शरद पवारांच्या घरची 'ती' बैठक तिसऱ्या आघाडीसाठी की राष्टपती निवडणुकीसाठी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
भारतात 90 च्या दशकापासून निवडणुकांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा ही होतच आली आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींना पर्याय देण्यासाठी या चर्चेनं जोरही धरला होता, पण ती काही अस्तित्वात येऊ शकली नाही.
यावेळी मात्र तिसऱ्या आघाडीची घोषणाच होते की काय असं काही वातावरण सोमवारी 22 जूनला निर्माण झालं होतं. कारण शरद पवारांच्या नवी दिल्लीतील घरी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांच्या आणि सिव्हिल सोसायटीमधील काही सदस्यांची एक बैठक पार पडली.
प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर ही बैठक त्यासाठी नव्हती अशीच प्रतिक्रिया आली. राष्ट्रमंचचे संयोजक आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी या बैठकीत नरेंद्र मोदींचा विषयही निघाला नाही, असं स्पष्ट केलं.
सिन्हा निदान मीडियाशी बोलले. शरद पवार तर बैठकीनंतर पत्रकारांसमोरच आले नाहीत. मग तिसऱ्या आघाडीचं नेमकं काय झालं. शरद पवारांनी सध्या हा विषय लांवणीवर टाकलाय. की, मोदींविरोधात थेट भूमिका घ्यायला सध्या ते टाळतायत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा का केली नाही?
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत शरद पवारांची तीनदा भेट घेतली तेव्हापासून खरंतर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेच्या चर्चेनं जोर धरला. नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपने मागच्या दोन निवडणुकांमध्ये बहुमत आपल्याकडे खेचलं आहे. देशभर त्यांचा असलेला दबदबा मोडून काढण्यासाठी प्रादेशिक आणि सर्वच पक्षांनी एकत्र येणं ही काळाजी गरज आहे, असं सगळ्याच विरोधी पक्षांना वाटतं.
त्यातच अशा आघाडीचं नेतृत्व करण्याची तयारी शरद पवारांनी कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्षपणे नेहमीच दाखवली आहे. पवारांचा अनुभव, त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व तसंच राज्याबाहेरही असलेला राजकीय जनसंपर्क यांच्यामुळे अशी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात ये यशस्वी होतील, असाही जाणकारांचा होरा होता.
त्यामुळे यावेळच्या बैठकीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. पण, बैठकीपूर्वीच प्रशांत किशोर यांचं एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतलं एक विधान माशी शिंकल्यासारखं आलं.

फोटो स्रोत, Social Media/NCP
तिसरी किंवा चौथी आघाडी नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल असं मला वाटत नाही. माझं अशा कुठल्याही आघाडीबरोबर नातं नाही. इतिहास हेच सांगतो की, अशा प्रकारच्या आघाड्यांमध्ये सरकारला आव्हान देण्याची क्षमता नसते.
राष्ट्र मंचच्या बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीचं प्रकरण नेमकं का बारगळलं यावर बीबीसी मराठीने काही राजकीय पत्रकार आणि विश्लेषकांशी चर्चा केली.
राष्टमंचची बैठक कशासाठी होती?
ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी या बैठकीचं आणि यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाचं रिपोर्टिंग केलं आहे. त्यांच्या मते, पवारांना तिसरी आघाडी स्थापन करायचीच नव्हती. विरोधी पक्षातल्या लोकांशी संपर्क साधून फक्त चाचपणी करायची होती. आता तिसरी किंवा राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्याची योग्य वेळ नाही, असं त्यांना वाटतं.
