क्रिप्टोकरन्सीः रिझर्व्ह बँकेने भीती व्यक्त करूनही भारतात वेगाने वाढतेय क्रिप्टोकरंसी

    • Author, निधी राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, मुंबई

बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीने पुन्हा एकदा गुंतवणूक बाजारात प्रवेश केला आहे आणि यावेळचा प्रवेश जोरदार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एक पिस बिटक्वानईचा दर तब्बल 16 लाख रुपये (जवळपास 22000 डॉलर्स) आहे.

गेल्या तीन वर्षातला हा सर्वाधिक दर आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 5900 इतका दर होता. हा दर 1 लाख डॉलर्सपर्यंत जाईल, असेही अंदाज वर्तवले जात आहेत.

क्रिप्टोकरन्सी एक डिजीटल चलन आहे. या करंसीच्या नियमनासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही. रुपये किंवा डॉलर्सप्रमाणे हे चलन प्रत्यक्ष हातात घेता येत नसलं तरी या पैशातून वस्तू खरेदी करता येते.

दिल्लीत राहणाऱ्या 34 वर्षांच्या रितिका पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत. त्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात.

चार महिन्यांपूर्वी त्यांनी 1 हजार रुपये गुंतवून बिटक्वाईन खरेदी केले होते.

त्या सांगतात, "क्रिप्टोकरन्सीवरचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. मला तो खूप आवडला. मला ती कल्पना आवडली आणि काहीतरी नवीन करून बघू, असं मला वाटलं. चार महिन्यातच माझी गुंतवणूक एक लाखांपर्यंत पोहोचली आहे."

रितिका नवीन गुंतवणूकदार आहेत आणि त्यांना पैसे 5 वर्षांहून जास्त काळासाठी ठेवायचे आहेत.

त्या म्हणतात, "माझी गुंतवणूक इन्स्टंट मनीसाठी नाही. माझी गुंतवणूक भविष्यासाठी आहे. मी सिंगल आहे आणि वेगवेगळ्या पोर्टफोलियोमध्ये गुंतवणूक करावी, अशी माझी इच्छा आहे."

क्रिप्टो करंसीवरचा लेख वाचल्यानंतर त्यांनी थोडा रिसर्च केला आणि यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

"ट्विटर, फेसबुक आणि ब्लॉगवर आपल्यासारखाच विचार करणारे अनेकजण असतात. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. त्यांच्या चुकांमधूनही तुम्ही शिकू शकता."

आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनसाठीही अनेक बिजनेस कंपन्या क्रिप्टोकरन्सीचा वापर करतात. मुंबईत राहणाऱ्या रुची पाल बांधकाम व्यवसायात आहेत. त्या 2015 सालापासून क्रिप्टो करंसीचा वापर करत आहेत.

त्यांचे परदेशातले ग्राहक क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करू इच्छित होते. त्यामुळे त्यांनी क्रिप्टोकरन्सीचा वापर सुरू केला.

त्या म्हणतात, "बिटकॉईन जगभरात चालणारं चलन आहे. वेस्टर्न यूनियनसारखे पर्याय महागडे आणि किचकट असल्यामुळे क्रिप्टो करंसीमध्ये व्यवहार करावा, असं माझ्या सिंगापूर आणि मलेशियातल्या क्लायंट्सचं म्हणणं होतं. मी पे पाल, परफेक्ट मनी सारखे आंतरराष्ट्रीय गेटवेही वापरून बघितले. त्यानंतर मी बिटकॉईन वापरायला सुरुवात केली."

क्रिप्टोकरन्सीच्या वापरासाठी थर्ड पार्टी परवानगीची गरज नसते. त्यामुळे हा स्वस्त आणि सुलभ पर्याय आहे.

क्रिप्टोकरन्सी दीर्घकाळ टिकतील का?

वजीर एक्स भारतातील एक प्रमुख क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म आहे. गेल्या 6 महिन्यात 300 टक्के अधिक यूजर्सने या प्लॅटफॉर्मवर साईन-इन केलं आहे.

कंपनीचे सीईओ निश्चल शेट्टी सांगतात, "वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या व्हर्च्युअल मनी किंवा क्रिप्टोकरन्सीचा वापर करू शकत नाही, हा रिझर्व्ह बँकेचा आदेश मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला."

"यानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि लोकांनी घरूनच काम करायला सुरुवात केली. यामुळे लोकांना क्रिप्टोकरन्सीविषयी माहिती काढायला बराच वेळ मिळाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग ते शोधू लागले."

"या आरोग्य संकटाने लाखो लोकांना क्रिप्टोकडे वळवलं. मायक्रोस्ट्रॅटेजी, पे स्केल आणि पे पाल यासारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये बरीच गुंतवणूक केली. यामुळे या क्षेत्रात बरंच भांडवल आलं."

मात्र, 2017 पासून आतापर्यंत काय बदललं? याचं उत्तर देताना शेट्टी म्हणतात, "गुंतवणूकदार पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व झालेत. त्यांनी 2017 पासून आतापर्यंतची परिस्थिती बघितली. आधी चढ मग उतार येतो, हे त्यांना माहिती आहे. काय होऊ शकतं, याचीही त्यांना कल्पना आली आहे."

