गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर सोलापुरात दगडफेक, राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, FACEBOOK

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेकीची घटना बुधवारी (30 जून) घडली.

सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात एका हल्लेखोराने एक मोठा दगड पडळकर यांच्या वाहनावर मारला. यामध्ये, चारचाकी वाहनाची काच फुटून मोठे नुकसान झालं. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.

वाहनावर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. परंतु तो व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

सोलापुरात माझा कुणासोबतही वाद नाही. माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली.

दरम्यान, दुपारनंतर पडळकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि या हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट दाखवलं आहे. या फोटोत संशयित आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार हे एकाच फोटोत असल्याचं पडळकर यांनी दर्शवलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल, घोंगडी बैठका सुरूच राहणार," असं पडळकर म्हणाले.

विशेष म्हणजे, पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्रमक टीकेनंतर हा हल्ला झाल्यामुळे या वादाशी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलं जात आहे.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "हा हल्ला भाजपचाच स्टंट असावा. कोणत्याही सदस्याच्या गाडीवर असा हल्ला होऊ नये. पण हा भाजपने घडवून आणलेला स्टंट आहे. प्रसिद्धीसाठी हे केलं जातं आहे, असंही ते म्हणाले.

'शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मी त्यांना मोठं मानत नाही'

"शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे," अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

हल्ल्यानंतर वाहनाची स्थिती

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर वाहनाची स्थिती

गोपीचंद पडळकर हे सोलापुरात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक 22 जून रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रमुख पक्षांची मोट एकत्र बांधून देशात नरेंद्र मोदी सरकारला आव्हान उभं करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पडळकर यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या या बैठकीवरूनही टीका केली आहे.

"मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे," अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला.

ओबीसी आरक्षणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ओबीसींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.

"राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो," असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

पडळकर

फोटो स्रोत, Facebook

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यांत जास्त असल्याचा दावाही पडळकर यांनी केला. धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत? हे ओबीसी नेते पुढे का आले नाहीत? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.

सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असंही पडळकरांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)