Bitcoin: या चलनाचं भविष्य भारत सरकार कसं निश्चित करणार?

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल चलन लोकप्रिय होऊ लागलं आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याची निर्मिती केली जाते. डिजिटल चलन एन्क्रिप्टेड म्हणजे कोडेड असतं यामुळे याला क्रिप्टोकरन्सी असंही म्हटलं जातं.

जगभरात संबंधित देशातील सर्वोच्च बँक चलन नियंत्रित करते. मात्र क्रिप्टोकरन्सीला हा नियम लागू नाही. याचं नियंत्रण खरेदीविक्री करणाऱ्या लोकांच्या हाती असतं.

म्हणून बहुतांश देशांमधील सरकार अशा चलनाला बेकायदेशीर मानतं किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतं.

दक्षिण अमेरिकेतील एल साल्व्हाडोरने बिटकॉईनच्या वापराला मंजुरी दिली आहे.

कायदेशीर प्रक्रियेसाठी एल साल्व्हाडोरने जागतिक बँकेकडे तांत्रिक मदत मागितली आहे. जागतिक बँकेने बिटकॉईन चलनाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. पारदर्शकता तसंच पर्यावरणविषयक मुद्यांमुळे परवानगी नाकारल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे.

दुसरीकडे चीनने मनी लाँड्रिंगप्रकरणी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित 1100 लोकांना अटक केली आहे.

डिजिटल चलनाची लोकप्रियता लक्षात घेऊन चीनने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. पण क्रिप्टोकरन्सीवर सरकारचं नियंत्रण नसतं. चीनने डिजिटल चलन सुरू केलं आहे ज्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे.

डिजिटल युआन हे पारंपारिक युआनची ऑनलाईन आवृत्ती आहे. प्रायोगिक तत्त्वावर चीनमधल्या काही शहरांमध्ये गेल्या वर्षी सुरू करण्यात आलं. अमेरिकासुद्धा डिजिटल डॉलर सुरू करण्याच्या विचारात आहे.

भारत आणि क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी-विक्रीसाठी भारतात सध्या 19 क्रिप्टो एक्स्चेंज मार्केट आहे. यामध्ये वजीरएक्सचं नाव गेले काही दिवस चर्चेत आहे.

केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाने वजीरएक्सचे संस्थापक आणि निर्देशक निश्चल शेट्टी यांना फेमा कायद्याअंतर्गत 2,971 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारप्रकरणी हिशेब सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीने वजीरएक्सला केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर अर्थात ग्राहकांविषयी आवश्यक माहिती जमा केली नसल्याचं म्हटलं आहे.

ईडीनुसार वजीरएक्सचा वापर चीनच्या काही नागरिकांनी वजीरएक्स वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी केला आहे. वजीरएक्सचे संस्थापक शेट्टी यांनी प्रत्युत्तरादाखल तीन ट्वीट केले. त्यांनी ईडीचे आरोप फेटाळून लावताना तपासात सहकार्य करू असं म्हटलं आहे.

भारतात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात सरकारी नियमावली नाही. म्हणूनच वजीरएक्स संदर्भात केवळ केवायसी नियमावलीचं पालन नाही म्हणून कंपनीला नोटीस जारी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने संसदेच्या पुढच्या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात विधेयक सादर करू शकतं. व्हर्च्युल करन्सीवर नियंत्रण करण्यासंदर्भात सरकारने एससी गर्ग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल तयार केला आहे. याव्यतिरिक्त सरकारकडे अनेक मंत्रालयांच्या संयुक्त समितीचा अहवालही आहे.

जाणकारांच्या मते गर्ग समितीने क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मात्र मार्च महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण ठेवलं जाईल असं म्हटलं होतं.

त्यावर प्रतिबंध लागू केले जाणार नाहीत. सरकार सद्यस्थितीत द्विधा मनस्थितीत आहे. सरकारचा अंतिम निर्णय काय हे विधेयक सादर केल्यानंतरच कळू शकेल.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

जगभरात रुपया, डॉलर, युरो सारखी चलनं वापरली जातात. गेल्या दहा ते बारा व्हर्च्युअल जगात अनेक डिजिटल चलनं उदयास आली आहेत. या चलनांची लोकप्रियता वाढतेच आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या चलनाचा वापर करतो.

अगदी सोप्या शब्दांत - क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी. म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंडासारखं नसतं.

कोणत्याही देशाचं सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते.

मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.

बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करतंय.

यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती.

बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.

जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.

हे खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.

जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.

2017 पर्यंत जगभरातल्या एक लाखांहून अधिक सुपरमार्केट चेन्स आणि मोठ्या दुकानदारांनी बिटकॉईनमध्ये व्यवहारांना मान्यता दिली होती.

भारतातही इन्फोसिसच्या इन्फोसिस फिनॅकल या सबसिडरी कंपनीनं ब्लॉकचेनच्या माध्यमातून व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे.

गेल्या आठवड्यात बिटकॉईनची किंमत 30 लाख रुपये होती. जगभरात दोन कोटी बिटकॉईन वापरात आहेत, यापैकी दोन हजार भारतात आहेत.

बिटकॉईनच्या किमतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळाले आहेत. विश्लेषकांच्या मते, काही महिन्यात बिटकॉईनचं मूल्य 50 टक्क्यांनी घसरू शकतं. अन्य जाणकारांच्या मते, बिटकॉईनचं मूल्य 30 लाखाहून 75 लाखापर्यंत वधारू शकतं.

एन्क्रिप्टेड बिटकॉईनची संख्या चार हजार आहे. सर्वसामान्य माणसांना बिटकॉईन नावानेच माहिती आहे.

भारतात सर्वसामान्य नागरिकांना याची जेमतेम माहिती आहे. जगभरात बाकी देशांमध्येही अशीच स्थिती आहे. गुगल ट्रेंड्स पाहिले तर हे लक्षात येतं की बिटकॉईन बद्दल जाणून घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

क्रिप्टो आणि ब्लॉकचेन

क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवीण सिंगापूरस्थित मोठ्या कंपनीत पोर्टफोलिओ व्यवस्थापक आहेत. त्यांचं काम चलन व्यापाराशी निगडित आहेत.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "ब्लॉकचेन भविष्यातला तंत्रज्ञानाचं व्यासपीठ आहे. ब्लॉकचेनच्या माध्यमातून क्रिप्टो चलनाची देवाणघेवाण होते. ब्लॉकचेन माहितीचं जतन करणारी यंत्रणा आहे. माहितीत फेरफार करणं किंवा हॅक करणं जवळजवळ अशक्य आहे."

थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये लियोनार्ड कुकोस क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात. या कामात ते गर्क असतात. ब्लॉकचेनसारख्या नव्याने उदयास येत असलेल्या तंत्रज्ञानाचे ते जाणकारही आहेत.

बीबीसीने पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांना सांगितलं की, सोप्या शब्दात ब्लॉकचेन खास प्रकारचा डेटाबेस आहे. ड्रिस्ट्रिब्युटेड खातं म्हणता येईल.

डिजिटल व्यवहाराची नोंद करतं. यात बदल करणं, हॅक करणं, फेरफार करणं अशक्य आहे. हे विशेष आहे कारण सगळे व्यवहार संगणकांच्या प्रचंड अशा नेटवर्कमध्ये एन्क्रिप्टेड, कॉपीड आणि ड्रिस्ट्रिब्युटेड स्वरूपात आहेत.

ते पुढे सांगतात, "या संगणकांना नॉड म्हटलं जातं. प्रत्येक व्यवहाराला मान्यता देणं आणि त्याची नोंद करणं हे त्याचं काम असतं. .. नॉड असू शकतं परंतु संपूर्ण नेटवर्कवर कोणाचं नियंत्रण नसतं. ब्लॉकचेन विकेंद्री स्वरूपाची प्रणाली आहे."

क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन एकमेकांशी संलग्न आहेत आणि त्यांचं घट्ट नातंही आहे. लियोनार्ड सांगतात त्याप्रमाणे, ब्लॉकचेन एक अवाढव्य स्वरूपाची चोपडी आहे. बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी त्याच खात्याप्रमाणे तयार करण्यात आली आहे.

बिटकॉईन ब्लॉकचेनविना काम करू शकत नाही. पण ब्लॉकचेनचा प्रणालीचा उपयोग क्रिप्टोकरन्सी व्यतिरिक्त अन्य कामांसाठीही होतो.

बिटकॉईन एकमेव क्रिप्टोकरन्सी नाही. इथेरियम, टिथर, कार्डानो, पोल्काडॉट, रिपल आणि डोजकॉईन यासारख्या क्रिप्टोकरन्सी चलनात वापरल्या जातात. यांच्या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सची उलाढाल चालते.