वजीर एक्सव्यतिरिक्त बाजारात जेब पे, कॉईन डीसीएस आणि कॉईन स्विच यासारख्या कंपन्याही आहेत. वजीर एक्स कंपनीच्या मते यूजर्सचं सरासरी वय 24 ते 40 वर्षांदरम्यान आहे. साधारण इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असणारे यूजर्ज जास्त आहेत.

16 डिसेंबर 2020 पर्यंत भारताच्या चार मुख्य क्रिप्टोकरंसीमध्ये 22.4 मिलियन डॉलर्सचा व्यवहार झाल्याचं क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट वॉचडॉगचं म्हणणं आहे. 1 मार्चपर्यंत ही आकडेवारी 4.5 मिलियन डॉलर्स इतकी होती.

याशिवाय मार्च ते डिसेंबर या काळात एक्सचेंजमध्ये 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या पॅक्सफुलच्या अहवालानुसार भारत बिटकॉईनचा चीननंतर आशियातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जगात भारताचा क्रमांक सहावा आहे. अमेरिका, नायजेरिया, चीन, कॅनडा आणि ब्रिटन भारताच्या पुढे आहेत.

कॉईन डीसीएक्सचे सीईओ सुमित गुप्ता यांच्या मते, "ज्यांना क्रिप्टो करंसीचं तंत्र माहिती आहे ते क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतात."

भारतात क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का?

सनी बिटकॉईनचे संस्थापक संदीप गोएंका म्हणतात, "बिटकॉईन भविष्यात पैशांचं इंटरनेट बनेल."

"केंद्र सरकारने ही संधी ओळखून बिटकॉईन बेकायदेशीर नाही, हे सार्वजनिकपणे सांगावं आणि यासंबंधीचं कर धोरण जाहीर करावं."

"इतर देशांमध्येही नवीन नियम हळू-हळू आखले जात आहेत. भाारतानेही त्यांच्या अनुभवातून शिकत स्वतःसाठी बदल करावे. सरकार या क्षेत्रातल्या लोकांशी बोलून एक फ्रेमवर्क आखू शकतं. आपण फिनटेक आणि तंत्रज्ञानात लीडर आहोत. याचा वापर करत आपण या नव्या क्रांतीचं नेतृत्त्व करू शकतो."

ते पुढे म्हणाले, "क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे त्याचा गैरवापर आणि फ्रॉड होण्याची शक्यताही असते. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या विरोधामागचं मुख्य कारणही हेच होतं. रिझर्व्ह बँकेने 2018 साली यावर बंदी घातली. मात्र, यावर्षी मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली."

क्रिप्टोने समाजात काहीच योगदान दिलं नाही, असा याचा अर्थ होत नसल्याचं गोएंका म्हणतात. ते सांगतात, "इतर कुठल्याही क्षेत्राप्रमाणे क्रिप्टोमध्ये चांगले-वाईट लोक आहेत. मात्र, त्यामुळे याला रोखणं, योग्य ठरणार नाही."

गुंतवणूक करताना भावनेच्या भरात करू नये, असं जाणकार सांगतात. 10 रुपयांपासून सुरू करून हळूहळू शिकता येतं.

6 एप्रिल 2018 रोजी रिझर्व्ह बँकेने एक सर्क्युलर काढून व्यापारासाठी क्रिप्टोकरंसीचा वापर करण्यावर बंदी घातली. बँक आणि इतर वित्तीय संस्था कुठल्याही व्हर्च्यु्अल मनीच्या माध्यामातून व्यवहार करणार नाही, असेही आदेश काढण्यात आले.

यातून बाहेर येण्यासाठी संस्थांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्याआधी रिझर्व्ह बँकेने यूजर्स आणि व्यापाऱ्यांना क्रिप्टोच्या धोक्यांचीही कल्पना दिली होती.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने कोर्टात आव्हान दिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेचा आदेश रद्द केला.

घोटाळ्याच्या भीतीने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता आणि यासंदर्भात केंद्र सरकार काही मार्गदर्शक सूचना जारी करेल, अशी त्यांची अपेक्षा होती.

मात्र, रिझर्व्ह बँकेचा आदेश असंवैधानिक होता आणि कुठल्याही व्यवसायाला देशाच्या बँकिंग यंत्रणेचा वापर करण्याचा अधिकार आहे, असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं होतं.

क्रिप्टोकरन्सीवर कर कसा आकारतात?

क्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या उत्पन्नाला कशापद्धतीने बघावं, याबाबत सध्या संभ्रम आहे. सरकारने यासंदर्भात कुठल्याही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या नाहीत.

मनीएज्युस्कूलचे संस्थापक अर्णव पांड्या यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हे उत्पन्न इनकम फ्रॉम अदर सोर्सेस असं दाखवावं लागेल. तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करत आहात की दिर्घकालीन, त्यावर हे अवलंबून असेल. त्यानुसारच तुम्हाला कॅपिटल गेन कर भरावा लागेल."

"तुमचा सीए (चार्टेड अकाउंटंट) हे उत्पन्न कसं दाखवतो, हे त्यावरही अवलंबून असणार आहे. इनकम टॅक्स विभागाला तुमच्या या उत्पन्नाबद्दल कळणार नाही, असं समजू नका. त्यांच्याकडे सर्वच प्लॅटफॉर्मचे रेकॉर्ड असतात आणि केवायसीचं पालन करणं, सर्वांवर बंधनकारक असतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)