरतीला परवानगी दिली आहे.
त्यामुळे राज्यतील सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे आता भरणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
शिक्षण सेवक भरती प्रक्रिया 'पवित्र प्रणाली'च्या माध्यमातून राबवली जाणार असून ती अतिशय पारदर्शक असेल, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
गायकवाड यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसंच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (D.L.Ed) शिक्षकांच्या रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.
यामध्ये सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसंच पदावर उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी 'अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी' (TAIT) परीक्षेत गुण आणि मुलाखत यांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.
डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षण सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.
कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असा आदेश वित्त विभागाने दिला होता. त्यामुळे ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती.
परंतु, शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मंत्री गायकवाड यांनी शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यातून वगळण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. त्याला परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील SEBC आरक्षण नुकतंच रद्द केलं आहे. त्या अनुषंगाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवक पदांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)