सुशांत सिंह राजपूत : आत्महत्या, ड्रग्ज, मानसिक आरोग्य अशा खऱ्या-खोट्या चर्चांमध्ये स्वप्नाळू सुशांत हरवला?- ब्लॉग

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी टीव्ही एडिटर

"एखाद्या सावलीसारखा...मी आहेसुद्धा आणि नाही पण"- रुमी

सुशांत सिंह राजपूतच्या ट्विटर वॉलवर लिहिलेली ही पोस्ट सुशांतच्या असण्याचा आणि नसण्याचा एक विचित्र अनुभव देते.

"ज्याला जगताना 'का' हा प्रश्न पडतो, तो कसंही करून तरून जाईल"- नीत्शे

"जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तोपर्यंत तुम्ही ईश्वरावरही श्रद्धा ठेवू शकणार नाही"- विवेकानंद

रुमीच्या कवितांपासून ते नीत्शे, विवेकानंदांचं तत्त्वज्ञान समजून घेण्याची ज्याला जिज्ञासा होती, ती व्यक्ती कशी असेल हा विचार येतो. या सगळ्या पोस्टस त्याच्या ट्विटर हँडलवर मी अनेकदा शोधून शोधून वाचल्या आहेत.

एखाद्या कलाकाराला बनवता बनवता तत्त्वज्ञ, वैज्ञानिक तसंच एखाद्या स्वैर प्रवाशाचा अंशही विधात्याने सुशांतमध्ये घातला होता.

प्रत्येकाची स्वप्नं असतात...सुशांतनेही खूप स्वप्नं पाहिली होती. शाहरुखप्रमाणे मोठा स्टार होण्याचं त्याचं स्वप्न होतंच. पण आयुष्यात त्यानं एवढीचं स्वप्नं पाहिली नव्हती. चंदेरी पडद्यापलीकडची दुनियाही त्याला खुणावत होती. कमीत कमी त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून तरी तसं जाणवायचं आणि आता तर याच गोष्टी उरल्या आहेत, ज्या माध्यमातून सुशांतला आपण समजून घेऊ शकतो.

गेल्या वर्षभरात सुशांतच्या 50 स्वप्नांच्या डायरीबद्दल मी वारंवार वाचलं. त्यावरून त्याला आयुष्यात नेमकं काय हवं होतं, याचा अंदाज बांधता येतो. कॅटलॉगप्रमाणे तो सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत होता.

पाऊस पडत असला तरी डिस्नेलँडला जाण्याचं आपलं स्वप्न त्यानं पूर्ण केलं. त्यादिवशी सुशांतने लिहिलं- "पाऊस येवो की बर्फ पडो...तुमची स्वप्नं तुम्हाला जिथे घेऊन जातात, तिथे जायलाच हवंच."

यशाच्या पायऱ्या चढत जाणाऱ्या एका कलाकाराला डान्स शिकावा वाटणं किंवा शरीर कमावण्याची इच्छा असणं आपण समजू शकतो. पण त्याला डाव्या हातानं क्रिकेट का खेळायचं होतं, हे नाही समजू शकत. त्याला दोन्ही हातांनी तिरंदाजी का करायची होती, हे पण नाही लक्षात येत. जणूकाही 'दिल बेचारा' मधील मैनीप्रमाणेच त्याला खूप काही हवं होतं.

रुमी आणि अहमद फराजसोबतच सुशांत असंही काहीतरी पोस्ट करायचा- नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगैः । विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता..

म्हणजेच कोणताही अभिषेक केला जात नाही किंवा कोणतेही वेगळे संस्कार केले जात नाहीत, तरीही सिंह हा जंगलाचा राजाच असतो.

त्याला या जगासोबतच एलियन्सचं जगही समजून घ्यायचं होतं. मला तर फक्त मिल्की वे ही एकच गॅलेक्सी माहितीये. त्याला मात्र आपल्या टेलिस्कोपमधून एंड्रोमेडा गॅलेक्सी आणि अजूनही बरंच काही पहायचं होतं.

सुशांतला विमान उडवायलाही शिकायचं होतं, जगातील वेगवेगळ्या, चित्र-विचित्र स्थळांना भेटी द्यायच्या होत्या.

त्याला आयुष्याच्या प्रत्येक रंगाचा अनुभव घ्यायचा होता. काय पो छे या चित्रपटातील ईशानप्रमाणे...ज्याला पैशांच्या झगमगाटापेक्षाही मोकळ्या हवेत श्वास घेणं अधिक पसंत होतं.

"तेरे पैसों की छन छन से मेरी हवाओं की कीमत कम हो रही है," ईशाननं असंच काहीसं म्हटलं होतं आपल्या मित्राला.

तसं पाहिलं तर हा केवळ 'धोनी' चित्रपटातला एक डायलॉग होता. पण सुशांतमध्ये नेहमीच असा आत्मविश्वास दिसायचा. या संवादात तो म्हणतो, "शहरं लहान असतात, पण तिथले लोक आणि त्यांची स्वप्नं नाही. एखाद्या व्यक्तीची योग्यता ही त्याच्या ध्येयांवरून पारखली जावी. जे कधी मैदानात उतरलेच नाहीत, ते नशीबाच्या गोष्टी करतात. थकवा आणि प्रेशर हा केवळ आभास आहे. विजय आणि पराभव यातलं अंतर मोठं असलं तरी ते पार करणं अशक्यप्राय नाही, हा विश्वास मला आहे."

