मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का?

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आगामी काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आहेत. यापैकी देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणार्‍या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकांचे पडघम आतापासून वाजायला सुरुवात झाली आहे.

राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र असताना पुढच्या निवडणूकांची गणितं कशी जुळणार हा प्रश्न वर्षभरापासून विचारला जातोय. महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढलेली विधानपरिषदेची पहिली निवडणूक होती. त्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं.

यानिमित्ताने बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी म्हटलं "यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसर्‍या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही."

याचबरोबर शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही "आगामी नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र लढतील."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर सत्तार यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची मानली गेली. एकीकडे शिवसेना नेते एकत्रित निवडणूक लढवण्याची भाषा करत असताना दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचं चित्र आहे.

मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे राज्याच्या सत्तेत एकाच गादीवर बसलेले हे तीन पक्ष महापालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार हे स्पष्ट होतय.

भाई जगताप

फोटो स्रोत, Bhai Jagtap/facebook

फोटो कॅप्शन, भाई जगताप

स्वबळाची भाषा कशासाठी?

मुंबई महापालिका निवडणुकीचा रोडमॅप तयार असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बीबीसीला सांगितलं.

"मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 होतेय. आमच्याकडे मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा 'रोड मॅप' तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तिकडच्या स्थानिक राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतात.

"कॉंग्रेस मुंबई महापालिकेसाठी 227 जागांची तयारी करतेय. याआधीही आम्ही आघाडीत होतो पण जिथे शक्य नव्हतं, तिथे वेगवेगळे लढलो आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 227 जागांची तयारी करतोय," असं जगताप यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणितं वेगळी असतात असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेत कॉंग्रेसने स्वबळाचा नारा का दिला? याची राजकीय गणितं काय आहेत? मुंबई महापालिकेत शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे तर कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे.

2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 93 जागा, भाजपला 82 जागा, कॉंग्रेसला 31 जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजप ही निवडणूक वेगवेगळी लढले असले तरी राज्यात असलेल्या युतीमुळे ते निवडणूकीनंतर मुंबई महापालिकेच्या सत्तेत एकत्र आले. कॉंग्रेस हा तिसर्‍या क्रमांकांचा पक्ष असल्यामुळे विरोधी पक्षनेते पद कॉंग्रेसकडे गेलं. 4 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम केलेल्या कॉंग्रेसला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज असल्याचं कॉंग्रेस नेत्यांकडून सांगितलं जातंय.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Facebook/CMO Maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेत फक्त 9 नगरसेवक आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेबरोबर लढली तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूकांबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "मुंबईमधला जो श्रमिक वर्ग आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विभागला गेलाय. त्यामुळे दोघांचा मतदार काही विभागात सारखा आहे. पण अर्थात शिवसेनेचं पारडं जड आहे. पण मुंबईतले उत्तर भारतीय हा कॉंग्रेसचा मतदार आहे. मागच्यावेळी कॉंग्रेसचा हा उत्तर भारतीय मतदार भाजपकडे गेला. त्याचा फटका कॉंग्रेसला बसला. जर कॉंग्रेसने आतापासूनच महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची तयारी दाखवली तर हा उत्तर भारतीय मतदार आतापासूनच भाजपच्या बाजूने जाऊ शकतो. यासाठी कॉंग्रेसने 227 जागांवर तयारी करत असल्याचं जाहीर केलय."

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चाचपणी सुरू?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.

विधानपरिषदेच्या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र दिसणार का प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले, "यापूर्वी जिथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची ताकद आहे तिथे दोघं एकमेकांच्या विरोधात लढायचो आणि आम्ही विरोधात लढून विरोधकाचं फावणार असेल तिथे विरोधात लढायचो नाही. मी उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलेन. जास्तीत जास्त एकत्रित येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करू."

उद्धव ठाकरे आणि शरद पवार

फोटो स्रोत, PTI

कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना मात्र अजित पवार हे 'स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या' असं सांगत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई महापालिकेत जसा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे तसाच फायदा नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी झाल्यामुळे होऊ शकतो असं नेत्यांकडून खासगीत सांगितलं जातय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गणेश नाईक असताना नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं. पण विधानसभा निवडणुकीवेळी गणेश नाईक यांनी 58 नगरसेवकांसह भाजप प्रवेश केला.

त्यामुळे गणेश नाईक यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 2015 साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 52 जागा, शिवसेनेला 31 जागा, कॉंग्रेसला 10 जागा तर भाजपला 6 जागा मिळाल्या होत्या.

राष्ट्रवादी खालोखाल शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. पण राष्ट्रवादीचे 58 नगरसेवक बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेबरोबर जाणं फायद्याचं असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद आणि कल्याण डोंबिवली महापालिकेची गणितही स्थानिक राजकीय परिस्थितीवर ठरतील.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

राज्याचा राजकारणावर परिणाम नको?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक राजकीय गणितांवर होतात.

"अनेकदा राज्यात सत्तेत असणारे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधात लढतात. पण त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ देत नाही असा आतापर्यंतचा इतिहास आहे असं जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात.

ते पुढे म्हणतात, "स्थानिक निवडणूकांमध्ये राज्यात असलेल्या विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली जाते. मित्रपक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण केलं जातं. पण त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर केला जात नाही."

2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. पण राज्याच्या सत्तेत एकत्र होते. 2015 साली कल्याण डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना 'बच्चा' म्हटले होते.

तर फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर देताना 'रामदास भाई तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती' ... असं म्हटलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी फडणवीस यांनी मदत केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचीही गणितं स्थानिक पातळीवर वेगळी आणि राज्य पातळीवर वेगळी असतील असं विश्लेषकांना वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)