देवेंद्र फडणवीसांचं 'ते' विधान शिवसेनेची पुन्हा मनधरणी करण्यासाठी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
"शिवसेना आणि आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हतं, आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, 'जर-तरला काही अर्थ नसतो," असं विधान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
सोमवार (5 जुलैपासून) महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, रविवारी (4 जुलै) फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेते आशिष शेलार आणि खासदार संजय राऊत यांच्या 'कथित' गुप्त भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं, "कोणाची भेट झाली का ते माहीत नाही. कोणी कोणालाही भेटू शकतं. पण आमच्यात कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही. आमचे काही बांधावरून वाद नाहीत, की त्यांनी आमच्या हद्दीत अतिक्रमण केले. आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे आमचे मतभेद झाले."
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना असंच विधान केलं होतं.
मुनगंटीवार यांनी म्हटलं, "शिवसेना गेली 30 वर्षं आमच्यासोबत होती. 1984 मध्ये शिवसेनेचे उमेदवार आमच्या चिन्हावर निवडणूक लढले होते. त्यामुळे शिवसेना हा काही आमचा शत्रू नाही. 24 ऑक्टोबर 2019ला त्यांना फसविण्यात आलं. त्यांनाही मुख्यमंत्रिपदाचा मोह पडला. भाजप सत्तेसाठी कधी कामच करत नाही, पण हिंदुत्वाच्या विचारासाठी शिवसेनेनं उद्या घोषणा दिली तर…" असं विधान मुनगंटीवार यांनी केलं.
या दोन भाजप नेत्यांनी लागोपाठ केलेल्या या वक्तव्यांमुळे भाजप-शिवसेनेच्या नात्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. ही विधानं शिवसेनेची मनधरणी करून त्यांना आपल्या बाजूनं वळविण्याचा हा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात शिवसेनेबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
'मार्ग बदलले तरी मैत्री कायम'
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपसोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र तरीही भाजपसोबत मतभेद आहेत, मात्र मैत्री कायम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी म्हटलं की, राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते. आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी त्यांनी आमिर खान आणि किरण राव यांचंही उदाहरण दिलं.
संजय राऊत यांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्व नाही असं म्हटलं आहे. मतभेद नक्कीच आहेत आणि मीदेखील हेच सांगत आहे. आम्ही काय भारत-पाकिस्तान नाही. भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असते. पण आता आमचे राजकीय रस्ते बदलले आहेत. फडणवीसांनी हेच सांगितलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
संजय राऊत यांनी भाजप-शिवसेनेचे मार्ग वेगळे असल्याचं सांगितलं असलं तरी देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो, असं म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर, सध्याची परिस्थिती शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर नेणारी आहे का?
गेल्या काही दिवसांच्या घडामोडीतून हेच दिसतंय का? तसं असेल तर भाजप आपल्या जुन्या मित्राच्या पुन्हा जवळ जाण्यासाठी प्रयत्नशील आहे की शिवसेनेच्या नवीन मित्रांच्या मनात त्यांच्याबद्दल केवळ संभ्रम निर्माण करत आहे?
या प्रश्नांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
या प्रश्नांची उत्तर शोधण्याआधी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या ते पाहू.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेचं मौन
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षांचं पद तातडीने भरण्याबाबत सूचना केली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालंय. त्यानंतर सरकारने नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड केलेली नाही.
अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असलं तरी, अनेक नेते अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासुद्धा नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होईल असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं होतं, तसंच काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीसुद्धा याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असं म्हटलं होतं.
शिवसेनेकडून मात्र या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
"विधानसभा अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील," अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिली होती.
एकूणच अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजपबरोबरच सहकारी पक्षही आग्रही असताना शिवसेनेनं धारण केलेलं मौन कोड्यात टाकणारं आणि महाविकास आघाडीत खरंच एकवाक्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं होतं.
शरद पवार-उद्धव ठाकरे भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बराचवेळ झालेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ही भेट राजकीय नसल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Getty Images
28 जूनला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते लगेचच शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांना भेटले होते.
त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
तसंच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घ्यावं. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा त्रास थांबेल अशी भावना व्यक्त केली होती.