पण खऱ्या आयुष्यात विजय आणि पराभवातलं हे अंतर सुशांतसाठी का मोठं ठरलं, हे माहीत नाही.

या लेखाचा उद्देश सुशांतचं गुणगान करणं नाहीये. तुमच्या-आमच्याप्रमाणे त्याच्यातही काही उणिवा असतीलच.

सुशांत सिंहला जाऊन एक वर्ष झालं आहे. या 365 दिवसांमध्ये सुशांतबद्दल पुष्कळ गोष्टी लिहिल्या किंवा बोलल्या गेल्या नाहीत. सोशल मीडियापासून अगदी चौकाचौकात त्याच्या मृत्यूबद्दल चर्चा झाल्या.

पण तरीही सुशांत सिंह हा एखाद्या न उलगडलेल्या कोड्यासारखाच राहिला...चांदण्यामध्ये रमणारा, आपल्या अवकाशापलिकडचं जग समजून घेण्याचं प्रयत्न करणारा, दोन्ही हातांनी तीरंदाजी करण्याची ज्याची इच्छा होती, नृत्याचे कमीत कमी 10 प्रकार ज्याला शिकायचे होते, अंटार्क्टिकावर फिरायला जायचं होतं...असा होता सुशांत सिंह राजपूत.

या एका वर्षात सुशांतच्या खाजगी आयुष्याची चीरफाड झाली. ड्रग्स, मानसिक आरोग्यापासून कौटुंबिक बेबनावापर्यंतच्या अनेक खऱ्या-खोट्या गोष्टी चर्चिल्या गेल्या.

पण या चर्चांमध्ये, आरोप-प्रत्यारोपांमध्ये सुशांत जणू हरवूनच गेला... तो सुशांत ज्यानं पद्मावतवरून झालेल्या वादानंतर करणी सेनेच्या विरोधात नावातून राजपूत काढत आपलं नाव केवळ सुशांत सिंह असं लावायला सुरूवात केली होती.

'मला चित्रपट नाही मिळाले तर मी टीव्ही शो करेन आणि टीव्हीत काम नाही मिळालं तर थिएटर करायला लागेन. मी 250 रुपयांवर थिएटरमध्ये काम करायचो तेव्हाही खूश होतो. त्यामुळे अपयशाची मला भीती नाही वाटत,' असं म्हणण्याची धमक असलेला सुशांत सगळ्यांमध्ये हरवला.

आयुष्यातल्या अशा कोणत्या वेदनेमुळे, भीतीमुळे किंवा त्रासामुळे सुशांतने आत्महत्या केली, हे कोडं कदाचित सुटणारच नाही.

पहिल्याच चित्रपटात सुशांतनं साकारलेल्या ईशानच्या व्यक्तिरेखेचा सिनेमात मृत्यू झाला होता. हा एक विचित्र योगायोग होता आणि सुशांतच्या बाबतीत तो एकदाच घडला नव्हता. 'केदारनाथ' चित्रपटातही त्याने साकारलेला मन्सूर सगळं काही सोडून मृत्यूला कवटाळतो.

'सोनचिडिया'तला लाखनही स्वतःपासूनच पळत असतो आणि "गँग से तो भाग लूँगा, अपने आप से कैसे भागूँगा" असं विचारत मृत्यूला सामोरं जातो.

जेव्हा मनोज वाजपेयीने साकारलेलं पात्र सुशांतला विचारतं की, तुला मरणाची भीती वाटतीये का? तेव्हा सुशांत म्हणजेच लाखन म्हणतो की, "एक जनम निकल गया इन बीहड़ों में दद्दा, अब मरने से काहे डरेंगे."

'दिल बेचारा' सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. त्यातला मैनीही सर्वांना आयुष्य जगायला शिकवून निघून जातो.

If you remember me, then I don't care if everyone else forgets- या मुराकामीच्या वाक्याचा सुशांत अनेकदा उल्लेख करायचा. 'तू माझी आठवण ठेवलीस,' तर इतर लोक विसरून गेले तरी मला काही वाटणार नाही, असा या वाक्याचा अर्थ होता.

आपल्या छोट्याशा फिल्मी करिअमरमध्ये सुशांतनं एवढं नाव तरी नक्कीच कमावलं आहे की त्याचे चाहते त्याला विसरणार नाहीत.

आतापर्यंत सुशांतच्या स्वप्नांच्या डायरीतली अजून काही स्वप्नं पूर्ण झाली असती...कैलासावर जाऊन ध्यानस्थ बसण्याचं स्वप्न, नासाच्या वर्कशॉपला जाण्याचं स्वप्न, एक आठवडा जंगलात राहण्याचं स्वप्न, वैदिक ज्योतिष शिकण्याचं स्वप्न किंवा आपल्या आवडीची 50 गाणी गिटारवर वाजवण्याचं स्वप्न.

पण ही स्वप्नं पूर्ण होण्याआधीच सुशांत निघून गेला आहे. मागे अनेक अनुत्तरित प्रश्न ठेवून...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)