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात सगळ्यांत आधी बिटकॉईन आलं. त्याचं मूल्य सर्वाधिक आहे आणि लोकप्रियही आहे. 2009 मध्ये बिटकॉईन लाँच करण्यात आलं. मार्केट कॅप 732 अब्ज डॉलर आहे. बिटकॉईनचं मूल्य काही देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी गाडीची रक्कम बिटकॉईनमध्ये स्वीकारणार नाही असं घोषित केलं. त्यावेळी बिटकॉईनची किंमत 45 लाख रुपयांवरून 25 लाखांवर आली होती नंतर पुन्हा थोडी वाढली.

विश्वास नसेल तर नोटा केवळ कागद आहेत

क्रिप्टोकरन्सीसाठी सध्या लोकांचा विश्वास जिंकणे हे मोठं आव्हान आहे. सरकार याकडे संशयाने पाहत आहे. पारंपारिक चलनाला हे आव्हान देऊ शकतं असं सरकारला वाटतं आहे.

क्रिप्टोकरन्सी व्हर्च्युल जगाचा भाग आहे जो सरकारी नियंत्रणाच्या पल्याड आहे. सरकारच्या नियंत्रणापासून मुक्त होण्याचा या चलनाचा प्रयत्न आहे. पारंपरिक चलनाला समांतर व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न आहे.

प्रवीण सांगतात, "सरकारचा क्रिप्टोकरन्सीला विरोध करण्याचं कारण म्हणजे यांच्या बाजारांवर सरकारचं नियंत्रण नाही. पायाभूत व्यवस्थेची कमतरता आणि बाजार नियमांचा अभाव यामुळे सरकारला यावर नियंत्रण ठेवता येत नाहीये."

लिओनार्ड कुकोस सांगतात, "क्रिप्टोकरन्सीबाबात टीकेचा मुख्य मुद्दा म्हणजे त्याचं वास्तविक मूल्य कमी आहे. काही लोकांच्या मते बिटकॉईनचं वास्तविक मूल्य काहीच नाहीये. अंतिम असं याचं मूल्य नसेल कारण कोणत्याही सरकारचं यावर नियंत्रण नाही."

ते पुढे सांगतात, "अमेरिकेत 100 डॉलर नोटांच्या छपाईसाठी 14 सेंट इतकाच खर्च येतो. बाकी खर्चाचं काय? विश्वास. चलन आपण वापरतो. व्यवहारिक कारणांसाठी लोक अजूनही पारंपारिक चलनांवर विश्वास ठेवतात. विश्वासाविना चलनातली नोट हा कागदाचा तुकडा आहे."

प्रसिद्ध इस्रायली विचारवंत आणि इतिहासकार युवाल नोआ हरारी यांच्या मते पैसा केवळ कागदच आहे. पैशाप्रति सामूहिक विश्वास नाही. ते एका पुस्तकात लिहितात, "पैसा हा आपापसातील सार्वभौम आणि कौशल्यपूर्ण प्रणाली आहे."

सुरुवातीला लोकांचा मुद्रेवर म्हणजे नाण्यांच्या व्यवहारावरही विश्वास नव्हता. लोकांचा विश्वास कमवायला युगभराचा काळ लागला. तसंच क्रिप्टोकरन्सीबाबतही होऊ शकतं.

क्रिप्टोकरन्सीचा गैरवापर

सरकारच्या मते क्रिप्टोकरन्सीचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी होतो. तस्कर आणि दहशतवादी याचा वापर करू शकतात.

क्रिप्टोकरन्सीच्या समर्थकांच्या मते पारंपरिक चलन वापरूनही लोक भ्रष्टाचार करतात, लूट करतात, दहशतवादी योजनांसाठी वापर होतो.

प्रवीण यांच्या मते क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे तसंच केंद्रीय बँकांकडे कोणतेही नियम किंवा पायाभूत यंत्रणा नाही.

अनेक दशकांपासून केंद्रीय बँकांनी दहशतवादाला मिळणारा पैसा तसंच बेकायदेशीर आर्थिक व्यवहार याकडे बारकाईने लक्ष ठेवलं आहे. प्रत्येक व्यवहाराचा तपशील टिपला आहे.

विदेशी चलन असल्याने तपशील सादरही करावा लागतो. केवायसी आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग रणनीती त्याचाच भाग आहे. पण क्रिप्टोसंदर्भात अद्याप असे कोणतेही नियम नाहीत.

