अलीगढ विषारी दारू: प्रशासन म्हणतं 25 मृत्यू, तर भाजप खासदार म्हणतात 51 मृत्यू

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने नागरिकांच्या मृत्यूचा प्रकार रविवारीही सुरुच असल्याचं पाहायला मिळालं.

सरकारी आकडेवारीनुसार, मृतांची संख्या 25 आहे. पण अलीगढ जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 51 मृतदेहांचं शवविच्छेदन झालं आहे. तसंच स्थानिकांच्या मते, मृतांची संख्या 60 पेक्षा अधिक आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्यांपैकी अनेकांची प्रकृतीही गंभीर आहे.

शुक्रवारी सकाळी अलीगढ जिल्ह्याच्या लोधामधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. ते सर्व रात्री देशी दारूच्या वेगवेगळ्या दुकानांवरून (ठेक्यांवरून) दारू विकत घेऊन प्यायले होते.

याशिवाय काही इतर ठिकाणांहूनही दारू प्यायल्यानं मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. शुक्रवारी रात्री सांगण्यात आलेल्या माहितीनुसार विषारी दारूमुळं झालेल्या मृत्यूचा आकडा 27 पर्यंत पोहोचला होता.

प्रशासनानं देशी दारूची दुकानं बंद करण्याची कारवाई केली, पण लपून-छपून दारूची विक्रीही थांबली नाही आणि त्यामुळं दारू पिणारे आजारी पडण्यांचे आणि मृत्यू होण्याचे प्रकारही थांबले नाहीत.

रविवार सायंकाळपर्यंत शवविच्छेदन गृहामध्ये 64 मृतदेह आले होते. पण स्थानिक प्रशासनाच्या मते या विषारी दारू प्रकरणात मृत पावणाऱ्यांचा आकडा 25 एवढाच होता.

51 मृतदेहांचं शव विच्छेदन, पण प्रशासनाचा आकडा 25 मृत्यू

अलीगढचे जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी स्थानिक माध्यांशी बोलताना सांगितलं की, विषारी दारू प्यायल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

बीबीसीने अलीगढचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण दोन्ही अधिकाऱ्यांच्या फोनवरून वारंवार, 'ते महत्त्वाच्या बैठकीत आहेत, आता बोलू शकत नाही' अशीच माहिती मिळाली.

अलीगढमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉक्टर भानू प्रताप कल्याणी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत 51 मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.

सीएमओ डॉक्टर कल्याणी यांच्या मते, "शुक्रवार पासूनच विषारू दारू कांडातील रुग्ण आणि मृतांच्या येण्याची सुरुवात झाली होती. आतापर्यंत आम्ही 51 मृतदेहांचं शवविच्छेदन केलं आहे. त्यापैकी 25 प्रकरणांमध्ये अल्कोहोल पॉयझनिंगचं कारण समोर आलं आहे. 26 मृतदेहांचे विसेराचे (लाळेचे) नमुने घेऊन त्यांचे सँपल आगऱ्याच्या लॅबमध्ये पाठवले जातील आणि त्याठिकाणचा अहवाल आल्यानंतर, त्यावरूनच आम्हाला माहिती देता येईल."

भाजप खासदारांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

विषारी दारूमुळं मृत्यू झालेल्या आणि आजारी पडलेल्यांमध्ये अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे. स्थानिकांच्या मते, अनेक लोकांनी नातेवाईकांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम न करताच अंत्यविधीही उरकले आहेत. त्यामध्ये पिसावा परिसरातील शादीपूर गावातील चौघांचा समावेश आहे.

प्रशासन काहीही म्हणत असलं तरी विषारी दारू कांडामध्ये आतापर्यंत किमान 51 जणांचा मृत्यू झाला असल्याचं, अलीगढचे भाजप खासदार सतिश गौतम यांनी म्हटलं आहे.

खासदार सतिश गौतम यांनी अलीगढचे जिल्हाधिकारी हेच घटनेसाठी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

बीबीसीबरोबर बोलताना सतिश गौतम म्हणाले की, "ज्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. काही जणांना अटकही करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे. जे दोषी असतील त्यांना शिक्षा मिळेलच पण अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित असायला हवी. जिल्हाधिकारी चांगल्या कामांचे श्रेय घेतात, मग अशा घटनांची जबाबदारी कोण घेणार. माननीय मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."

आतापर्यंत झालेली कारवाई

राज्य सरकारने या प्रकरणामध्ये कारवाई करत अबकारी विभागाच्या चार अधिकाऱ्यांना शुक्रवारीच निलंबित केलं होतं. तर लोधा ठाण्याच्या इन्चार्जला एका दिवसानंतर निलंबित करण्यात आलं. यादरम्यान, पोलिसांनी शनिवारी दारूची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधित सहा जणांना अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. त्यात एका माजी ब्लॉक प्रमुखाचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार अबकारी विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात उपजिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी आणि अबकारी अधिकाऱ्यांची पथकं अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवतील.

अवैध दारूच्या संघटित व्यवसायामध्ये समावेश असलेल्यांच्या विरोधात गँगस्टर अॅक्ट आणि एनएसए (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)