अयोध्या : राम मंदिर जमीन खरेदी वादातले अनुत्तरित प्रश्न

फोटो स्रोत, Getty Images
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, अयोध्येवरुन, बीबीसी हिंदीसाठी
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या परिसर विस्तारासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा कथित घोटाळ्याचा वाद वाढतच चालला आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने याबाबतीत स्पष्टीकरण दिलं असून विश्व हिंदू परिषदेने असे आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे आरोप करणाऱ्या लोकांचा स्वरही अधिक तीव्र झाला असून यासर्व प्रकरणात काही प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.
दोन कोटींची जमीन 18.5 कोटींमध्ये
या सर्व वादाचा हाच मूळ मुद्दा आहे. ज्या लोकांकडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ही 12 हजार वर्ग मीटर जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली ती जमीन त्या लोकांनी काही दिवस आधीच फक्त 2 कोटी रुपयांना खरेदी केली होती.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते चंपतराय यांनी याबाबतीत अनेकवेळा स्पष्टिकरण दिलं आहे. या जमीनखरेदीमध्ये कायदेशीर बाबींचं पालन केलं आहे आणि जमीन खरेदी करण्यापूर्वी तिची सर्व बाजूंनी तपासणी केली गेली आणि बाजारमूल्य देऊनच जमीन खरेदी केली, असं स्पष्टीकरण चंपतराय देतात.

फोटो स्रोत, BBC/SAMEERATMAJ MISHRA
चंपतराय म्हणतात, "श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जी जमिन खरेदी केली ती बाजारभावापेक्षाही कमी किमतीत खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी सध्याच्या विक्रेत्यांनी ज्या मूल्यावर अनेक वर्षांपूर्वी करार केले होते त्या जमिनीवर त्यांनी 18 मार्च 2021 रोजी नाव दाखल केलं. त्यानंतर त्यांनी ट्रस्टबरोबर करार केला. त्यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही."
अयोध्येत बाग बजेसी भागामध्ये गटनंबर 243,244,246 च्या जमिनीचा सर्कल रेट 4800 रुपये प्रतिवर्ग मीटर आहे. त्या हिशेबानं जर जमीन खरेदी केली तर किंमत 5 कोटी 80 लाख होते.

फोटो स्रोत, Getty Images
सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी ही जमीन कुसुम पाठक आणि हरिश पाठक यांच्याकडून 18 मार्च 2021 रोजी 2 कोटी रुपयांना घेतली आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ती 18.5 कोटी रुपयांना विकली. या जमिनीचे 17 कोटी रुपये बँक खात्यात पाठवल्याचं सांगितलं जात आहे, मात्र कोणाच्या खात्यात ते टाकले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चंपत राय सांगतात हा व्यवहार अनेक वर्षांपासून सुरू होता. या जमिनीचा करार 2011 साली कुसुम पाठक आणि हरिश पाठक यांच्यात दोन कोटी रुपयांत झाला होता. मात्र 18 मार्च 2021 रोजी त्यांच्या नावावर जमीन झाली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अमूक लोकांमध्ये ठरवलेल्या रकमेत आधी करार होतो आणि नंतर त्या कराराच्या आधारावर व्यवहार होतो. करारात ठरवलेल्या वेळेनुसार व्यवहार न झाल्यास त्याची मुदत संपते. त्यानंतरही जमीन व्यवहार करायचा असेल तर त्याची मुदत वाढवावी लागते. जमिनीची किंमत दिल्यानंतर मालकाचं नाव बदललं जातं. हे जमीन खरेदी-विक्री व्यवहाराचा अनुभव असणाऱ्यांना माहिती असेलच.
काही अनुत्तरित प्रश्न
या काळात कराराचं नूतनीकरण करुनही कुसुम पाठक आणि हरिश पाठक यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवी तिवारी यांना दोनच कोटी रुपयांना का विकली असा प्रश्न विचारला जात आहे.
ट्रस्टने ही जमीन हरिश आणि कुसुम यांच्याकडूनच का विकत घेतली नाही, सुलतान आणि रवी यांना मध्ये का यावं लागलं? असाही प्रश्न विचारला जात आहे.
ही जमीन पाठक दाम्पत्याकडून घेतली असती तर अत्यंत कमी दरात मिळाली असती, असं समाजवादी पक्षाचे नेते तेज नारायण पांडेय सांगतात. सुलतान आणि रवी यांना यांना जास्त रक्कम द्यावी लागली आणि या दोघांनी काही मिनिटांतच 16.5 कोटी रुपयांचा नफा मिळवला.

