गोपीचंद पडळकर शरद पवारांवर सातत्याने विखारी टीका करताना का दिसतात?

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहचला आहे. बुधवारी (30 जून) दुपारी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केल्यानंतर संध्याकाळी अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे.

या घटनेनंतर पडळकर म्हणाले, "पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते हे आता राज्याला माहित आहे. परंतु माझा आवाज बंद होणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही." या घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "हा हल्ला भाजपचाच स्टंट असावा. कोणत्याही सदस्याच्या गाडीवर असा हल्ला होऊ नये. पण हा भाजपने घडवून आणलेला स्टंट आहे. प्रसिद्धीसाठी हे केलं जातं आहे, असंही ते म्हणाले.

शरद पवार यांच्याविषयी ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यामुळे पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवारांवर विखारी टीका का करत आहेत?

यामागील राजकारण नेमके काय आहे? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा संघर्ष शिगेला का पोहचला? अशा प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन गोपीचंद पडळकर सध्या राज्यभरात 'घोंगडी बैठका' घेत आहेत. बुधवारी (30 जून) ते सोलापुरात बोलत होते.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

सुरुवातीला त्यांनी शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीवरून टीका केली. ते म्हणाले, "मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे."

ते पुढे म्हणाले, "शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे."

गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर संध्याकाळी त्यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावल्याचे समोर आले. यात त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे समजते.

"ओबीसींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही," असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

"राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो," असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

"महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत? हे ओबीसी नेते पुढे का आले नाहीत? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.

सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असंही पडळकरांनी म्हटलंय.

प्रसिद्धीसाठी विखारी टीका?

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ते म्हणाले, "शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत."

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, BBC/FACEBOOK

इतकंच नाही तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असंही वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले होते, "मला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, आणि विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं. अशाप्रकारे ज्याला लोकांनी त्या-त्या वेळेला एकदम बाजूला केलं, त्याची आपण कशाला नोंद घ्यायची?"

शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याविरोधात अशी भाषा वापरली किंवा विखारी टीका केल्यास प्रसिद्धी मिळत असते आणि म्हणून अशी वक्तव्य केली जातात असं जाणकार सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सांगतात, "मोठ्या नेत्यावर चिखलफेक केली की भरपूर प्रसिद्धी मिळते. मग लोकांना आपोआप पडळकर नावाचा नेता आहे हे कळू लागतं. मोठ्या लोकांवर टीका करून आपलं अस्तित्व प्रस्थापित करायचं. त्यांचं राजकीय भवितव्य त्यांना अशा पद्धतीने घडवायचं आहे."

"शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यावर टीका केली की दखल घेतली जाते त्यामुळेच अशा प्रकारची भाषा वापरली जाते," असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.

गोपीचंद पडळकर आमदारकीची शपथ घेताना

फोटो स्रोत, GoPICHAND PADALKAR/SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, गोपीचंद पडळकर आमदारकीची शपथ घेताना

ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पवार कुटुंबात आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील बड्या नेत्यांवर टीका केली की लोकांमध्ये चर्चा होते. ज्याप्रमाणे काँग्रेसला लक्ष्य करायचे असल्यास गांधी घराण्यावर टीका करायची यातलाच हा पण एक प्रकार आहे. अशी भाषा वापरली की नेत्याच्या विरोधकांनाही आनंद होतो."

'भाजपचे दुहेरी राजकारण'

पडळकर यांनी 2019 विधानसभा निवडणूक बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात लढवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता.

त्या क्षणापर्यंत भाजपने कोणत्याही उमेदवाराचं नाव अधिकृतरीत्या जाहीर केलेलं नव्हतं. पण फडणवीस यांनी पडळकर यांच्या प्रवेशावेळीच ते बारामतीमधून लढतील, अशी घोषणा केली होती.

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. कोरोना आरोग्य संकट, मराठा आणि ओबीसी आरक्षण, नेत्यांवरील आरोप अशा विविध मुद्यांवर भाजपने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत आम्ही त्यांचा आदर करतो असं एकाबाजूला भाजपचे मोठे नेते सांगतात. दुसऱ्या बाजूला पडळकर विखारी टीका करतात. यासंदर्भात देसाई म्हणाले, "ही राजकारणातली दुहेरी चाल असते. त्याचाच हा भाग आहे. टीका करून घ्यायची आणि मोठेपणाही घ्यायचा असा दुहेरी व्यवहार आहे."