लिओनार्ड यांच्या मते हा नियंत्रणाचा खेळ आहे. ते सांगतात, "बिटकॉईनचं वैशिष्ट्य हे आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी एन्क्रिप्टेड स्वरूपाचा व्यवहार करते. सगळं काही विखुरलेलं आहे ज्यावर सरकारची किंवा सेंट्रल बँकेकडून नियमन आवश्यक आहे. म्हणून सरकारला याची भीती वाटते आहे. हा सगळा नियंत्रणाचा खेळ आहे. नियंत्रणाचा अर्थ होतो सत्ता. म्हणूनच चीनने क्रिप्टोकरन्सीविरोधात पावलं उचलायला सुरुवात केली. अमेरिका यावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील आहे."

क्रिप्टोकरन्सीवर विश्वास कसा ठेवणार?

मोठमोठ्या संस्था तसंच बँका याचा वापर सुरू करतील तसतसं क्रिप्टोकरन्सीवरचा विश्वास वाढेल.

मोठ्या संस्थांनी क्रिप्टोकरन्सीचा वापर सुरू केला आहे. गोल्डमन सॅक्सने ग्राहकांना बिटकॉईनची सुविधा दिली आहे.

लिओनार्ड यांच्या मते विश्वास संपादन करायला वेळ लागतो. गोपनीय प्रकारातून मुख्य प्रवाहात येण्यासाठी क्रिप्टोकरन्सीला दशकभराचा कालावधी लागला. पारंपरिक चलनाला यासाठी यापेक्षा जास्त वेळ लागला होता.

जर्मनीच्या डॉएच बँकेने पेमेंट सिस्टमच्या भविष्यावर एक संशोधन प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीवर सविस्तर मांडणी करण्यात आली होती.

डॉएच बँकेच्या अहवालानुसार, 'क्रिप्टोकरन्सीची सुरक्षा, गती, देवाणघेवाणीचं निम्नतम शुल्क, डिजिटल युगातली प्रासंगिकता हे सगळे मुद्दे चांगले असतानाही व्यवहारासाठी व्यापक प्रमाणावर याचा वापर सुरू झालेला नाही.'

जसा काळ बदलेल तशी परिस्थिती बदलेल असं या संशोधनात म्हटलं आहे. गुगल, अमेझॉन, फेसबुक, अपल किंवा टेन्सेट सारख्या चीनच्या कंपन्या चीन सरकारच्या क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील साशंकता दूर करू शकतात.

तसं झालं तर क्रिप्टोकरन्सी अधिक आकर्षक होईल. ब्लॉकचेन वॉलेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढू लागली तर दशकाच्या अखेरीपर्यंत क्रिप्टोकरन्सीचा वापर 20 कोटी लोक करत असतील. जो आतापेक्षा चार पट असेल.

खूप चढउतार हे उणेपण

अनेक माणसं क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात. कारण याच्या किमतीमध्ये सातत्याने मोठे चढउतार होतात. अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी म्हटलं होतं की 'जेव्हा दुसरी माणसं लोभी असतील तेव्हा तुम्ही घाबरा, जेव्हा दुसरी माणसं घाबरलेले असतील तेव्हा तुम्ही लोभी व्हा.'

हे सूत्र अवलंबून त्यांनी अब्जावधी डॉलरची कमाई केली. दुसरीकडे पारंपारिक चलनामध्येही चढउतार पाहायला मिळत आहेत.

प्रवीण यांच्या मते, 'टर्कीचं चलन लीरा आणि रशियाचं रुबल अत्यंत अस्थिर आहेत. कोणत्याही नव्या गोष्टीप्रमाणे क्रिप्टो चलन आता अस्थिर असतं.'

आगामी काळात पारंपरिक बँकिंगच्या तुलनेत पैशांची देवघेव, आयात-निर्यात याची परिमाणं बदलतील असं प्रवीण यांना वाटतं.

लिओनार्ड यांच्या मते 'क्रिप्टोकरन्सीसाठी स्वीकार्यता वाढू लागली आहे. याचं एक कारण म्हणजे आर्थिक संस्था याचा वापर करू लागल्या आहेत.'

पेपल या ई-वॉलेटने बिटकॉईन देवाणघेवाणीची अनुमती दिली आहे. यामुळे बिटकॉईनचा मार्ग सुकर झाला आहे.

मात्र अजूनही काही विशेषज्ञांना असं वाटतं की क्रिप्टोकरन्सी हा एक बुडबुडा आहे आणि लवकरच तो फुटेल. लिओनार्ड यांच्या मते अनेक पैलूंच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचं भविष्य आपल्या समोर येतं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)