न पादणारा, ढेकर न देणारा, 'वर पाहिजे'; लग्नासाठीची ही जाहिरात का चर्चेत आहे?

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतातील स्त्रीवादी विचार असलेले लोक, शक्यतो जीवनाचा साथीदार शोधण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विवाह विषयक जाहिरातींची मदत घेत नाहीत.

वृत्तपत्रांमधील अशा प्रकारच्या बहुतांश जाहिराती या धर्म, जात यावर आधारित असतात. त्याचबरोबर या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार असे शारीरिक गुणधर्म यांची माहिती असते. तर अनेक जाहिरातींमध्ये सहा आकडी पगार, कुटुंबाची संपत्ती, मालमत्ता यांचाही उल्लेख असतो.

त्यामुळंच, गेल्या आठवड्यामध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रातल्या एक जाहिरात चांगलीच व्हायरल झाली. एका मुलीसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीत मुलीचा उल्लेख ठाम स्त्रीवादी, छोटे केस असलेली आणि पियर्सिंग केलेली असा करण्यात आला होता.

तर मुलगा कसा हवा यासाठी आणखीच गमतीशीर वर्णन होतं. हँडसम, श्रीमंत आणि त्याचबरोबर ढेकर न देणारा आणि फार्टिंग न करणारा असं यात म्हटलं होतं. यातही तो स्त्रीवादी मताचा असावा ही अट मात्र कायम होती. त्यामुळं ही जाहिरात व्हायरल झाली.

कॉमेडियन आदिती मित्तल हिनं ट्विटरवर, ही जाहिरात कुणी माझ्यासाठी तर दिली नाही ना अशी विचारणा केली.

प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढासह अनेकांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे:

ही जाहिरात खरी आहे का? आणि ही जाहिरात नेमकी कोणी दिली याबाबत अनेकांनी विविध प्रकारचे अंदाज लावले.

त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणीची तिचा भाऊ आणि तिची जवळची मैत्रीण यांनी केलेली ही गंमत होती. जाहिरातीत दिलेल्या इमेलच्या माध्यमातून बीबीसीनं जिच्यासाठी जाहिरात होती ती स्त्रीवादी तरुणी म्हणजे साक्षी, तिचा भाऊ सृजन आणि साक्षीची मैत्रीण दमयंती यांच्याशी संपर्क साधला. दमयंती हिचीच ही कल्पना होती.

वरील सर्व नावे ही बदललेली आहेत, कारण या सर्वांना त्यांची ओळख जाहीर करायची इच्छा नाही. आम्ही सर्व करिअरमध्ये चांगल्या वळणावर आहोत. आमचं भविष्यही चांगलं असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं सोशल मीडियाचं ट्रोलिंग आम्हाला ओढवून घ्यायचं नाही, असं साक्षी म्हणाली.

ही जाहिरात म्हणजे, साक्षीच्या 30 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही तिची केलेली छोटीशी गंमत होती, असं सृजननं सांगितलं.

वयाची 30 वर्ष होणं हा जीवनातला मोठा टप्पा असतो. कारण समाजात लगेचच तुमच्या लग्नाच्या चर्चा सुरू होतात. तुम्ही 30 वर्षाचे होताच, कुटुंब आणि समाजाकडून तुमच्यावर लग्नासाठी दबाव निर्माण होण्यास सुरुवात होते, अस मत सृजननं मांडलं.

साक्षीनं सांगितलं की, तिचे केस छोटे आहेत आणि तिनं पियर्सिंगही केलं आहे. ती सोशल सेक्टरमध्ये काम करते आणि स्वतंत्र विचारांची अशी मुलगी आहे. तसंच ढेकर किंवा फार्टिंग हा त्यांच्या कुटुंबातील जोकचा भाग आहे.

ही जाहिरात उत्तर भारतातील जवळपास 10-12 शहरांमध्ये देण्यात आली होती. तिच्यासाठी 13 हजार रुपये खर्च आला. लॉकडाऊन नसतं तर ही रक्कम आम्ही सेलिब्रेशन आणि गिफ्टवर खर्च केली असती, असं सृजन म्हणाला.

वाढदिवसाच्या आधीच्या रात्री माझ्या भावानं मला, एक गुंडाळलेला पेपर गिफ्ट केला, असं साक्षीनं सांगितलं.