फोटो स्रोत, BBC/SAMEERATMAJ MISHRA
सुलतान अन्सारी आणि रवी तिवारी यांनी सर्कल रेटपेक्षा निम्म्या किंमतीला जमीन कशी घेतली याचं उत्तर कोणाकडेही नाही.
जमीन खरेदीतील सहभागी 8 लोक कुठे गेले?
18 मार्च 2021च्या आधीसुद्धा या जमिनीचा व्यवहार असाच वादात होता. 2011 साली जमिनीच्या काररात विक्रेता म्हणून महबबू आलम, जावेद आलम, नूर आलम, फिरोज आलम यांची नावं आहेत. तर खरेदीदार म्हणून कुसुम पाठक आणि हरिश पाठक यांची नावं आहेत. हा करार 1 कोटी रुपयांत झाला. 2014 साली याच लोकांमध्ये त्याचं नूतनीकरण झालं.
या काळात सर्व प्रकरण कोर्टात असल्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही. परंतु 2017 साली रजिस्ट्रेशन झालं. 2019 साली हरिश आणि कुसुम, सुलतान यांच्यासह 8 जणांना ही जमीन विकण्यासाठी करार केला. तेव्हा तिची किंमत 2 कोटी ठरवली गेली.
हा करार अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही काळातच झाला. त्यानंतर लोक राम मंदिर परिसराच्या आजूबाजूची जमीन विकत घेऊ लागल्यामुळे जमिनीचे दर वाढले.
या कराराचं रजिस्ट्रेशन होताना त्यातली सुलतान वगळता 8 लोकांची नावं नाहीशी होतात आणि त्यात रवी मोहन तिवारी हे नवं नाव आलं.

फोटो स्रोत, SHAMIM A AARZOO
विशेष म्हणजे रवी मोहन तिवारी या करारात आधी साक्षीदार होते, नंतर रजिस्ट्रेशनच्यावेळेस ते जमिनीचे मालक होतात.
इतकंच नाही तर दस्तावेजात सुलतान वगळता ज्या 8 जणांची नावं आहेत, त्यांचे मोबाइल नंबर्सही आहेत, त्यात सुलतान अन्सारी वगळता कोणाच्याही नंबरवर संपर्क होऊ शकला नाही.
काही नंबर्सवर चुकीचा नंबर असं सांगण्यात आलं तर काही नंबर्स चालू नसल्याचं दिसलं. इतकंच नाही तर करारात विश्वविजय उपाध्याय नावाच्या एका व्यक्तीला जमिनीत 15 टक्के हिस्सेदार असल्याचं दाखवलं आहे.
दस्तावेजात त्यांचा दाखवलेला नंबर हा रवी मोहन तिवारी यांचा आहे. त्यानंबरवर रिंग वाजते पण कोणीही उचलत नाही.

