हुंडाबंदी कायद्यानंतरही भारतात 95% लग्नांमध्ये हुंडा घेतला जातो, जागतिक बँकेचा धक्कादायक अहवाल

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जागतिक बँकेच्या एका अभ्यासात दिसून आलंय की लग्नात मुलीच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत भारतात अजूनही कायम आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये या रूढीला छेद गेलेला नाही.

अभ्यासकांनी 1960 ते 2008 या काळात भारतातल्या 40 हजार लग्नांचा आढावा घेतला. अभ्यासात त्यांना आढळून आलं की, 95 टक्के लग्नांमध्ये मुलीच्या घरच्यांनी या ना त्या प्रकारे हुंडा दिला होता, भले मग हुंडा देणं-घेणं 1961 पासून कायद्याने गुन्हा असलं तरी.

हुंडापद्धत भारतातली एक जाचक आणि महिलांसाठी अन्यायकारक पद्धत आहे. अनेकदा या हुंड्यापायी महिलांचा छळ होतो तर काही जणींचा हुंड्यापायी मृत्यूही झालेला आहे.

मुलीच्या घरच्यांनी मुलाकडच्यांना हुंडा देणं ही दक्षिण आशियायी देशांमधली शतकानुशतकं चालत आलेली पद्धत आहे. लग्नाच्या वेळी मुलीकडचे मुलाकडच्यांना रोख रक्कम, कपडे, दागिने अशा गोष्टी देतात.

भारतातल्या 17 राज्यांमधल्या हुंड्यांच्या आकडेवारीवर हा अभ्यास बेतलेला आहे. या 17 राज्यांमध्ये देशातली 96 टक्के जनता राहाते. या अभ्यासाचं केंद्र ग्रामीण भाग होता कारण आजही भारतातले बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहातात.

अभ्यासकांनी 'निव्वळ हुंडा' म्हणून मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना दिलेल्या भेटवस्तू आणि मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांना दिलेल्या भेटवस्तू यातल्या रकमेचा फरक काढला. फारच कमी लग्नांमध्ये मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांना जास्त रकमेच्या भेटवस्तू दिल्या होत्या.

1975च्या आधी आणि 2000 नंतरच्या महागाईचा अपवाद वगळता 1960 ते 2008 या काळात सरासरी निव्वळ हुंडा तेवढाच राहिलेला आहे.

मुलीकडचे करतात सातपट अधिक खर्च

अभ्यासकांना आढळून आलं की, मुलाकडचे लोक मुलीकडच्यांसाठी सरासरी 5000 रूपये खर्च करतात तर मुलीकडचे लोक मुलाकडच्यांच्या भेटवस्तूंसाठी 32 हजार रूपये खर्च करतात. म्हणजे मुलीकडचे लोक सातपट जास्त खर्च करतात.

मुलीच्या घरच्यांची बचत अनेकदा हुंड्यापायी खर्च होते. घरातल्या कमाईचा बराचसा हिस्सा हुंड्यात जातो. 2007 मध्ये ग्रामीण भागातला सरासरी निव्वळ हुंडा वार्षिक घरगुती कमाईच्या 14 टक्के इतका होता.

"ग्रामीण भागातली वार्षिक घरगुती कमाई आता वाढलीये त्यामुळे कमाईच्या हिश्याचा टक्का कमी झालाय," जागतिक बँकेच्या अभ्यास गटातल्या अर्थतज्ज्ञ डॉ. आकृती म्हणाल्या.

"पण हा एक सरासरी दावा आहे. हुंडा कोणत्याही घरगुती उत्पन्नाच्या किती टक्के आहे, किंवा प्रत्येक घरात त्यापायी किती खर्च होतो हे कळण्यासाठी आपल्या तितक्या घरगुती उत्पन्नाची आणि खर्चाची आकडेवारी लागेल. दुर्दैवाने असा डेटा उपलब्ध नाही," त्या म्हणाल्या.

2008 पासून भारतात बरंच काही बदललं आहे. पण अभ्यासकांच्या मते हुंडा देण्याघेण्याचे कल फारसे बदलेले नाहीत. कारण लग्नपद्धतीत मोठे बदल झालेले नाहीत.

या अभ्यासात हेही लक्षात आलं की भारतातल्या सगळ्याच धर्मांमध्ये हुंडापद्धत आहे. लक्षणीय बाब अशी की, ख्रिश्चन आणि शिखधर्मियांमध्ये हुंडा देण्याघेण्याच्या प्रमाणात 'प्रचंड वाढ' झालेली आहे. मुस्लीम आणि हिंदूधर्मियांपेक्षा या धर्मात सरासरी हुंडा जास्त आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुंड्याच्या प्रमाणात राज्यानुसार फरक पडतो. उदाहरणार्थ- केरळ राज्यात 1970 पासून हुंड्याचं प्रमाण सतत वाढत आहे. केरळमध्ये गेल्या काही वर्षांत भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक सरासरी हुंडा घेतला जातो असं या अभ्यासात आढळून आलं.

पंजाब, हरियाणा आणि गुजरातसारख्या राज्यात हुंडा घेण्याचं प्रमाण वाढतंय. तर महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडून सरासरी हुंड्याचं प्रमाण घटलंय.

"असा फरक का आहे याबद्दल निश्चित अशी उत्तरं आमच्याकडे नाहीत. पण भविष्यात अभ्यास करून आम्ही याची उत्तर शोधू शकू अशी आशा आहे."

जानेवारी 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात अर्थतज्ज्ञ गौरव चिपळूणकर आणि जेफ्री विव्हर यांनी गेल्या 100 वर्षांतल्या 74 हजार लग्नांचा अभ्यास करून काळानुरूप हुंडापद्धतीत काय बदल झाला हे स्पष्ट करून सांगितलं.

अभ्यासकांना आढळलं की, हुंडा दिला-घेतला जाणाऱ्या लग्नांचं प्रमाण 1930 ते 1975 या काळात दुप्पट झालं आहे आणि सरासरी हुंड्याची रक्कम तिपटीने वाढलीये. पण 1975 नंतर सरासरी हुंड्यात घट झाली आहे.

त्यांच्यामते 1950 ते 1999 या काळात भारतात दिल्या गेलेल्या हुंड्याची रक्कम 2.5 खर्व (25 वर 10 शून्य) डॉलर्स इतकी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)