"मी जेव्हा पेपर उघडला तेव्हा त्यावर [email protected] हा ईमेल अॅड्रेस आणि त्याचा पासवर्ड लिहिलेला होता. मला याचं नेमकं काय करायचं तेच कळत नव्हतं. सकाळी सृजनने मला एक वृत्तपत्र विकत आणून दिलं. त्यातलं विवाह विषयक जाहिरातीचं पान उघडून पेपर माझ्या हातात दिला. त्यानंतर आम्ही खूप हसलो. ही एक चांगली गंमत होती,'' असं साक्षीनं सांगितलं.

पण आमच्यात गंमत म्हणून सुरू झालेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. सेलिब्रिटींनी ही जाहिरात शेअर केल्यानंतर त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आणि अनेक ईमेल यायलाही सुरुवात झाली.

"मला आतापर्यंत 60 ईमेल मिळाले आहेत. अनेकांच्या हे लक्षात आलं होतं की हा जोक होता आणि तो त्यांना आवडलाही", असं साक्षी म्हणाली.

''एका व्यक्तीनं तिला लिहिलं की, मी अत्यंत नम्र आणि ठाम मत असणारा नाही, त्यामुळं मी तुझ्यासाठी योग्य आहे. तर एका महिलेनं, मीही अगदी अशीच आहे, असं म्हणत जाहिरात देण्यासाठी आभार मानले.''

पण भारतासारख्या पितृसत्ताक पद्धत असलेल्या देशामध्ये स्त्रीमतवादी हा शब्दच वाईट समजला जातो. तर स्त्रीवादी लोकांबद्दलही पुरुषांचा द्वेष करणारे अशाप्रकारचा गैरसमज केला जातो. त्यामुळं या जाहिरातीमुळं अशा काहींची मनं दुखावल्यानं काही वाईट मॅसेजही आले.

साक्षीला 'गंडा घालणारी', 'ढोंगी' आणि 'भांडवलशाही विरोधी तरीही श्रीमंत नवरा हवा असणारी', असं काही जणांनी म्हटलं. तर काही जणांनी 30 वर्षांची असूनही 25-28 वर्षांचा नवरा हवा म्हणून तिच्यावर टीका केली. अनेकांनी साक्षीला स्वतः पैसे कमावण्याचा सल्लाही दिला.

काही जणांनी या जाहिरातीला विखारी असंही संबोधलं. एका जणानं तर सर्व स्त्रीवादी हे मूर्ख असल्याचं म्हटलं. एक महिला एवढी संतापलेली होती की तिनं, ''माझा भाऊ तुला 78 व्या मजल्यावरून खाली फेकेल'' अशी धमकीच दिली.

भारतात आजही 90% लग्नं ही ठरवून केलेली (अरेंज्ड) असतात. प्रत्येकालाच चांगला सेटल असलेला नवरा हवा आहे. पण हे मत अशाप्रकारे स्पष्टपणे मांडल्यामुळं अनेकजण संतापले.

जाहिरातीमुळं अनेकांचे अहंकार दुखावले गेले असं साक्षी म्हणाली.

"अशा गोष्टी तुम्ही थेटपणे बोलू शकत नाहीत. पुरुष नेहमी उंच, सडपातळ, सुंदर नवरीची मागणी करू शकतात. त्यासाठी संपत्तीची बढाई मारतात. पण जेव्हा नाणं दुसऱ्या बाजुनं पडतं, ते त्यांना पचत नाही. मुली असे निकष कशा लावू शकतात? असा प्रश्न उभा राहतो."

''ही जाहिरात म्हणजे या मुद्द्यावर गमतीशीर मार्गानं भाष्य करण्याचा प्रयत्न होता. माझ्या मते, जे लोक अशा प्रकारे गोरी, सडपातळ, सुंदर नवरी पाहिजे अशा जाहिराती देतात, त्यांनाच याचा जास्त राग आला असावा," असंही साक्षी म्हणाली.

ज्यांना ही अशाप्रकारची गंमत आवडली नाही, त्यांना साक्षीनं एक प्रश्न केला आहे. "वृत्तपत्रात रोज अशा प्रकारच्या जातीयवादी, किंवा विशिष्ट प्रकारची नवरी हवी असलेल्या जाहिराती देणाऱ्यांना तुम्ही असेच इमेल पाठवता का? जर नसाल पाठवत, तर आधी या पितृसत्ताक वृत्तीला आळा घाला" असं साक्षी म्हणते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)