शरद पवार म्हणतात, 'आगामी निवडणुका एकत्र लढवू; 'पण अद्याप प्रस्तावच नाही' काँग्रेसची प्रतिक्रिया

फोटो स्रोत, @PawarSpeaks
उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 3 पक्ष अधिक जोमाने एकत्र काम करतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, "सरकार पडण्याबद्दल अनेकांनी आडाखे बांधले आहेत. पण मला एवढचं सांगायचं आहे की, हे सरकार टिकेल. पुढची 5 वर्षं काम करेल. हे सरकार नुसतं 5 वर्षं नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमानं एकत्र काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही."
पण, दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याऐवजी अनपेक्षित अशी प्रतिक्रिया दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रस्तावच आलेला नाही, एकत्र बसून याबाबत निर्णय घेता येईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे-
- देशात अनेक पक्ष आले आणि गेले. काही लोकं गेल्यामुळे नवीन लोकं तयार झाले. राजकारणात सतत नव्या पिढीने काम करत राहीलं पाहीजे. राष्ट्रवादीमध्ये ही नवी पिढी तयार होतेय. त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही करतोय.
- शिवसेना आणि आपण एकत्र का आलो? पर्याय समोर आला आणि तो लोकांनी स्वीकारला. शिवसेनेबरोबर आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र गेले अनेक वर्ष शिवसेनेला जाणतो आहे.
- शिवसेनेने इंदीरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे शिवसेना विश्वास असणारा पक्ष आहे. राज्यातले नेते आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटले. तेव्हा परत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
- हे सरकार महिनाभर टिकेल, या आठवड्यात पडेल, वर्षभरात पडेल असं बोललं गेलं. पण हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रस्ताव नाही, काँग्रेस स्वबळावरच - नाना पटोले
राष्ट्रवादीने हात पुढे केला असताना टाळी देण्याऐवजी काँग्रेसने त्या हाताला राजकीय चिमटे घेतल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनपेक्षित उत्तर दिल्याचं दिसून आलं.
संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, "ते आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांचं प्लॅनिंग वेगळं असेल, आमचं प्लॅनिंग वेगळं असू शकतं. आमची अद्याप एकत्र बसून चर्चा झाली नाही. पण पक्ष म्हणून काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झाली आहे.
"विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित निवडणुका लढवण्याची भूमिका असेल. मात्र अद्याप आम्हाला त्यांच्याकडून तसा प्रस्ताव मिळालेला नाही," असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