पडळकर

फोटो स्रोत, facebook

सत्ताधारी पक्षावर तोफ डागण्यासाठी विरोधकांकडे अशा नेत्यांची फौज असते आणि ही राजकीय खेळी आहे असंही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, "ज्याप्रमाणे भाजपचे नेते नारायण राणे सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका करत असतात त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर आता पवार कुटुंबावर निशाणा साधताना दिसतात. नारायण राणे, आशिष शेलार, राम कदम, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर असे नेते सरकारवर टीका करण्यासाठी तसंच वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात."

"ज्या भूमिका किंवा जी वक्तव्यं भाजपातील ज्येष्ठ नेते करू शकत नाहीत अशी वक्तव्यं काही विशिष्ट नेत्यांकडून केली जातात असंही आपल्याला दिसून येतं असं," हेमंत देसाई सांगतात.

ते म्हणाले, "थेट टीका करणं परवडणारं नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून टीका करायची. परंतु ज्येष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय पडळकर असं बोलण्याचं धाडस करणार नाहीत असं मला वाटतं."

धनगर आरक्षण आणि पडळकर

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाला बळ दिलं.

गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

फोटो स्रोत, FACEBOOK

या माध्यमातून आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला. त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. ते भाषणासाठी व्यासपीठावर येताच 'एकच छंद, गोपीचंद...'अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सरकारने धनगरांना एसटीत आरक्षण दिलं नाही, म्हणून पडळकरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं होतं.

"धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे 20-25 लाख धनगर लोक आपल्या शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील," असा इशारा पडळकर यांनी भाजपला दिला होता.

परंतु वंचित बहुजन आघाडीला सोडताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं होतं. पडळकर यांनी त्यावेळी म्हटलं, "धनगर आरक्षणाबाबत सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. सरकारने समाजासाठी एक हजार कोटी दिले आहेत. 22 आदिवासी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकार धनगर समाजासाठी चांगलं काम करत असल्याची लोकांची भावना आहे."

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, "पडळकर यांच्या राजकारणाला धनगर समाजाच्या आरक्षण विषयाच्यादृष्टीनेही पाहिलं पाहिजे. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना बाजूला करत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केलं."

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

"धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी पूर्ण करू असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलं होतं. परंतु भाजप आरक्षण देऊ शकलं नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम टीका होत असते. या टीकेचा सामना करण्यासाठी किंवा याला प्रत्युत्तर देण्यासाठीही भाजपच्या धनगर नेत्याकडून टीका होत असावी,"

बारामती, इंदापूर या भागात मोठ्यासंख्येने धनगर समाज आहे. तेव्हा धनगर पट्ट्यात आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो असंही ते सांगतात.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याकडे भाजप लक्ष केंद्रित करू पाहत आहे, असंही आपल्याला म्हणता येईल. हर्षवर्धन पाटील, उदयनराजे, संभाजीराजे, गोपीचंद पडळकर अशा नेत्यांना आपल्याकडे घेऊन खिंडार पाडण्याचा प्रयत्न असू शकतो.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

38 वर्षीय गोपीचंद पडळकर यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालेलं आहे. पडळकरांना राजकारणाव्यतिरिक्त सिनेमाची आवड आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी 'धुमस' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय केलेला आहे.

गोपीचंद पडळकर 2013 ते 2018 दरम्यान भाजपमध्ये होते. यानंतर ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. याच पक्षाकडून त्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवली.

विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला.

2009 ते 2013 दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते.

2019 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली होती.

याशिवाय 2014 आणि 2009 मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. यात 2014 मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर 2009 ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांच्याकडून पडकरांचा पराभव झाला होता.

गोपीचंद पडळकर यांना सलग चार निवडणुकांमध्ये पराभव पत्कारावा लागला असला तरी अखेर भाजपने विधान परिषदेच्या माध्यमातून पडळकर यांना आमदारकीची संधी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)