या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
या भेटीनंतर बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी म्हटलं होतं, "काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची भाजपबद्दलची भूमिका मवाळ झालेली दिसतेय. शिवसेना भाजपची जवळीक वाढत चालली आहे का? याबाबत असंख्य चर्चा आहेत.
"संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैयक्तिक संबंध अजून चांगले आहेत असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते 'नरेंद्रभाईच' आहेत असं ते म्हणाले. या सगळ्याची स्पष्टता शरद पवार यांना हवी असेल," देशपांडे पुढे सांगतात.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ कसा लावायचा याबद्दल आम्ही 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्याशी संपर्क साधला.
"भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात, ही चर्चा दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणारी आहे," असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
'शिवसेना आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येऊ नये याची रणनीती'
"पश्चिम बंगाल निवडणुकीत संपूर्ण ताकद लावूनही भाजपला यश मिळालं नाही. उत्तर प्रदेशमध्ये पण मोदी विरुद्ध योगी असं चित्रं काही दिवसांपूर्वी निर्माण झालं होतं. तिथली जातीय समीकरणंही बदलली आहेत. कोरोनाच्या हाताळणीतही केंद्राला अपयश आलं आहे.
"शिवसेना, अकाली दल असे जुने मित्र दुरावले आहेत. सर्व काही मोदींच्या नियंत्रणात आहे, असं आधी जे चित्र होतं ते आता नाहीये. त्यामुळे 2024 ची निवडणूक एनडीए म्हणून लढावी लागली तर त्या दृष्टीने पुनर्रचना करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. फडणवीस किंवा मुनगंटीवारांनी केलेल्या विधानांकडे याचदृष्टीने पाहता येईल," असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, PTT
"राज्यातील समीकरणांचा विचार केला तर शिवसेनेसाठीदेखील ही चर्चा फायद्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होऊ नये, त्यांनी सत्तेत अधिकाधिक वाटा मागू नये यासाठी शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे, ही चर्चा सुरू राहणं शिवसेनेच्या पथ्यावर पडणारं असेल," असंही संदीप प्रधान यांनी म्हटलं.
"अनेक राज्यांत प्रादेशिक पक्ष हे भाजपला मोठ्या प्रमाणात आव्हान देताना दिसतात. भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन अधिक सक्षम आघाडी तयार होऊ नये. असाही भाजपचा प्रयत्न असेल. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी विरोधात ईडीच्या कारवाईचा बडगा उगारताना दुसरीकडे शिवसेनेसोबत एकत्र येण्याचा मार्ग खुला असल्याचं दाखवणं हे भाजप करत आहे," असं संदीप प्रधानांनी म्हटलं.
अर्थात, या सगळ्याचा महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर लगेचच परिणाम होईल असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही त्यांनी म्हटलं.
'शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?'
भाजपने केलेलं वक्तव्य हे शिवसेनेवर दबाव टाकण्याचं तंत्र असल्याचं मत सकाळचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्कीन यांनी व्यक्त केलं.
"गेले काही दिवस भाजप शिवसेनेविरुद्ध आक्रमक झाल्याचं चित्र होतं. प्रताप सरनाईक प्रकरण असेल किंवा अनिल परबांवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप असतील. पण या गोष्टी थंडावल्या आणि आता अनिल देशमुखांनंतर थेट अजित पवारांविरोधात ईडीचा बडगा उगारण्यात आला आहे.
"भ्रष्टाचाराचे असे आरोप करून सरकारची प्रतिमा डागाळायची आणि नंतर शिवसेनेवर नैतिक दबाव टाकायचा अशी भाजपची रणनीती असू शकते," असं मत संजय मिस्कीन यांनी व्यक्त केलं.
"भाजपकडून कायमच हे सरकार टिकणार नाही, असं वक्तव्य वारंवार केलं जातं. त्यातच शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे, शिवसेनेसोबत केवळ मतभेद आहेत, असं म्हणत शिवसेना या सरकारमधून बाहेर पडू शकते अशी धारणा निर्माण करायची आणि प्रशासनावरही दबाव निर्माण करायचा," असंही संजय मिस्कीन यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