फोटो स्रोत, SHAMIM A AARZOO
याशिवाय कुसुम, हरिश पाठक यांनी सुलतान अन्सारी यांच्यासमवेत 9 माणसांबरोबर एकूण 2.34 हेक्टर जमिनीचा करार केला होता. मात्र सुलतान अन्सारी आणि रवी तिवारी यांचं नाव फक्त 1.208 हेक्टर जमिनीवर लागलं आहे.
हरिश पाठक आणि कुसुम पाठक कोण आहेत?
या प्रकरणात हरिश पाठक आणि त्यांची पत्नी कुसुम पाठक यांचं नाव प्रामुख्याने येत आहे. करार आणि रजिस्ट्रेशनमधील माहितीनुसार हरिश पाठक बस्ती जिल्ह्यात राहाणारे आहेत.
कागदपत्रांत हरिश पाठक यांच्यासमेवत हरिदास पाठक यांचंही नाव नोंदलेलं आहे. अयोध्येत त्यांना बबलू पाठक किंवा बकरीवाले बाबा म्हणूनही ओळखलं जातं. मात्र अयोध्येपासून त्यांच्या बस्ती जिल्ह्यातील मूळ घरापर्यंत ते कोठेही आढळून येत नाहियेत.
अयोध्येपासून जवळपास 35 किमी अंतरावरील बस्ती जिल्ह्यातील हरैया तालुक्यातील पाठकपूर गावचे ते रहिवासी आहेत. मात्र भरपूर प्रयत्न करुनही त्यांची भेट किंवा त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.
अयोध्या प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी सांगतात, हरिश पाठक गेली अनेक वर्षं जमिनीच्या खरेदी-विक्रीचं काम करतात. महेंद्र त्रिपाठी यांच्यामतानुसार ते अयोध्येत कामधंद्यासाठी राहात असतील पण ते प्रामुख्याने त्यांच्या मूळ गावातच राहातात.
अयोध्येत कँट ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात फसवणूक आणि अफरातफरीची अनेक प्रकरणं नोंदली आहेत. एका स्थानिक पोलिसांनी सांगितलं अटक टाळण्यासाठी ते फरार असल्यामुळे 2018 साली त्यांच्या घरावर जप्तीही आली पण ते सापडले नाहीत.
18 मार्च 2021 रोजी बाग बिजेसीमधील जमिनीचे जे दोन व्यवहार झाले त्यात अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे प्रदेश ट्रस्टी डॉ. अनिल मिश्र साक्षीदार आहेत.
असं असलं तरी महापौर ऋषिकेश उपाध्याय म्हणतात की हरिश पाठक यांच्याबाबत त्यांना फार माहिती नाही.
वक्फ बोर्डाची जमीन हरिश पाठक यांना कशी मिळाली?
अयोध्येत रामजन्मभूमीपासून सुमारे 4 किमी दूर बाग बिजेसीमधील या जमिनीची मालकी हरिश आणि कुसुम यांना कशी मिळाली हेसुद्धा वादग्रस्त आहे.
2011 मध्ये ही जमीन पाठक दाम्पत्याने महफूज आलम, जावेद आलम, नूर आलम आणि फिरोज आलम यांच्याकडून 1 कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्याआधी हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. या चार लोकांना ही जमीन विकण्याचा अधिकार नव्हता असा आरोप आहे.
अयोध्या शहरात श्रीरामजन्मभूमी परिसरात राहाणारे वहीद अहमद सांगतात, "ही संपत्ती आमच्या पूर्वजांची वक्फची होती. त्यानुसार त्याच्या देखरेखीसाठी कुटुंबातल्याच मुतवल्लीची निवड होते. त्या व्यक्तीला जमीन विकण्याचा आधिकार नाही. मात्र सध्याचे मुतवल्ली महफूज आलम यांचे वडील महबूब आलम यांनी फेरफार करुन जमीन आपल्या नावावर केली."
वहीद सांगतात,याशिवाय त्यांनी अनेक जमिनी विकल्या आहेत. त्यावर कारवाईसाठी आम्ही 2018मध्ये वक्फकडे विनंतीपत्रही दिलं आहे.
वहीद सांगतात, वक्फच्या संपत्तीचं प्रकरणही कोर्टात आहे. त्यामुळेच 2017 साली पाठक दाम्पत्यानं जो करार सुलतान आणि इतर लोकांबरोबर केला त्यावर पुढचं काम 2021 पर्यंत होऊ शकलं नाही, असं ते सांगतात.
जमीन खरेदीत ट्रस्टला अंधारात ठेवलं का?
ज्या मोहम्मद नायक यांच्या घराण्याची ही वक्फ संपत्ती असल्याचं सांगितलं जातं त्यांची दुसऱ्या बाजूसही मोठी संपत्ती असल्याचं सांगितलं जातं.
ट्रस्टने जी जमीन घेतली आहे ती पेरुची बाग आहे आणि त्याच्या समोर स्मशान आहे. वहीद सांगतात, "या पूर्ण प्रकरणात अयोध्येचे मोठे प्रॉपर्टी डिलर्स सहभागी आहेत. जमिनीची सत्यता ट्रस्टच्या लोकांना सांगण्यात आलेली नाही. ट्रस्टला अंधारात ठेवलं गेलं असं आम्हाला वाटतं आणि काही लोकांनी ट्र्सटला जमीन देऊन पैसा मिळवला आहे."
परंतु जमीन खरेदी करताना सर्व गोष्टींचा विचार करुन पारखून घेतल्याचं चंपतराय सांगतात. राम मंदिरापासून ही जागा 4 किमी दूर आहे. राम मंदिर परिसरात ज्यांची घरं आहेत त्यांचं तिथं पुनर्वसन करता यावं म्हणून ही जमीन घेतल्याचं चंपतराय सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