"ही बैठक भविष्याची चाचपणी होती, इतकंच आपण म्हणू शकतो. तिसरी आघाडी आता स्थापन करणं म्हणजे आधीपासूनच पराभव मान्य करण्यासारखं आहे. सगळ्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येण्यावर फक्त चर्चा सुरू आहे. पण, अशी आघाडी तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा काँग्रेस आणि डाव्या पक्षांबरोबर सगळे पक्ष त्यात सहभागी होतील," चावके यांनी आपला मुद्दा स्पष्ट करून सांगितला.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यांमध्येही त्यांना चांगलं पाठबळ आहे, त्यामुळे काँग्रेसला वगळून तयार झालेली आघाडी मोदींना हरवू शकत नाही, असं चावके यांचं मत आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात आणीबाणी नंतर जसा संघटित प्रयत्न झाला तसा प्रयत्न होण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल असंही चावके यांना वाटतं.

फोटो स्रोत, Social Media/NCP
तर ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या मते शरद पवार गाजावाजा न होऊ देता बऱ्याच गोष्टी करतात. अगदी बैठकांनंतरही ते पत्रकारांशी थेट संवाद साधत नाहीत. त्यांचे निकटवर्तीय मग थोडी थोडी माहिती मीडियाला देतात.
अर्थात, बैठकीत राष्ट्रीय आघाडी उघडण्यावर गुप्त चर्चा झाली असल्याची शक्यता त्यांना वाटते.
"मोदी विरोधी आघाडी उभी करण्याची सुरुवात झाली आहे एवढं नक्की. आणि त्यासाठी शरद पवारींनी राष्ट्रीय पातळीवर इतर पक्षांशी वाटाघाटीही सुरू केल्या आहेत. आपल्याबरोबर कोण येऊ इच्छितं, समविचारी पक्ष कुठले आहेत याची चाचपणी ते करत आहेत. आता काँग्रेसला बरोबर यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे," राही भिडेंनी आपलं मत मांडलं.
2024च्या निवडणुकांना अजून वेळ आहे. तोपर्यंत शरद पवार सर्व समविचारी पक्षांना या ना त्या कारणाने एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवतील, असं भिडे यांना वाटतं.
नवीन राष्ट्रीय आघाडीचं नेतृत्व कोण करू शकेल यावर भिडे म्हणतात, "ते ठरवण्यासाठी अजून वेळ आहे. पण, काँग्रेस या आघाडीत येईल का आणि इतरांचं नेतृत्व ते मान्य करतील का यावर आता सगळ्यांची नजर असेल. आघाडीचं नेतृत्व कार्यकारी समितीही करू शकते."
तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वावर सहमती होईल का?
दोन्ही विश्लेषणातून असंच दिसतंय की, मोदी विरुद्ध आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतच राहणार आहे. पण, ही आघाडी कशी असेल आणि तिचं नेतृत्व कोण करेल? याविषयी ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक वेगळा दृष्टिकोन दिला.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "सध्या शरद पवारांच्या डोळ्यासमोर 2022ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक सगळ्यांत आधी असेल असा माझा होरा आहे. या निवडणुकीत परस्पर सहमतीतून विरोधी उमेदवार उभा करता आला किंवा अगदी स्वत:लाही उभं राहता आलं तर त्याची चाचपणी पवार करत असावेत. त्यानंतर पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपविरोधी आघाडी उभी राहते का यावरही पवार आणि सगळ्यांचंच लक्ष असेल. त्यानंतर नव्या राष्ट्रीय आघाडीची वाटचाल ठरवता येईल."
तिसऱ्या किंवा राष्ट्रीय आघाडीचे प्रयत्न होतच राहतील याबद्दल सरदेसाई यांनाही शंका वाटत नाही. पण, तिचं नेतृत्व करताना पवार 'किंग' ठरतात की, 'किंग मेकर' याकडे त्यांचं लक्ष आहे.
जाणकारांच्या मते, 2024 च्या निवडणुका जवळ येईपर्यंत फारशी हालचाल यादृष्टीने सध्यातरी होणार नाही. आणि शिवाय या प्रयत्नांना काँग्रेस साथ देते का आणि भाजपविरोधात एकूण किती पक्ष एकत्र येतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








